चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

अध्याय १: माता-पिता, जन्म व बालपण

"पवित्र ते कुळ, पावन तो देश" (तु. म.)

योगीराज प. पू. बालदास महाराज यांच्या जन्मस्थानाचा मान शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द या भाग्यवान खेडेगावास मिळतो. म्हणजेच महाराजांचा जन्म त्यांच्या आजोळी झाला.

सावर्डे हे खेडेगाव म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्यांचे गाव—कष्ट करून पोटाची भाकर मिळवणाऱ्या कष्टकऱ्यांचे गाव. अशा गावात महाराजांचा जन्म झाला, म्हणजे जणू काय करवंदाच्या जाळीत गुलाब हसल्याचाच अनुभव!

माता-पिता

महाराजांच्या वडिलांचे नाव विठोबा होते आणि मातोश्रींचे नाव जिजाबाई होते. गरीब घराण्यातील ही गरीब माणसे असली, तरी स्वभावाने मात्र राजासारखी होती. सौते हे त्यांचे वास्तव्याचे गाव. त्या गावात ती दोघेही गुणी म्हणून ओळखले जात. कुणाची लांडीलबाडी त्यांनी कधीच केली नाही. कोणाचे पसाभर आणलेले धन परत न देता बुडवले, असे उदाहरण त्या गावात आजही शोधून सापडणार नाही.

शेती करून उपजीविका करणारी, पण भक्तीभावाने जगणारी अशी ही माता-पित्यांची जोडी होती. पंढरपूरचा पांडुरंग हा त्यांचा आराध्य दैवत. आषाढी-कार्तिकी वारीस पंढरीला जाणे त्यांचे नित्याचेच होते.

“पंढरीचा पांडुरंग सर्व काही करतो,” अशी त्यांची पक्की श्रद्धा होती.

जन्म देणे, तारणे आणि मारणे—हे सर्व काम पतितपावन पांडुरंगच करतो, असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे त्यांच्या घरात विठ्ठलाची आरती कधीही चुकायची नाही. देवाची पूजा व आरती केल्याशिवाय ते कधीच जेवत नसत.

वडील विठोबा

प. पूज्य बालदास महाराजांचे वडील विठोबा परिस्थितीने जरी गरीब असले, तरी मनाने फार विशाल होते. त्यांचे मन सात्त्विक, सालस व श्रद्धासंपन्न होते. महाराज म्हणत,

“माझे वडील फार चांगले होते. ते धार्मिक होते. विठ्ठलाभोवती त्यांनी भक्तीभावाची माळ गुंफली होती.”

ते चिलीम ओढत असत. चिलीम ओढताना जाणाऱ्या-येणाऱ्यांना ते म्हणत,
“या मारा एक झुरका आणि पळा आपल्या कामाला. चिलमीचा दम कामाला जोम देतो होय का नाय?”
ओढणारा ओढत-ओढतच म्हणायचा,
“होय, होय, अगदी खरं हाय तुमचं!”

विठोबांचे औदार्य फार मोठे होते. आपल्याकडे जे असेल ते दुसऱ्याला दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. कुणी खुरपं मागो, कुणी वैरणीसाठी दोरी मागो, कुणी शेतीचे औजार मागो—सर्व गोष्टी देण्यात ते सदैव उत्सुक असत.

माता जिजाबाई

प. पूज्य महाराजांच्या मातेचे नाव जिजाबाई होते. जिजाबाईंचे माहेर सावर्डेच होते. अंगापिंडाने चांगल्या असलेल्या जिजाबाईंचे माहेरचे व सासरचे नाव एकच होते. सौ. जिजाबाई व विठोबा यांचे लग्न बालपणीच झाले होते—त्या काळी बालविवाहाची पद्धत होती.

सौ. जिजाबाई पतीशी पूर्णपणे एकरूप झालेल्या होत्या. तिची मुद्रा पतीच्या मुद्रेत लोप पावली होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ती एक महान पतिव्रता होती. सतत उद्योगाची कास धरणारी, कष्टकरी स्त्री होती. तिला वावगे खपायचे नाही. सर्वांनी चांगले वागावे, चांगले बोलावे—असे तिचे मत होते.
“देव जे देतो ते सर्वांनी वाटून खावे,” ही तिची शेजार-पाजाऱ्यांना दिली जाणारी शिकवण होती.

नवऱ्याचा भक्तिमार्ग तिला प्रिय होता. गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी यांसारख्या संतांनी संसार करून परमेश्वर साधला—हेच तत्त्व तिला मान्य होते. पोटाचे काम करतानाच तिने परमेश्वराची भक्ती केली. मोटेवर अभंग म्हणणाऱ्या विठोबाला ती कधी-कधी साथ देई व चुकलेले सुधारून देई. नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून तिने आयुष्य व्यतीत केले. खरोखरच ती महान पतिव्रता होती.

आपल्या अवतीभोवती जे दीन-दुबळे होते, त्यांना आपले मानणारी ही सात्त्विक स्त्री होती. दुसऱ्यांचे सुख पाहून तिला आनंद होत असे, आणि दुःख दिसले की तिच्या मनात कणव निर्माण होत असे.

जन्म

अशा मातापित्यांच्या पोटीच महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईंना दिवस गेले असताना त्यांना एक स्वप्न पडले—

आपण बाळंत होऊ लागलो आहोत. प्रसूतीच्या वेदना भयंकर होत आहेत. शेजारी-पाजारी लोक गप्प बसले आहेत. कदाचित मी मरणार असे त्यांना वाटू लागले आहे. पुढील सोपा लोकांनी भरलेला आहे. वेदना वाढताच मी बेशुद्ध पडले आहे. काही वेळाने शुद्धीवर आले, तेव्हा सुईण म्हणाली,
“झाली रिकामी, पण ह्या पोरातून सारा प्रकाशच कसा निघतोय! पायाकडून आला म्हणून आईला फार ताप झाला.”

भक्तहो, महाराजांचा जन्म या स्वप्नाप्रमाणेच सन १९०५ साली झाला.

बालपण व शिक्षण

सात-आठ वर्षांनंतर बालदास महाराज सौते येथे शाळेत जाऊ लागले. लहानपणी त्यांना सर्वजण बाळू म्हणून हाक मारत. महाराज सर्वांचे लाडके होते. शाळेत शिकत असतानाच ते आई-वडिलांना मदत करत. रानात जाणे, भांगलणे, खुरपणे, मोट हाकणे, ऊसाचा पाला काढणे, ओझे आणणे—अशी सर्व शेतीची कामे महाराज करत.

सौते हे एक ग्रामीण खेडेगाव असल्याने तेथील मुलांना शेतीची कामे करणे अपरिहार्यच होते. शेती हाच तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे महाराजांनाही शेतीची कामे करावी लागत.

महाराज तिसरी-चौथीपर्यंतच शिकू शकले. त्यानंतर सौते गावी शिक्षणाची सोय नव्हती. कदाचित सोय असती तर महाराज अधिक शिकलेही असते.

शाळेत असताना एक गमतीशीर प्रसंग घडला. बे-चा पाढा सुरू होता. सर्व मुले गुरुजींच्या मागे पाढा म्हणत होती; पण महाराजांचे लक्ष त्या वेळी पाढ्याकडे नव्हते. ते पाटीवर पेन्सिलीने “श्रीराम, श्रीराम” असे लिहीत बसले होते. गुरुजी रागावून म्हणाले,
“तुला शाळेचे शिक्षण महत्त्वाचे की देवाचा जप?”
महाराज उत्तरले,
“मला दोन्हीही महत्त्वाचे आहेत.”

हे उत्तर ऐकून गुरुजी गप्प झाले आणि म्हणाले,
“मग दोन्हीही गोष्टी एकाच वेळी शिक, बाबा.”

अकरा-बारा वर्षांच्या दरम्यान महाराजांनी शाळेला रामराम ठोकला. ते जनावरे सांभाळू लागले व शेतीची कामे करू लागले. कधी महाराज मोटेच्या मकराला पुस्तक बांधत आणि त्यातील अभंग पाठ करत. एकदा तर लोकांनी अभंगगाथा मकराला बांधलेली पाहिली होती.

मोटेच्या नाडीवर पालथे पडून महाराज मोट हाकत. पुढे जाताना अभंग पाठ करत आणि मकराजवळ आल्यावर बांधलेल्या गाथेतून अभंग पाहत. अशा प्रकारे महाराजांनी बालवयातच वाचनाची सवय लावली.

महाराजांचे औपचारिक शिक्षण जरी कमी झाले असले, तरी ते अत्यंत सुसंस्कृत होते. घरातील धार्मिक वातावरण, त्यागाचे संस्कार, जनसेवेची शिकवण, सामुदायिक पद्धतीने साजरा होणारा विठ्ठलाचा उत्सव, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अभंगगाथा यांचे श्रवण—या सर्वांमुळे ते बहुश्रुत झाले.

जो जो जयाचा घेतला गुण
तो तो मी गुरु केला जाण
गुरुशी आले अपारपण
संपूर्ण जग गुरु दिसे!

हा दत्ताचा गुरुविषयीचा अनुभव होता, आणि तोच अनुभव महाराजांच्या चित्तात बालपणापासून रुजत गेला.

प्रकरण दुसरे: विवाह ठरला पण महाराज पसार

"तरी झड झडोनी वहिला निघ" (ज्ञा.म.)

महाराजांचे लग्न वयाच्या बाराव्या वर्षी ठरले. कारण त्या काळात लग्न ही मुलामुलींना कळावयाच्या अगोदरच करण्याची प्रथा होती. काही वेळा तर पाळण्यालाही बाशिंग बांधले जात असे. समाजात रूढ असलेल्या चालीरीतीप्रमाणे महाराजांचेही लग्न ठरविण्यात आले.

रामदास निदान “शुभमंगल सावधान” ऐकून तरी बाहुल्यावरून पळून गेले; पण आमचे महाराज तर तेवढ्यापर्यंतही थांबू शकले नाहीत. लग्न ठरविल्याचे कळताच दुसऱ्याच दिवशी काखेत अभंगगाथेची चोपडी मारून ते सौते गावातून पळून पंढरपूरला गेले. तेथे त्यांनी सहा–सात वर्षे वास्तव्य केले. दिंडीरवनात एका भुयारात त्यांनी तपश्चर्या केली. त्या भुयाराची कथा अशी आहे—

तेथे एक राजा तपश्चर्या करून नुकताच निघून गेला होता. त्या मोकळ्या झालेल्या भुयारात महाराज तपश्चर्या करू लागले. दिवसभर ते गुहेत ध्यानस्थ बसत. सकाळी प्रातःविधी आटोपल्यावर माधुकरी (कोरडे अन्न) मागून आणत आणि त्यावर आपली उपजीविका करत. त्या भुयारात त्यांनी बसू नये म्हणून काही घटना घडल्या, त्या अशा—

एकदा तेथे एक विंचू आला. त्याचा नांगर मनगटासारखा मोठा होता. तो विंचू महाराजांच्या आजूबाजूला फिरू लागला. तो पाहून महाराज म्हणाले,
“देवा, तू माझी परीक्षा पाहतोस काय? मी मेलो तरी येथून निघून जाणार नाही.”

दुसरी घटना अशी की एके दिवशी त्या गुहेत भला मोठा नाग फुस्कार टाकत आला. महाराज जागचे हलले नाहीत. तो नाग काही वेळाने निघून गेला. तेव्हा महाराज म्हणाले,
“परत येऊ नकोस बाबा! मी इथेच राहणार आहे.”

तिसरी घटना अशी की अमावस्येच्या रात्री त्या भुयारावर बदाबदा दगडांचा वर्षाव झाला. महाराज त्या वेळी देवाच्या आराधनेत होते. ध्यानमग्नतेतून थोडेसे बाहेर येऊन महाराज म्हणाले,
“दगड कोसळू देत किंवा आकाश कोसळू दे; मी येथून हलणार नाही.”

सात वर्षांचा तपाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महाराज पंढरपूरातून अनेक ठिकाणी फिरले. सोलापूरच्या रस्त्यावर असलेल्या पुलाखाली काही दिवस राहिले. चंद्रभागेच्या वाळवंटात काही काळ काढला. डोळे भरून पंढरपूर पाहिले. विठ्ठलाला कडकडून मिठी मारून त्यांनी अनेकदा दर्शन घेतले.

“पतितपावन!” अशी हाक त्यांनी विठ्ठलाला असंख्य वेळा मारली. महाराजांनी आपल्या देहाचा गाभारा भक्तीने तृप्त केला. आपल्या हृदय रूपी मंदिरात विठ्ठलाची स्थापना करून, त्या मूर्तीवर नितांत श्रद्धेचा अभिषेक केला आणि महाराज तृप्त झाले.

सासरवाशिणीला माहेरी दीर्घकाळ राहिल्यावर जे सुख व समाधान मिळते, तेच सुख महाराजांना पंढरपूरच्या पावन नगरीत, पांडुरंगाच्या सान्निध्यात मिळाले.

लहान वयात महाराजांनी भुयारात वास्तव्य केले. देवाचा शोध घेतला. परमेश्वराची अखंड भक्ती करण्याचा निश्चय केला आणि परमात्म्याच्या सत्य स्वरूपाकडे ध्यान केंद्रित केले.

प्रकरण तिसरे: पंढरीतून सौते गावी परत

"शरण शरण हळुमंता" (तु. म.)

महाराजांनी दीर्घकाळ पंढरीत वास्तव्य केल्यानंतर ते सौते गावी परतले. सौते गावी आल्यानंतर महाराज हनुमानाच्या देवळात राहू लागले. त्याच देवळात ते रात्रंदिन देवध्यानात रमू लागले. काही लोक महाराजांना देवभक्तीच्या मार्गावर लागल्यामुळे चांगले म्हणू लागले, तर काही लोक त्यांची चेष्टा करू लागले.

काही बहाद्दर म्हणू लागले,
“विठोबा केसऱ्याचं पोरगं पंढरीला राहून आलंय. कुठं कुठं भमक्या मारत फिरलंय आणि आता हनुमानाच्या देवळात बसलंय. बा-नं लगीन करावयाचं ठरवलं होतं, तोपर्यंत पळून गेलं. लेकाचा कशाला आलाय ह्या गावत तोंड घेऊन, कुणास ठाऊक. जिकडं फुडा तिकडं मुलुख थोडा म्हणून बाहेर पडलेलं पोरगं परत कशाला आलंय, कुणास ठाऊक!”

परंतु काही लोकांना मात्र महाराज पंढरीतून काहीतरी घेऊन आले आहेत, याची जाणीव झाली होती. कारण त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि ज्ञानात स्पष्ट फरक जाणवत होता. हनुमानाच्या देवळात महाराज ज्ञानेश्वरी, अभंगगाथा यांसारखे ग्रंथ वाचत असत. कधी कधी अखंड पारायण करीत. अखंड पारायण म्हणजे काही दिवस खंड न पडता सतत वाचन करीत बसणे आणि ठरविलेला भाग पूर्ण झाल्यावर थांबणे. असे छोटे-छोटे उपक्रम महाराज हनुमानाच्या देवळात स्वतःच सुरू ठेवत.

हनुमानाच्या देवळात असताना महाराज रात्री अपरात्री केव्हाही देवळातून रानावनात भटकत. त्यांना कसलीही भीती वाटत नसे. प्रकृती चांगलीच धडधाकट होती. पिंड इतका गुटगुटीत होता की मारलेला दगडही परत टणकन पाठीमागे उडेल, असा! गोफणीतील दगड जसा भिरभिरत पुढे धावतो, तसेच महाराज तरुणपणात पळायला लागले की गोफणीतील दगडासारखेच सुटायचे.

कुणी त्यांना खुळसट म्हणायचे, तर कुणी वेगळ्याच दिमाखात निरखून पाहायचे. कुणी निंदा करो, कुणी वंदा करो—महाराजांना त्याचे काहीच वाटत नसे. अवतारी पुरुष असेच असतात; पण ही गोष्ट अज्ञानी लोकांच्या लक्षात येत नसे.

हनुमानाची पूजा महाराज पहाटेच करीत. पहाटे पूजा करायची म्हणजे त्यापूर्वीच पूजेच्या साहित्याची तयारी करणे आवश्यक असे. म्हणून महाराज रात्री दोनच्या सुमारास उठत. कडवी नदीत जाऊन स्नान करत आणि येताना वाटेतून पूजेचे साहित्य गोळा करून आणत. साप, विंचू, भूतखेत—या गोष्टींची त्यांना काहीच भीती नव्हती. जणू त्यांनी या साऱ्यांवर मात केली होती. भीती हा शब्दच त्यांच्या कोशात नव्हता.

कधी कधी देवळात जाणारी म्हातारी माणसे महाराजांना म्हणत,
“आरं बाळू, तुला भीती कशी वाटत नाही रे? रात्रीचा मुलुखभर फिरतोस, वाटेल तिथं झोपतोस!”

यावर हसत-हसत महाराज म्हणायचे,
“ज्यानं घरदार सोडलं आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला, त्याला या जगात परमेश्वराशिवाय कुणाचीच भीती नसते.”

हे मार्मिक उत्तर ऐकले की म्हातारी-कोतारी माणसे गप्प बसत; पण मनात मात्र म्हणत, कायतरी येडपट बोलतोय!

हनुमान हा साऱ्या सौतेगावाचा प्रिय देव. त्या प्रिय देवाच्या पायाशी महाराजांचा पिंड दररोज पडू लागला. हनुमानाच्या देवळात राहणारे ते तरणंताट पोरगं खरोखरच हनुमानासारखेच ताकदवान बनू लागले.

प्रकरण चौथे: सद्गुरु नेर्लेकर महाराजांचे सौते गावी आगमन

"उद्घागया आले ठिण जना" (ना. म.)

परमपूज्य जंगली महाराजांचे शिष्य सद्गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर हे गाईंचा कळप घेऊन वारणेच्या काठावरील गावे आपल्या व गाईंच्या पायांनी पावन करीत करीत एके दिवशी सौते गावी आले. नेर्लेकर महाराज गावात आल्याची वार्ता क्षणार्धात सर्वत्र पसरली—
“नेर्लेकर महाराज आलेत!”

गावात आल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी गावाला उपदेश केला. त्यांच्या उपदेशाने सारा गाव भारावून गेला. सर्वत्र सद्गुरु नेर्लेकर महाराजांचा जयजयकार होऊ लागला. या प्रसंगाला आमचे बालदास महाराजही अपवाद ठरले नाहीत. तेही या मेळाव्यात सहभागी झाले. हनुमानाच्या देवळातून बाहेर पडून बालदास महाराज सद्गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांच्या समवेत संपूर्ण गावभर फिरू लागले.

चुकलेल्या मुलाला आई भेटल्यावर जो आनंद होतो, तोच आनंद सद्गुरु नेर्लेकर महाराजांना भेटल्यावर बालदास महाराजांना झाला. सद्गुरुंच्या सहवासात ते पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.

सारा सौते गाव सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या पाठीमागे का लागला, या प्रश्नाचे उत्तर भक्तांनी ऐकले तर त्यांच्या अंतःकरणात खरोखर आनंद निर्माण होईल. तो आनंद मिळावा म्हणूनच येथे घडलेली ही सत्यकथा सांगत आहे.

त्या काळी सौते गाव कर्जाने गांजले होते. सारे लोक दुःखी व कष्टी होते. लोकांच्या विहिरींना पाणी नव्हते. उन्हाळ्यात तर पाण्याची फारच टंचाई भासत असे. गावाचे हे दुःख पाहून सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी साऱ्या गावाला तीन दिवसांचा उपवास सांगितला. गावात तराळाद्वारे दवंडी दिली गेली—

“ऐका हो ऐका! बाबांनो, आपल्या गावाचं भलं होण्यासाठी साऱ्या लोकांनी आपापल्या जनावरांसह तीन दिवस उपवास करावा. हो बाबा, हो!”

साऱ्या सौते गावातील बायका-पोरांनी उपवास केला. पुरुषांनी आपली जनावरेही उपवाशी ठेवली. एवढेच नव्हे, तर त्या दिवशी गाईला वासरू सुद्धा पाजले गेले नाही. एवढा खडतर उपवास साऱ्या सौते गावाने पाळला.

या उपवासाचा परिणाम असा झाला की पुढील वर्षभरात गाव सुखी झाले. सारा गाव कर्जमुक्त बनला. लोकांच्या विहिरींना पाणी लागले. संपूर्ण शिवार हिरवागार पिकांनी डोलू लागले. सद्गुरु नेर्लेकर महाराज त्या गावात आले आणि जाताना काहीतरी देऊन गेले—ही गोष्ट मात्र नक्की. ही सत्यघटना आजही गावातील म्हातारे लोक सांगतात.

अशा या सद्गुरुंचा प्रभाव बालदास महाराजांवर पडल्याशिवाय राहिला नाही. म्हणूनच या प्रकरणात “सारा सौते गाव सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या पाठीमागे लागला” असा उल्लेख केलेला आहे.

ज्यावेळी सारा समाज संकटात सापडतो, त्यावेळी कुणी ना कुणी ज्ञानी पुरुष समाजात अवतरतो. तो समाजाचे दुःख नाहीसे करतो आणि अशा वेळी सारा समाज त्या ज्ञानी पुरुषाच्या मागे धावतो. हा ज्ञानी पुरुष म्हणजेच तेजाचा तारा होय.

सौते गावाला कर्जाच्या संकटातून वाचवण्याचे महान कार्य सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी केले. दुःखी गावाला सुखाचे दिवस आले. सारा गाव भक्तीमार्गाकडे वळला. या साऱ्या गोष्टींचे कारण म्हणजे सद्गुरु नेर्लेकर महाराज हे त्या गावासाठी तेजस्वी ताऱ्याच्या रूपाने अवतरले.

असे तेजाचे तारे महाराष्ट्राच्या भूमीत अनेकदा अवतरले आहेत. उदाहरणार्थ—समाज वाईट आचार-विचारांच्या अधीन जात असताना पूज्य ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला वाचवले. त्यांनी वाईट आचारकांडाविरुद्ध बंड पुकारले आणि समाजाला वाईट रूढी, वाईट परंपरा व चुकीच्या चालीरीतींपासून मुक्त केले. म्हणजेच समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊली अवतरली.

सारांश असा की, सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या आगमनामुळे सौते गाव संकटमुक्त झाले. अशा अवतारी पुरुषाचा प्रभाव बालदास महाराजांच्या मनावर पडणे हे स्वाभाविकच होते.

प्रकरण पाचवे: सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी भमोपविलेली पशुपालन सेवा

"भूतदया – गायी-बैलांचे पालन" (तु. म.)

सद्गुरु नेर्लेकर महाराज सौते गावी आले तेव्हा ते एकटे आले नव्हते. त्यावेळी त्यांच्या बरोबर चाळीस गाई आणि चार बैल होते. या सर्व जनावरांची व्यवस्था त्यांनी आमच्या बालदास महाराजांवर सोपवली होती. सौते गावी चाळीस खणांचे प्रचंड छप्पर उभारून त्यात या जनावरांची जोपासना करण्याचे काम आमचे महाराज करू लागले.

सद्गुरूंनी आपला हा चाळीस गाईंचा व चार बैलांचा गोतावळा महाराजांकडे का दिला होता, हा प्रश्न भक्तांच्या मनात येणे साहजिकच आहे. याचे कारण असे की सद्गुरूंना महाराजांवर मोठा विश्वास होता.

बालदास महाराज चाळीस गाई व चार बैलांची सेवा करीत असत. एका व्यक्तीने हे सर्व करणे ही किती कठीण गोष्ट होती, हे विचार करण्यासारखे आहे. चाळीसपेक्षा अधिक जनावरांचे दररोज किमान चाळीस पाट्या शेण निघत असे. ते शेण काढून गारीत (खड्यात) टाकणे ही सोपी गोष्ट नव्हती, आणि हे काम महाराजांनी कित्येक दिवस अविरत केले.

चव्वेचाळीस जनावरांचा कळप घेऊन महाराज दररोज बादयाच्या जंगलात जात. बहिरीच्या पठारावर जनावरे राखत असताना ते वाचन करीत. बहिरीच्या पठारावर असलेल्या बहिरीदेवाजवळ महाराज जसे लहानपणी बसत, तसेच तरुणपणीही बसत. वाचन व पाठांतर यावर त्यांचा मोठा भर होता. ज्ञानेश्वरी, भागवत, एकनाथी, रामायण, भक्तिविजय, हरिविजय, पांडवप्रताप इत्यादी ग्रंथांचे वाचन महाराज मोठ्या आत्मीयतेने करीत. त्यांनी आपला सारा जीव या ग्रंथांच्या वाचनात गुंतवला होता. “ग्रंथ हेच आपले गुरु” असे ते सर्वांना सांगत.

“ग्रंथावलोकन येतसे, मनुजा चातुर्य असे,” हे महाराज आवर्जून सांगत आणि स्वतः त्याचे अनुकरणही करीत. काहीजण महाराजांना “जंगलाचा राजा” म्हणत. कारण सर्वांत आधी जंगलात पाय ठेवणारे महाराज असत आणि परतताना शेवटचे निघून जंगलाला रामराम करून येत.

रात्र गावात आणि दिवस जंगलात असा त्यांचा नित्यक्रम झाला होता. जंगलातील अनेक वनस्पती ते खात असत. ज्या वनस्पती जनावरे खात, त्या त्या वनस्पती ते निर्धास्तपणे खात.

जनावरांसाठी महाराज ओढ्याचे पाणी अधिक पसंत करीत. बादयाचा ओढा हा त्यांच्या गाई-बैलांचा आवडता ओढा होता. महाराजांनाही त्याच ओढ्याचे पाणी उत्तम वाटत असे. जनावरांच्या अंगावर तेच पाणी मारून महाराज त्यांचे शरीर चकचकीत करीत. महाराजांच्या बहुतेक सर्व गाई पांढऱ्या रंगाच्या होत्या आणि बैलही तसेच पांढरे होते. त्यामुळे त्यांच्या कातडीत चांदीसारखी झळाळी दिसत असे.

उन्हाळ्यात ओढ्याचे पाणी आटले की महाराज जनावरांना रांजून या ठिकाणी पाणी पाजत. रांजून येथे चोवीस तास पाणी असते. पूर्वीच्या काळी भीमाने येथे आपला गुडघा रुतवला होता, अशी दंतकथा आहे. रांजूनच्या पश्चिमेला धावट्याचे जंगल असून, त्या जंगलातील जंगली जनावरे आजही येथे पाणी पिण्यास येतात.

रांजूनचे पाणी नेहमी पांढरेशुभ्र दिसते. ते थंडगार असून मनाला आगळे समाधान देते. पावसाळ्यात येथील कुंडासारखा भाग पाण्याच्या प्रवाहात बुडून जातो, तर उन्हाळ्यात या ठिकाणचे खरे वैभव दिसते. सभोवती प्रचंड दगडांच्या सान्निध्यात हे ठिकाण गुंतलेले भासते. भोवतालची हिरवीगार सृष्टी येथे डोकावते, तेव्हा दृश्य अतिशय मोहक वाटते. दुपारच्या वेळी तर सूर्य जणू स्वतःच त्या थंडगार कुंडात बुडतो. सूर्याचे प्रतिबिंब रांजूनच्या पाण्यात पडते, तो देखावा अविस्मरणीय असतो.

या सुंदर ओढ्याच्या रमणीय वातावरणात महाराज रात्र सोडली तर दिवसभर असत. महाराजांना निसर्ग फार प्रिय होता. “निसर्ग भरभरून देतो,” असे ते म्हणत. याठिकाणी विं. दा. करंदीकरांची ‘घेता’ ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही—

देणाऱ्याने देत जावे | घेणाऱ्याने घेत जावे |
हिरव्या पिवळ्या माळावरून | हिरवी पिवळी शाल घ्यावी |
सह्याद्रीच्या कड्याकडून | छातीसाठी ढाल घ्यावी |
वेड्यापिशा ढगाकडून | वेडेपिसे आकार घ्यावे |
रक्तामधल्या प्रश्नांसाठी | पृथ्वीकडून होकार घ्यावे |
उसळलेल्या दर्याकडून | पिसाळलेली आयाळ घ्यावी |
भरलेल्या महिमेकडून | तुकोबाची माळ घ्यावी |
देणाऱ्याने देत जावे | घेणाऱ्याने घेत जावे |
घेता घेता एक दिवस | देणाऱ्याचे हात घ्यावे |

या कवितेत कवीने जसा निसर्ग गुरु मानला आहे, तसेच महाराजही मानत. निसर्गाकडून दातृत्व हा गुण माणसाने घेतला पाहिजे, असे त्यांचे मत होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून महाराज धडे घेत आणि ते इतरांना सांगत.

एवढा मोठा जनावरांचा कळप सांभाळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील, याची कल्पना ज्यांच्या दावणीला जनावरे आहेत त्यांनाच येऊ शकते. महाराज सातशे पेंड्यांचे वाळके गवत डोंगराच्या उतारावर असलेल्या एका प्रचंड दगडावरून स्वतः उचलून पाठीवर घेत आणि डोंगर उतरून खाली आणत. सातशे पेंड्यांचे गवत म्हणजे एक गाडीभर गवत होय. महाराजांनी एवढी प्रचंड ताकद कमावली होती.

उन्हाळ्यात महाराज जंगलात जाऊन सुमारे एक लाख गवत काढून ठेवत. ते गवत स्वतः सौते गावात आणून छपरात रचत आणि पावसाळ्याची तयारी करीत. पावसाळ्यात त्यांना कधीही वैरणीचा तुटवडा जाणवत नसे. चव्वेचाळीस जनावरे वैरण खाऊनही अंदाजे दहा-वीस हजार गवत शिल्लक राहत असे. एवढा मोठा जनावरांचा परिवार महाराजांनी बिनतक्रार सांभाळला.

चार बैलांची नावे अशी होती—राजा, बाळया, मदन आणि सागर. सागर हा समुद्रासारखा प्रचंड पिंडाचा होता. राजा हा खऱ्या राजासारखा रस्त्याने डुलत चालत असे; त्याच्याकडे सगळी ऐट आणि बाणा होता. बाळया स्वच्छ आणि साधा होता. मदन मधासारखा गोड; त्याची हालचाल मादक व मोहक होती.

साऱ्या कळपाची पुढारीण लक्ष्मी नावाची गाय होती. ती वांझोटी होती. वांझ गायीला सहसा मान दिला जात नाही; पण महाराजांना ती फार प्रिय होती. त्यांनी तिलाच कळपाचे पुढारपण दिले आणि तिचे नावही लक्ष्मीच ठेवले. कळपातील दुसऱ्या गायीचे नाव त्यांनी सोनी ठेवले होते. तिचे गुण सोन्यासारखेच आहेत, असे महाराज म्हणत आणि “माझी सोनी फारच चांगली आहे,” असा उल्लेखही करीत.

महाराज जनावरांच्या आत्म्यास देव मानत. आपला आत्मा आणि जनावरांचा आत्मा एकच आहे, असे ते मानत. “रेड्यामुखी वेद” म्हणवली जाणारी ज्ञानेश्वरी महाराज या संदर्भात सांगत. परमेश्वर सर्व भूतांत भरून राहिला आहे, ही जाणीव ते सर्वांना करून देत. एखादी गाय आजारी पडली की महाराज त्वरित झाडपाल्याचा उपाय करीत.

कुठल्यातरी झाडाची मुळे आणून उगाळून औषध देत. आयुर्वेदिक औषधांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. एकदा सोनी गाय तापाने आजारी पडली. महाराज रात्रभर तिच्याजवळ बसून राहिले. हरणाचे शिंग गार पाण्यात दगडावर उगाळून त्याचा लेप तिच्या अंगावर लावत ते उजाडेपर्यंत जागे होते. सकाळी डोंगराआडून सूर्य डोकावताच सोनीला आराम पडला. महाराजांना फार आनंद झाला. तोंड धुऊन त्यांनी चहा घेतला आणि छपरात येणाऱ्या प्रत्येकाशी आनंदाने बोलू लागले. गाईचा आराम म्हणजे जणू महाराजांचाच आराम होता, असे भेटणाऱ्यांना वाटत असे.

महाराजांचा गोतावळा म्हणजे ही सारी जनावरेच होती. शेणमूत काढणे, आजारपणाची काळजी घेणे, पोटाची व्यवस्था करणे, आवडीनिवडी पाहणे—या सगळ्या कामांतच त्यांचा अहर्निश वेळ जात असे. या गोतावळ्यापलीकडे त्यांचे वेगळे असे जीवन नव्हते. अंतःकरणात अध्यात्माचा गाभारा फुलत असतानाच सद्गुरु श्रीकृष्ण नेर्लेकर महाराजांनी ही मोठी कामगिरी त्यांच्या खांद्यावर सोपवली होती.

प्रकरण सहावे: अनुग्रह

"मग श्रीगुरु आपैसा | भेटेची गा" (ज्ञा. मा.)

सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी बालदास महाराजांची चांगलीच परीक्षा घेतली होती. चाळीस गाई आणि चार बैल सांभाळणारा हा आमचा खरा भक्त आहे. गोरक्षणाचे काम बालदास महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे. अशा श्रद्धावान भक्ताला आपण आपल्या जवळ करून घ्यावे, असे सद्गुरु नेर्लेकर महाराजांना वाटले.

सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या मनात जे जे आले, ते त्यांनी प्रत्यक्षात आणले. त्यांनी सौते गावी असणाऱ्या आमच्या बालदास महाराजांना दृष्टांत देऊन नेर्ले या गावी बोलावले. नेर्ले हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. दुसऱ्या दिवशी महाराज पायीच चालत नेर्ले गावी पोहोचले.

बालदास महाराज पायी चालत आलेले पाहून सद्गुरु नेर्लेकर महाराज म्हणाले,
“अरे बाळू, तू इतक्या लवकर कसा काय आलास?”

बालदास महाराज चेहऱ्यावर स्मितहास्य प्रकट करून म्हणाले,
“आपण दृष्टांत दिला, म्हणून लवकर येणं भाग पडलं.”

हे ऐकून सद्गुरूंनी मान हलवली, हातवारे करत म्हणाले,
“अरे बाबा, कळले… आता कळले मला.”

बालदास महाराज सद्गुरूंच्या चरणाजवळ बसून नमस्कार करून म्हणाले,
“आपली काय आज्ञा आहे?”

सद्गुरु म्हणाले,
“तुला मी अनुग्रह देणार आहे.”

हे शब्द ऐकताच बालदास महाराजांना विलक्षण समाधान वाटले. त्यांची सारी गात्रे प्रफुल्लित झाली. आनंदाने त्यांच्या अंगावर शहारे आले. उमललेल्या फुलासारखा हसरा चेहरा करून बालदास महाराज म्हणाले,
“आज मला अनुग्रह हवाच आहे. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो, चकोर पक्षी जसा चांदण्याची वाट पाहतो, तशीच मी आपल्या उपदेशाची वाट पाहत होतो. आपण मला अनुग्रह द्यावा.”

सद्गुरु म्हणाले,
“अरे बाबा, हा अनुग्रह कुणालाही देता येत नाही. हा अनुग्रह घेण्यासाठी ती व्यक्ती सर्वार्थाने पात्र असावी लागते. आमचे सोन्यासारखे शब्द जर कुंपणात फेकले, तर त्यांचा उपयोग काय? आता तुझी आध्यात्मिक ज्ञानाची बैठक तयार झाली आहे. तू माझ्या श्रद्धेला पात्र ठरलास. हीच वेळ तुला अनुग्रह देण्याची आहे. आता विलंब करता येणार नाही.”

नेर्ले गावच्या मठात सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी बालदास महाराजांना अनुग्रह दिला. अनुग्रह झाल्यानंतर बालदास महाराज काही दिवस तेथेच आपल्या सद्गुरुंच्या सहवासात राहिले. सद्गुरुंनी त्यांना भरपूर उपदेश केला. गुरु-शिष्यांमध्ये परमार्थासंबंधी सखोल चर्चा झाली. विशेषतः सामान्य माणसाने संसार करत असतानाही परमात्मा कसा साध्य करावा, याचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला.

अनुग्रह घेतल्यानंतर बालदास महाराजांची मुद्रा आनंदित झाली होती.

“मला मोगऱ्याचा वास भेटला, मला मोगऱ्याची संगत लाभली,” असे महाराज सर्वांना सांगू लागले.
“मला परमेश्वर भेटला. माझ्या चित्तातील आनंद फुलवणारा देव मला भेटला. मला ज्ञानाच्या महासागरात डुबकी मारायला मिळाली,” अशा अंतःकरणातून उमटणाऱ्या ललकाऱ्यांद्वारे बालदास महाराज हे अनुभव इतरांना सांगू लागले.

प्रकरण सातवे: पंचाग्नी धुनी

“याजसाठी जप, याजसाठी तप” (तु. म.)

सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम अनेक ठिकाणी केला. या सर्व विधींना बालदास महाराज हजर असत. विधींच्या वेळी पडेल ते काम बालदास महाराज आनंदाने करीत असत.

पंचाग्नी धुनी म्हणजे चोहोबाजूंनी चार अग्नीकुंड प्रज्वलित करून मध्यभागी स्वतः बसणे, आणि सूर्याग्नी हा पाचवा अग्नी मानला जातो.

पंचाग्नी विधी अनेक ठिकाणी भक्तिभावाने पार पडले.

पहिला पंचाग्नी विधी

पहिला पंचाग्नी धुनीचा विधी सौते गावाच्या उत्तरेस असलेल्या बहिरीच्या पठारावर पार पडला. या पठारावर बहिरी देवाचे देऊळ आहे. याच ठिकाणी पंचाग्नी धुनीचा पहिला कार्यक्रम झाला. हा विधी पाहण्यासाठी संपूर्ण गाव लोटला होता.

दुसरा पंचाग्नी विधी

दुसरा पंचाग्नी विधी सावर्डे येथील इंजाई देवीच्या समोर झाला. या विधीसाठी सावर्डे परिसरातील मोठ्या प्रमाणात भक्तगण जमले होते. अत्यंत भक्तिभावाने आणि अंतरीच्या श्रद्धेने हा कार्यक्रम मोठ्या भारदस्तपणे पार पडला. म्हातारी-कोतारी, स्त्री-पुरुष, अनेकजण गाड्या जुंपून हा अग्निविधी पाहण्यासाठी आले होते. सर्वत्र जत्रा भरल्यासारखे वातावरण होते.

तिसरा पंचाग्नी विधी

तिसरा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम वारण खोऱ्यातील साताळी येथे झाला. साताळीचे पठार भेडसगावच्या उत्तरेस आहे. येथेही मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

या ठिकाणी एक विशेष घटना घडली. ऊसाच्या फडात काम करणारे चाळीस-पन्नास फडकरी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वेळात वेळ काढून रात्री आले. ती भोजनाची वेळ होती. सद्गुरु महाराजांनी सर्वांना आग्रहाने जेवण्यास सांगितले, आणि सर्वांनी तो आग्रह मान्य केला.

सद्गुरु माऊलींच्या हातचे जेवण मिळणार म्हणून सारे उत्सुक झाले. सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी फक्त एक ओंजळ तांदूळ एका छोट्याशा पातेल्यात शिजत ठेवला. थोड्याच वेळात भात तयार झाला.

“जेवायला बसा,” असे महाराज म्हणताच साऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले. एकजण हळूच म्हणाला,
“अरे खंडू, एवढासा भात आणि आपण इतके लोक कसे जेवणार?”

त्यावर खंडू म्हणाला,
“तसं बोलू नकोस. प्रसाद पोटभर खायचा नसतो. थोडा-थोडा प्रसाद घेऊन उठायचं.”

महाराजांनी पाने वाढली. सर्वजण जेवू लागले. महाराज जसा भात वाढत होते, तसा पातेल्यात भात परत तसाच भरलेला दिसत होता. साऱ्यांचे लक्ष त्या पातेल्याकडेच लागले होते.

महाराज म्हणाले,
“अजून थोडा-थोडा भात घ्या.”

तेव्हा त्या फडकर्‍यांमधील म्होरक्या म्हणाला,
“महाराज, आता पोट फुटायला झालं आहे. आम्हाला पानावरून उठायची परवानगी द्या.”

महाराज हसून म्हणाले,
“तुमची इच्छा.”

सारे फडकरी पानावरून उठले. महाराजांना साष्टांग नमस्कार घालून पुन्हा आपल्या ऊसाच्या फडात कामाला गेले.

हा प्रसंग वाचताना सामान्य माणसाला प्रश्न पडेल की महाराजांच्या पातेल्यात भात परत-परत कसा वाढत होता. मोठ्या योगींना योगसिद्धीच्या बळावर अशा गोष्टी साध्य होऊ शकतात. महान योग्यांपुढे पंचमहाभूते लीन होतात.

असाध्य ते साध्य
करिता सायास
कारण अभ्यास
तुका म्हणे

चौथा पंचाग्नी विधी

चौथा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम उद्गिरी येथे झाला. उद्गिरी हे ठिकाण घनदाट जंगलात आहे. निसर्गरम्य परिसरात, भोवतालच्या करवंदीच्या जाळींना साक्ष ठेवून भक्तगणांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला. या वेळी सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी दगडाला पाझर फोडून दाखविला, आणि सर्व भक्तगण अचंबित झाले.

पाचवा पंचाग्नी विधी

पाचवा पंचाग्नी धुनीचा कार्यक्रम विशाळगडाच्या पायथ्याशी झाला. या विधीच्या वेळी सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी बालदास महाराजांना सौते गावी जाऊन रातोरात गायीचे दूध आणण्यास सांगितले.

विशाळगड ते सौते हे अंतर सुमारे ४० किलोमीटर आहे. एवढे अंतर पार करून बालदास महाराज दोन ते अडीच तासांत गायीचे दूध घेऊन परत आले.

रात्री जात असताना विशाळगडाच्या अलिकडे वाटेत एक ढाण्या वाघ बसलेला होता. बाजूने जाण्यास मुळीच रस्ता नव्हता. तरीही बालदास महाराज निर्भयपणे त्या वाघाच्या जवळून गेले. वाघाने त्यांना काहीही इजा केली नाही.

अशा प्रकारे वाघाच्या तावडीतून सुटून गायीचे दूध घेऊन बालदास महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या सहवासातील सर्व भक्तगण हे पाहून आश्चर्यचकित झाले. बालदास महाराजांच्या चालण्याच्या वेगाचे, धैर्याचे आणि जंगलातून येण्याच्या धाडसाचे सर्वांनाच नवल वाटले.

प्रकरण आठवे: मुळकीच्या डोंगरावर जामसप्ताह साजरा

"करील ते काय नोहे महाराज" (तु. म.)

पंचाग्नी विधीची साधना पूर्ण झाल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज नेर्ले गावाच्या पश्चिमेस असलेल्या मुळकीच्या डोंगरावर जामसप्ताह साजरा करण्यासाठी आले.

सप्ताहाच्या समाप्तीप्रसंगी खिरीचा प्रसाद करण्यात आला होता. या प्रसादासाठी लागणारी मोठी काहील बालदास महाराजांनी नेर्ले गावातून स्वतःच्या डोक्यावर उचलून मुळकीच्या डोंगरावर नेली होती. त्यांची ती अपार ताकद पाहून जमलेला भक्तगण अचंबित झाला.

खिरीचा प्रसाद उपस्थित सर्व भक्तांना पोटभर वाढण्यात आला. हजारो लोकांनी तो प्रसाद अत्यंत आनंदाने व तृप्त मनाने ग्रहण केला. जमलेल्या भक्तांची संख्या इतकी प्रचंड होती की आणलेल्या पत्रावळ्या अपुऱ्या पडल्या. अखेरीस काही भक्तांना दगडावरच खिरीचा प्रसाद वाढण्यात आला.

तेथे असलेल्या जांभा दगडावर भक्तांनी तो प्रसाद ग्रहण केला. जांभा दगडालाच पात्र मानून भक्तांनी श्रद्धेने प्रसाद घेतला. एवढ्या मोठ्या जनसमुदायाला खीर वाटूनही प्रसाद अजिबात कमी पडला नाही.

उरलेली खीर बालदास महाराजांनी स्वतः बैलाची गाडी जुंपून कृष्णा नदीच्या ढोहात ओतली. त्या खिरीच्या प्रसादाचा लाभ कृष्णा नदीतील मासे व इतर जलचर प्राण्यांनीही घेतला.

प्रकरण नववे: मठाचा प्रारंभ, पण मध्येच तीर्थयात्रा सुरू

"तव तू आपुले स्वहित लाहे | तीर्थयात्रे जाय चुको नको" (ए. म.)

सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी एकदा सांगितले होते की सारा सौते गाव कर्जमुक्त होईल. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना विचारले,
“तसं घडलं तर आम्ही आपली आठवण म्हणून काय करावं?”

त्यावर सद्गुरु नेर्लेकर महाराज म्हणाले,
“जे चिरकाल टिकेल असं काहीतरी करा.”

सद्गुरुंच्या या सांगण्यानुसार सर्व गावकऱ्यांनी सौते गावी मठ बांधण्याचा निर्णय घेतला. या मठाला ‘देणगी मठ, सौते’ असे नाव देण्यात आले. या मठाचा पाया सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या हस्तेच घालण्यात आला. पाया भरून काढण्यात आला आणि पायाभरणीचे काम अतिशय झपाट्याने झाले. मात्र त्यानंतर मठाचे बांधकाम काही कारणांमुळे रखडले आणि काम अपूर्णच राहिले.

मठाचे काम अपुरे असतानाच सद्गुरु नेर्लेकर महाराज तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी बालदास महाराजांना आपल्या सोबत येण्यास सांगितले. यावेळी बालदास महाराजांनी आपल्याकडील गाई-बैल ज्यांच्यावर विश्वास होता, अशा भक्तांकडे वाटून दिले. ज्यांनी जनावरे स्वीकारली, त्यांनी त्यांचा नीट सांभाळ करण्याचे वचन दिले.

ही तीर्थयात्रा आपल्या आयुष्यातील अखेरची असेल, या भावनेनेच सद्गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर नेर्ले गावच्या मठातून बाहेर पडले. इ.स. १९३२ मध्ये सद्गुरु नेर्लेकर महाराज बालदास महाराज व इतर शिष्यगणांसह तीर्थयात्रेस निघाले. विशेषतः बालदास महाराजांना त्यांनी आग्रहपूर्वक सोबत घेतले.

बालदास महाराज गुरुसमवेत जाण्यास तत्पर झाले. त्यांनी नेर्ले येथे जाऊन गुरुंचे पाय धरले व म्हणाले,
“आपली काय आज्ञा आहे?”

तेव्हा अंतःकरणात नितांत प्रेम व डोळ्यांत अपार आपुलकी घेऊन सद्गुरु म्हणाले,
“बाळू, तू माझ्या बरोबर तीर्थयात्रेला यावेस, अशी माझी इच्छा आहे. मी आता देह ठेवणार आहे. त्याआधी ही माझी अखेरची तीर्थयात्रा करायची आहे.”

बालदास महाराज आनंदाने म्हणाले,
“आपण द्याल ती आज्ञा पाळण्यास मी सदैव तयार आहे. आपण केव्हा निघायचे ते सांगा.”

यावर प्रसन्न मुद्रेने सद्गुरु म्हणाले,
“अरे बाबा, उद्याच निघूया. आपल्याला वेळ-काळाचे बंधन कसलं?”

सद्गुरु नेर्लेकर महाराज शिष्यगणांसह निघाले. बालदास महाराज हे सद्गुरुंचे अत्यंत लाडके शिष्य होते. गुरु बोले आणि शिष्य झेलावे, अशी त्यांची नाती होती. प्रवासात सद्गुरु हेच त्यांचे सर्वस्व झाले होते.

प्रथम ते पुण्याला आले. तेथे आपल्या गुरुंच्या समाधीचे दर्शन घेतले. परमपूज्य जंगली महाराजांच्या पावन चरणांनी पवित्र झालेल्या पुण्यापासूनच त्यांच्या तीर्थयात्रेचा खरा प्रारंभ झाला.

यानंतर देहू, आळंदी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबईमार्गे गुजरातमध्ये प्रवेश झाला. डाकोरजी, राजकोट, गिरनार पर्वत, सुदामपुरी, मूळ द्वारका, भेट द्वारका, गोपी तलाव, कच्छ, भुज, मांडवी, कराची, अबू पर्वत, दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, टेहरी गढवाल, धरासू, गंगोत्री-यमुनोत्री परिसर, उत्तरकाशी, गंगोत्री, वृद्ध केदार, त्रिजुगीनारायण, गौरीकुंड, केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, गोपीश्वर, चमोली, विष्णूप्रयाग, गोविंदघाट व शेषधारा येथे ते पोहोचले.

या संपूर्ण प्रवासात जितके उत्साही सद्गुरु होते, तितकेच उत्साही बालदास महाराजही होते. शेषधारा येथे बालदास महाराजांनी सद्गुरुंची विशेष सेवा केली—पाय दाबण्यापासून ते आंघोळीपर्यंत भक्तिभावाने सेवा केली.

तेव्हा सद्गुरु म्हणाले,
“बाळा, तू माझी फार सेवा करतोस. मला काय हवं, काय नको हे तू जाणतोस. तुझ्या अंतःकरणातील शुद्ध भाव मला आनंद देतात.”

यावर बालदास महाराज म्हणाले,
“आई-वडील, सद्गुरु आणि परमेश्वर यांच्यापेक्षा या जगात मोठं काय आहे? साऱ्या जगाची किंमत त्यांच्या पुढे फिकी आहे.”

अशी ही गुरु-शिष्यांची हृदयस्पर्शी संवादमाला झाली. त्यानंतर प्रवास पुढे सुरू झाला.

पांडुकेश्वर, जोशीमठ, बद्रीनाथ, हेमकुंड, भविष्यबद्री, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, श्रीनगर, कोटकाशी, बनारस, अयोध्या, गयापूर व जगन्नाथपुरी अशी तीर्थयात्रा पूर्ण झाली.

जगन्नाथपुरी येथे पुढील दक्षिण भारतातील यात्रा बालदास महाराजांशी सविस्तर चर्चा करून ठरविण्यात आली. मनमाड, सखी गोपाळ, रामेश्वर, धनुष्कोटी, विजयवाडा, गोदावरी, किष्किंधा, गाणगापूर, पंढरपूर अशी अनेक पवित्र स्थळे दर्शनाने पावन केली.

सुमारे आठ महिन्यांनंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज नेर्ले गावी परतले. त्या वेळी त्यांच्या देहावर एक विलक्षण तेज बालदास महाराजांना दिसून आले. जणू त्यांनी नवीन देह धारण केला आहे, अशीच अनुभूती त्यांना झाली.

उत्तराखंडातील तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज नेर्लेच्या मठात राहिले, तर बालदास महाराज आपल्या सौते गावी परतले. सौते गावी परतल्यावर महाराज आपल्या प्रवासातील अनुभव सर्वांना सांगू लागले.

प्रकरण दहावे: सद्गुरुंची मेवा

"आघवियांची दैवा | जन्मभूमी दे मेवा" (ज्ञा. म.)

हिंदुस्थानची पदयात्रा पूर्ण करून आल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज नेर्ले गावच्या मठात तपश्चर्या करीत थांबले. त्यांची प्रकृती आता थोडी थकू लागली होती. तरीसुद्धा योगासने करणे, समाधी लावणे व उतरविणे इत्यादी योगीपुरुषाला आवश्यक असलेली कर्मे नित्यनियमाने सुरूच होती.

एके दिवशी सद्गुरुंनी बालदास महाराजांना जवळ बोलावून सांगितले,
“थोड्याच दिवसांचा मी तुझा सोबती आहे. मला माझ्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पुढे वाटचाल करणे भाग आहे.”

हे ऐकताच बालदास महाराजांचे डोळे पाण्याने भरून आले. वळवाचा पाऊस जसा अचानक कोसळतो, तसेच बालदास महाराज घळाघळा रडू लागले. आपल्या सद्गुरुंनी आपल्याला सोडून जावे, असे कोणत्या शिष्याला वाटेल? बालदास महाराज क्षणभर कावरेबावरे झाले. त्यांना काहीच सुचेना. मग भरलेल्या अंतःकरणाने ते सद्गुरुंना म्हणाले,

“महाराज, आपण माझ्या गावी चला आणि तेथेच आपला पवित्र देह ठेवा. महाराज, हीच माझी शेवटची इच्छा आपल्या चरणी आहे. आपण ती पूर्ण करावी.”

त्यावर चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकावत सद्गुरु म्हणाले,
“अरे, असे का बोलतोस? तू आणि मी दोन आहोत काय? तू म्हणजेच मी आहेस आणि मी म्हणजेच तू आहेस.”

यानंतर बालदास महाराज सद्गुरुंच्या जवळच कायम बसून राहू लागले. एक क्षणही वाया न घालवता त्यांनी गुरुसेवेला स्वतःला वाहून घेतले. गुरुंच्या चरणांवर हात फिरवणे, छातीला कान लावून हृदयाचे ठोके ऐकणे—हीच त्यांची सेवा बनली.

कधी कधी सद्गुरु आपल्या सुखस्वप्नांची गोष्ट सांगत. मध्येच थांबून कर्तव्याची जाणीव करून देत. हे ऐकताना बालदास महाराज समाधानी होत, तरीही आपला देव, आपला गुरु, आपले सर्वस्व आपल्या सान्निध्यातून दूर जाणार—ही भावना त्यांना विसरता येत नव्हती. गुरुंच्या गमनाची क्षणभर आठवण झाली, तरी बालदास महाराजांच्या डोळ्यांत गहिवर येई. गुरुंची नजर त्यांच्या नजरेला भिडली की ते आपले अश्रू आवरून डोळे मिटत. त्या नेत्रमंदिरात पुन्हा गुरुंची मूर्ती अधिष्ठित होत असे.

बालदास महाराजांच्या अंतरीचे दुःख ओळखून सद्गुरु म्हणाले,
“बाळू, हा मानवदेह फार मौल्यवान आहे. या जन्माची खरी किंमत फार थोड्या लोकांना कळते. ज्याचा देह विधात्याच्या कसोटीवर उतरतो, तो धन्य होतो. बाळू, हे जाणून घे. तुझ्यातच मी सामावलो आहे, असे सांगूनही तू दुःखी का दिसतोस?”

हे ऐकल्यावर बालदास महाराज शांत झाले. थोडा वेळ गेल्यावर त्यांनी विचारले,
“महाराज, आपल्या पश्चात मी काय करावे?”

सद्गुरु म्हणाले,
“बाळू, तुझी इच्छा असेल तर माझी आठवण म्हणून तू माझी समाधी बांध.”

हे गुरुंचे अखेरचे भाव जाणून बालदास महाराज म्हणाले,
“सद्गुरु, मी आपणाला वचन देतो की आपली समाधी बांधून आपली इच्छा पूर्ण करीन आणि परमेश्वराच्या नामस्मरणाचा मंत्र सामान्य माणसांपर्यंत पोहोचवीन.”

हे वचन ऐकून गुरुंच्या श्रुती धन्य झाल्या.

इ.स. १९४७ साली कार्तिक वद्य एकादशी, सोमवार या दिवशी सद्गुरु नेर्लेकर महाराज समाधिस्थ झाले. पद्मासनात समाधिस्थ झालेली ती सगुण मूर्ती पाहण्यासाठी नेर्ले गाव व आजूबाजूचा परिसर लोटला होता. स्त्री-पुरुषांनी डोळे भरून त्या मूर्तीचे दर्शन घेतले. सर्वांचे नेत्र कृतार्थ झाले.

त्याच वेळी बालदास महाराज त्या मूर्तीला कवटाळून उभे होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. त्या अश्रुगंगेतून गुरुंच्या मस्तकावर अभिषेक होत होता. गुरुंचे सारे अंग जणू न्हाऊन निघाले होते.

गुरुला दिलेले वचन बालदास महाराजांनी तत्क्षणी पूर्ण केले. बांधलेल्या समाधीभोवती धूप दरवळू लागला. दीपांच्या सोनेरी प्रकाशात समाधी उजळून निघाली. चंदनाच्या सड्यांनी समाधी तृप्त झाली. समाधीभोवतालची पाच-दहा फूट जागा चंदनाच्या सुगंधाने न्हाऊन निघाली. समाधीवर चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या आणि त्या पादुकांसमोर बालदास महाराज आपल्या नयनांतील प्रेमाश्रू ढाळीत शांतपणे बसले.

प्रकरण अकरावे: कापशीच्या मठातून महाराजांचे स्थलांतर

"सर्वस्वाचा त्याग तो सदा मोकळा" (तु. म.)

कापशी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील मठाचे बांधकाम दासचंद महाराजांनी सुरू केले. त्या वेळी त्यांच्या समवेत बालदास महाराज व बंडू महाराज हे दोघेही होते. या तिघांमध्ये एकमेकांवर अपार बंधुभावाचे प्रेम होते. दासचंद महाराज बालदास महाराज व बंडू महाराज यांना वडीलबंधूप्रमाणे मानत असल्यामुळे त्यांनी जे सांगितले, ते बालदास महाराज मनापासून पाळत असत.

बालदास महाराज भिक्षा मागून आणत असत, तर दासचंद महाराज स्वयंपाकात व्यस्त असत. दासचंद महाराजांनी जितकी घरे भिक्षेसाठी सांगितली, तितकीच घरे बालदास महाराज मागून येत असत.

दासचंद बाबा, बंडू महाराज व बालदास महाराज हे तिघेही तब्बल तीस वर्षे एकत्र राहिले.

या तीस वर्षांच्या कालावधीत बालदास महाराजांनी अध्यात्मज्ञानाचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर भारतीय धार्मिक ग्रंथांचे व्यापक वाचनही केले. केवळ ग्रंथवाचनापुरतेच न थांबता, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य उभारण्याकडेही त्यांनी लक्ष दिले. याच कालखंडात कापशीच्या मठाच्या बांधकामाला वेग आला.

दासचंद महाराजांच्या आदेशानुसार कापशीच्या मठाचे संपूर्ण कामकाज बालदास महाराज पाहत होते. बालदास महाराज व बंडू महाराज या दोघांनी दासचंद बाबांचा शब्द प्रमाण मानून मठाचे बांधकाम जबाबदारीने सांभाळले. निधी संकलनापासून प्रत्यक्ष शारीरिक कष्टांपर्यंत सर्व कामे या दोघांनी निष्ठेने पार पाडली. या मठाच्या उभारणीत बंडू महाराज व बालदास महाराज यांचा वाटा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल.

बालदास महाराजांनी या मठासाठी घेतलेले परिश्रम अत्यंत मोलाचे होते. मठ पूर्ण झाल्यानंतर त्या तिघा गुरुबंधूंना जो आनंद झाला, तो शब्दांत मांडता येण्यासारखा नव्हता. एखादे महत्त्वाचे कार्य हातात घेऊन अनेक अडचणींवर मात करून ते पूर्ण झाल्यावर जो समाधानाचा आनंद मिळतो, तोच आनंद बालदास महाराजांना झाला.

कापशीचा मठ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कष्टांची माहिती बालदास महाराज आपल्या संगतीतील भक्तांना सांगत असत. मात्र म्हणतात ना—

“आले देवाजीच्या मना,
तेथे कोणाचे चालेना”

याच भावनेप्रमाणे बालदास महाराजांनी अखेरीस कापशीचा मठ सोडला.

प्रकरण बारावे: महाराजांचा अन्नत्याग

“विवेकासहित वैराग्याचे बळ | धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा ||” (तु. म.)

कापशी येथे असतानाच महाराजांनी अन्नत्यागाचा निश्चय केला. आपण अन्न न घेताही जगू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना दाखवून दिले. कापशी येथे घेतलेला अन्नत्यागाचा संकल्प त्यांनी देह ठेवेतपर्यंत अखंडपणे पाळला. यावरून त्यांच्या स्वभावातील दृढता आणि त्यांच्या अद्भुत सामर्थ्याची स्पष्ट प्रचीती येते. हे सामान्य माणसाचे काम नव्हे; त्यासाठी असामान्य आत्मबळ आणि तपश्चर्या आवश्यक असते, असेच म्हणावे लागेल.

बालदास महाराज अन्न ग्रहण करत नसत. मग ते काय घेत असत, असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. महाराज फक्त लिंबाचा पाला, निगडीचा पाला तसेच इतर झाडांचे पाले कधी कच्चे तर कधी शिजवून घेत असत. काही वेळा त्यात मीठ घालत, तर काही वेळा अगदी बिनमीठाचे सेवन करत. झाडांचा पाला हाच महाराजांच्या उपजीविकेचा आणि जीवनाचा आधार होता.

बालदास महाराजांनी तब्बल एकेचाळीस वर्षे अन्नाचा त्याग केला. शास्त्रानुसार मानवाला जीवनासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे व घटकद्रव्ये अन्नातून मिळणे गरजेचे मानले जाते. परंतु हा नियम प. पू. बालदास महाराजांना लागू पडला नाही. कारण बालदास महाराज हे प्रत्यक्ष परमेश्वरस्वरूप होते. एकेचाळीस वर्षे अन्नत्याग करूनही महाराज जगले—मग ते अलौकिक सामर्थ्यसंपन्न संत नव्हते काय?

सुमारे दहा ते बारा वर्षे महाराज अंथरुणावरच होते. त्या काळात त्यांची सेवा भक्तगण करीत असत. या दीर्घ कालावधीतही महाराजांनी अन्नाला कधीच स्पर्श केला नाही. त्यांची सेवा करणारे अनेक भक्त आजही जिवंत असून, त्यांचे अनुभव भाविकांनी ऐकण्यासारखे आहेत.

१९३५ साली अन्नत्यागाचा संकल्प केलेले महाराज १९७५ सालापर्यंत कसे जगले, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो. याचे उत्तर असे की येथे सर्व शास्त्रीय नियम अपुरे पडतात. ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला, त्यांनाच हे समजू शकते; ज्यांनी अनुभव घेतला नाही, त्यांना कदाचित हे कधीच उमगणार नाही. कदाचित येथे लिहिलेले सत्यही त्यांना अविश्वसनीय वाटेल. तरीही लिहिताना, माझ्या प्रामाणिकपणाशी कोणतीही तडजोड न करता, जे सत्य आहे तेच भक्तांसमोर आणि समाजासमोर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

प्रकरण तेरावे: सौते मठाचे काम पूर्ण

“सत्यसंकल्पाचा दाता नारायण | सर्व करी पूर्ण मनोरथ ||” (तु. म.)

सौते मठाचे बांधकाम काही काळासाठी बंद पडले होते. बांधकाम सुरू असताना असो वा ते थांबलेले असताना असो—बालदास महाराज गुरूंच्या इच्छेनुसार विविध तीर्थक्षेत्रांना जात असत. त्यामुळे मठाचा पसारा तसाच पडून राहिला होता. बांधकामाचा पुढाकार घेणारे सत्पुरुष जर तेथे उपस्थित नसतील, तर तो भार उचलणार तरी कोण?

अखेर बालदास महाराजांनी रात्रंदिवस परिश्रम करून सौते मठाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली. अनेक लोकांच्या गाठीभेटी घेऊन अपुरे बांधकाम पूर्ण करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला. स्वतः पाट्या भरून वाळू-सिमेंट वाहून दिले. भिंती उभारण्यासाठी दगड उचलून गवंड्यांना बांधकामात प्रत्यक्ष मदत केली. महाराज कामाला लागले की दहा माणसांचे काम ते एकटेच झपाट्याने करून दाखवत असत.

रात्री काम करताना महाराज बत्तीचा, तर प्रसंगी दिवटीचाही उपयोग करत. मठाचे काम नीट आणि दर्जेदार व्हावे यासाठी ते गवंड्यांना नेहमी समजावत असत. ते म्हणत,

“अरे, हे देवाचं काम आहे. यात फक्त खायचा विचार करू नकोस. आळस करून वेळ काढू नकोस. जे करायचं आहे ते नीतीनं आणि प्रामाणिकपणानं कर. तू जर हे देवाचं मंदिर चांगलं बांधलंस, तर या जगात तुझं कोणीही वाईट करणार नाही. आपण कोणताही धंदा करत असलो, तरी त्या धंद्यात प्रामाणिकपणा हवाच.”

सद्गुरु बालदास महाराजांचे हे बोल ऐकून गवंडी नम्रपणे म्हणत असत,
“हो महाराज, कुठं कसं वागावं आणि कुठं कसं दिवस बेरजेवर काढावं, हे आम्हाला कुठं कळतं हो. तुम्ही एवढा जीवाचा आटापिटा कशासाठी करता, हेच आम्हाला उमगत नाही.”

त्यावर महाराज हसत उत्तर देत,
“अरे, माणसाला या जगात सगळं कळत असतं, पण वळत नाही—हा खरा प्रश्न आहे. यावर उपाय काय? तूच सांग. लबाड बोलू नये हे सगळ्यांना पटतं, पण खरं किती लोक बोलतात? राग मानू नकोस. आपल्यासमोर आदर्श ठेवून कामाला सपाटा लाव.”

अशा प्रेमळ, तरीही टोचणाऱ्या शब्दांनी गवंडी नव्या जोमाने कामाला लागत असत. महाराजही हसतमुखाने लागेल ती मदत गवंड्यांना करत राहात.

अतोनात परिश्रम घेऊन बालदास महाराजांनी सौते गावचा मठ उभारला. गावकऱ्यांनीही त्यांना भरपूर सहकार्य केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून अखेर सौते गावचा मठ साकार झाला. हा मठ इ. स. १९५० साली पूर्ण झाला.

मठ पूर्ण झाल्यानंतर परिसरातील सर्व लोकांना अत्यंत आनंद झाला. तो मठ संपूर्ण गावाचे व आसपासच्या परिसराचे तीर्थक्षेत्र बनला. त्या मठातच आपले सद्गुरु प. पू. श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांचा फोटो व पादुका बालदास महाराजांनी पूजेसाठी स्थापित केल्या. भजन, पूजन, वाचन आदी धार्मिक विधींनी मठाचा गाभारा निनादू लागला. अध्यात्मज्ञानाच्या चर्चा तेथे घडू लागल्या आणि बालदास महाराजांच्या सान्निध्यातील भक्तांना स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळू लागला.

प्रकरण चौदावे: श्री गुरु मूर्ती स्थापना

“ब्रह्ममूर्ती संत” (ना. म.)

सौते गावच्या मठाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बालदास महाराजांनी त्या मठात प्रथम आपल्या सद्गुरूंची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा संकल्प केला. या संदर्भात त्यांनी आपल्या एका आवडत्या भक्ताला विचारले,
“मी मठात माझ्या गुरूंची मूर्ती बसविण्याचा विचार केला आहे.”

हे ऐकताच आनंदी मुद्रेने तो भक्त म्हणाला,
“फारच छान! पण आपण मूर्ती कशाची बसवणार?”

“म्हणजे तुला काय विचारायचं आहे?” असे महाराजांनी शांतपणे विचारले. भक्ताला क्षणभर वाटले की महाराजांना राग आला की काय, म्हणून त्याने हात जोडून नम्रपणे विचारले,
“आपण जी गुरूंची मूर्ती बसवणार, ती कोणत्या प्रकारची असणार? म्हणजे गारेची, शाडूची, दगडाची की संगमरवरी?”

त्यावर महाराज म्हणाले,
“राजस्थानला जाऊन संगमरवरी मूर्ती आणण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी थोडी पैशांची जमवाजमव करावी लागेल.”

हे ऐकून आवडता भक्त म्हणाला,
“आपण मागाल ते आम्हा भक्तांकडे मिळेल. तुमच्या शब्दासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग करू. आपण याची काहीच चिंता करू नका.”

महाराज म्हणाले,
“ठीक आहे. मग कधी जाऊया?”

“आपण सांगाल तेव्हा.”

“आणि मूर्ती कुठून आणायची?”

महाराज हसून म्हणाले,
“अरे बाबा, ते तर मी आत्ताच सांगितलं. वाटतंय तुझ्या मनात पैशांचाच विचार सुरू आहे, म्हणून मूळ मुद्दाच विसरलास.”

भक्त लाजत म्हणाला,
“हो महाराज, आपलंच बरोबर आहे. संगमरवरी मूर्ती म्हणजे कितीतरी हजारांचा प्रश्न. म्हणून मी विचार करत होतो की किती पैसे बरोबर घ्यावेत.”

महाराज हसत म्हणाले,
“अरे, तुला जेवढे जमवता येतील तेवढे घे. उरलेल्या पैशांची चिंता करू नकोस. देवाच्या मूर्तीबाबत माणसाने चिंता कशाला करायची?”

हे ऐकून भक्ताला मोठा आधार वाटला. जाण्याचा दिवस गुरुवार ठरला. महाराज मूर्ती आणण्यासाठी मठातून बाहेर पडले. मठातून बाहेर पडताच दोन भारद्वाज पक्ष्यांनी त्यांना दर्शन दिले. एकामागोमाग एक असे ते दोन्ही पक्षी उड्डाण करून रस्त्याच्या दुतर्फा निघून गेले.

महाराज भक्ताला म्हणाले,
“बघितलेस का हे पक्षी? देवाने आपल्या स्वागतासाठीच त्यांना पाठवले असावेत. आपण मठातून बाहेर पडताच देवाने त्यांना आज्ञा दिली असावी.”

त्यावर भक्त आनंदाने म्हणाला,
“आपल्या हिंदू संस्कृतीत भारद्वाज पक्षी (कुक्कुट कोंबडा) शुभशकुन मानला जातो. आपला प्रवास नक्कीच यशस्वी होईल.”

महाराज हसून म्हणाले,
“अरे वेड्या, देवाच्या कामाला कधी अडथळा येत नसतो. आणि आला तरी देव त्यावर समर्थ असतोच.”

अशा प्रकारचे संभाषण होत असतानाच महाराज भक्तांसह मलकापूर येथे आले. तेथे आणखी काही भक्त त्यांच्या सोबत जाण्यास तयार झाले. अशा भक्तांच्या गोतावळ्यासह महाराज राजस्थानकडे निघाले.

कोल्हापूर येथे पोहोचताच एक अज्ञात भक्त महाराजांच्या दर्शनासाठी आला. महाराजांनी त्याला आपल्या कुंचकीतून प्रसाद दिला. त्या भक्ताने महाराजांच्या हातात नोटांचे एक बंडल दिले आणि म्हणाला,
“मूर्ती ठरवताना मोजा,”
असे सांगून तो अज्ञात भक्त निघून गेला.

ही घटना महाराजांनी कुणालाही सांगितली नाही. नोटांचे बंडल त्यांनी शांतपणे आपल्या कुंचकीत ठेवले आणि पुढील प्रवास सुरू केला.

तीन दिवसांनी महाराज राजस्थान येथे पोहोचले. तेथे त्यांनी अनेक मूर्तिकारांची भेट घेतली. अखेर अस्सल दर्जाचा एक कलाकार शोधून काढला. त्याला महाराज म्हणाले,
“बाबा, तू माझ्या गुरूंची मूर्ती तयार करून दे. चांगल्या संगमरवराची, तेजस्वी आणि जिवंतपणा असलेली मूर्ती तूच बनवावी, असे मला वाटते.”

मूर्तिकाराने महाराजांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहिले. क्षणभर थांबून तो म्हणाला,
“आपला शब्द मी झेलतो, पण यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल.”

महाराज म्हणाले,
“चालेल, पण मूर्ती गुरूंच्या फोटोसारखीच असली पाहिजे.”

मूर्तिकार म्हणाला,
“अॅडव्हान्स म्हणून दोन हप्त्यांत रक्कम द्यावी लागेल. करारनामा मी करून देईन.”

भक्तांकडे पाहत महाराज म्हणाले,
“सर्व अटी मान्य. पण एकच विनंती आहे—मला ही मूर्ती शक्य तितक्या लवकर हवी आहे.”

मूर्तिकाराने विचारले,
“एवढी घाई का महाराज?”

महाराज भावुक होत म्हणाले,
“ज्या लेकराची आई कायमची या जगातून निघून गेली आहे, ती आई जर त्याला पुन्हा मूर्तिरूपात दिसली, तर त्या लेकराला जो आनंद होईल, तोच आनंद मला माझ्या सद्गुरूंची मूर्ती पाहिल्यावर सदैव मिळणार आहे. त्या आनंदासाठीच मी आतुर झालो आहे.”

मूर्तिकार म्हणाला,
“महाराज, आपल्या भावना मला समजल्या. मी तसा प्रयत्न नक्की करीन.”

अॅडव्हान्स रक्कम देऊन करारनामा झाला. महाराजांनी सद्गुरूंचा फोटो मूर्तिकाराकडे सुपूर्द केला. चहापान झाले आणि महाराज भक्तांसह सौते गावच्या मठाकडे परतले.

प्रकरण पंधरावे: सौते मठात इतर मूर्तींची स्थापना

“ठेव भाग्ये घरा । येती संपत्ती त्या सकळा ॥” (तु. म.)

सौते गावचा मठ बालदास महाराजांनी आपल्या सद्गुरूंची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित करून पावन केला. अनेक हजार रुपये खर्च करून गुरूंची मूर्ती बसविल्यानंतर महाराजांचे मन अत्यंत शांत झाले. सौते मठात दररोज भजन-पूजन नियमितपणे होऊ लागले. गुरूंच्या मस्तकावर पंचामृताचा अभिषेक दररोज विधीपूर्वक घडू लागला. त्या अभिषेकाच्या वेळी बालदास महाराज अंतःकरणाने तृप्त होत. त्यांना असे वाटे, जणू काही आपले सद्गुरूच तो अभिषेक प्रत्यक्ष स्वीकारत आहेत.

गुरूंच्या समोर नित्यनियमाने फुलांचा आणि सुगंधी द्रव्यांचा वर्षाव होऊ लागला. अनेक स्त्री-पुरुष भक्तांनी गुरूंच्या चरणी फळे-फुले अर्पण केली. अक्षरशः फळा-फुलांचा पाऊस पडत असे. फळे-फुलांचे ढीग महाराजांच्या समोर साचू लागले.

गुरूंच्या मूर्तीच्या स्थापनेनंतर बालदास महाराजांनी सौते गावच्या मठात आणखी अनेक देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या. या सर्व मूर्ती संगमरवरी आहेत. यांपैकी श्री विष्णू, लक्ष्मण, राम, सीता, विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्ती मुख्य गाभाऱ्यात आहेत. तसेच श्री दत्तगुरू, हनुमान, गरुड, शंकर, गणपती व सरस्वती यांच्या मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत.

या सर्व संगमरवरी मूर्तींवर स्वतंत्र अशी लहान-लहान देवळे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक देवळ्याला स्वतंत्र दार आहे. मुख्य गाभाऱ्याच्या समोर या मूर्ती गाभाऱ्याकडे तोंड करून उभ्या आहेत. त्यामुळे असे भासते की सर्व देवतांच्या सान्निध्यात बालदास महाराजांचे सद्गुरू जणू ध्यानमग्न अवस्थेत विराजमान झाले आहेत. देवांच्या या पवित्र मेळाव्यात आपला देव-गुरू पाहून महाराज अत्यंत समाधानी होत.

“मी माझ्या देवाला देव्हाऱ्यात एकटा ठेवलेला नाही, तर सर्व देवांच्या समवेत अधिष्ठित केले आहे,”
असे बालदास महाराज कधी कधी भक्तांना सहजपणे सांगत.

प्रकरण सोळावे: मोठ्या मठाचा त्याग

“भोग भोगावरी द्यावा । संचिताता करुनी ठेवा ॥” (तु. म.)

एके दिवशी अचानक बालदास महाराजांनी सौते मठाचा त्याग केला. महाराज सावर्डे येथे जाऊन गणपती पाटील यांच्या साध्या छपरात राहू लागले. तेथे त्यांची सेवा करणारे अनेक भक्त हळूहळू गोळा होऊ लागले. बजागवाडी, कोपर्डे, सौते, शिरगाव, कोकरुड, सावे, सावर्डे, सांबू मोळवडे इत्यादी गावांतील भक्त महाराजांच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ लागले. महाराजांच्या सेवेसाठी हे भक्त रात्रंदिवस तत्पर असत.

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून एखादा भक्त महाराजांच्या दर्शनासाठी आला, तर तो थेट गणपती पाटलांच्या त्या छपराकडेच जाई. कारण महाराजांचा—त्यांचा देव—तेथे वास्तव्यास होता. ज्याच्या भेटीची आतुरता आहे, तो भक्त तिथेच जाणार नाही तर कुठे जाणार?

महाराज साध्या पाल्याच्या छपराखाली राहत होते. त्या छपराला कामट्याचे तात्पुरते दार होते. अशा अत्यंत साध्या जागेत प्रत्यक्ष परमेश्वरच जणू वास करीत होता. याच छपरात महाराज झाडपाला शिजवीत आणि घोंगडीवर विसावून राहत. पाचोळ्याच्या छपराखाली त्यांचे जीवन अत्यंत साधेपणाने, पण तेजस्वी तपश्चर्येत चालू होते.

गणपती पाटलांच्या सावर्डे गावच्या रानातील या छपरात वास्तव्यास असतानाच महाराज कधी कधी सौते मठात येत. मठात झाडलोट करून स्वच्छता करत आणि आपल्या सद्गुरूंच्या मूर्तीला भक्तिभावाने कवटाळून मिठी मारत. अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ते गुरुमूर्तीची पूजा बांधत. कधी कधी एखादा दिवस तेथेच थांबतही असत; परंतु असे प्रसंग फारच विरळ होते.

या छपरात महाराज सलग तीन वर्षे राहिले. त्यानंतर महाराज शिरगाव येथे रामचंद्र पाटील यांच्या घराच्या पडवीला बांधलेल्या खोलीत काही काळ वास्तव्यास गेले. त्याच ठिकाणी अखेर महाराजांनी आपला देह ठेवला.

प्रकरण सतरावे: स्वभाव

सहज बोलणे हितउपदेश । (तु. म.)

महाराज लहानपणी दिसायला फारच गोंडस होते. त्यांची मूर्ती काळीसावळी व गोजिरीवाणी होती. अंगकाठी धडधाकट, कपाळ भव्य, आणि शरीर तेजस्वी दिसत असे. अंगावरचे काळेभोर, बारीक केस त्यांच्या उघड्या शरीरावर अप्रतिम शोभून दिसत.

वय आणि ज्ञान वाढत गेले तसे महाराजांकडे भक्तगण जमा होऊ लागले. त्यांना भक्तांचा मेळावा आवडू लागला. महाराजांची देहयष्टी जशी भव्य होती, तसेच त्यांचे मनही विशाल होते. सागर जसा सर्व काही आपल्या पोटात सामावून घेतो, तसे महाराज वाटत. चांगल्या-वाईट अनुभवांतून गेले तरी त्यांनी कधीही वाईटांना तुच्छ लेखून दूर लोटले नाही. दुर्जनांनाही ते उपदेश करत आणि चांगले वागण्याचे शिक्षण देत.

जमीनीवर लोळणाऱ्या जटा, सुमारे सहा फूट उंची, म्हशीच्या पोकडीसारखी दाढी आणि रुंद छाती असलेले महाराज बोलू लागले की ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन गप्प बसत असे. जणू एखाद्या प्रचंड फौजदारासमोर शिपाई उभा राहावा, तसे भक्तगण त्यांच्या समोर उभे राहत. महाराजांच्या पुढे बोलण्याचे कोणाचेही धाडस नसे. महाराज जे सांगतील ते भक्त निमूटपणे ऐकत.

एकदा एक मुलगी महाराजांकडे आली व म्हणाली,
“महाराज, मी फार मोठी चूक केली आहे. ती उणीव मी आयुष्यभर भरून काढू शकणार नाही. मला फार पश्चात्ताप होतो आहे. आता मी काय करू?”

महाराज शांतपणे म्हणाले,
“झाली चूक, होऊ दे. जे झाले ते विसर. तुझा पश्चात्ताप हीच तुझी मोठी शिक्षा आहे. यापेक्षा दुसरी शिक्षा नको. मात्र पुढे पुन्हा अशी चूक करू नकोस.”

महाराजांनी घाबरलेल्या मुलीला असा धीर दिला.

एकदा एक हरिजन गृहस्थ महाराजांकडे आला. महाराजांची कीर्ती ऐकून तो प्रथमच मठात आला होता. महाराजांनी त्याला प्रेमाने जेवायला बसवले. तो पत्रावळीवर जेवला. जेवणानंतर महाराजांनी त्याला आपल्या पेल्यातून पाणी पिण्यास दिले. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला,
“मला पाणी वरून वाढा.”

महाराज म्हणाले,
“तू आणि मी यात भेद मानू नकोस. देवाने कधीच भेदभाव शिकवलेला नाही. हा भेद माणसाने निर्माण केला आहे.”

यानंतर अधिक न बोलता तो गृहस्थ महाराजांच्या पेल्यातून पाणी प्याला. महाराज हसत म्हणाले, “खुळा रे खुळा!”

एकदा एक भक्त कोर्टाच्या कामासाठी निघाला होता. वाटेत त्याला पाण्याची घागर आडवी दिसली. हा शुभशकून समजून त्याने मठात येऊन महाराजांना सांगितले. महाराज म्हणाले,
“तुझे काम होण्याचा योग आहे.”

एकदा एका भक्ताचे आपल्या भावाशी भांडण झाले. भावाने त्याला काठीने जोरात मारले. मारणाऱ्या व्यक्तीला महाराजांनी मठात बोलावले. प्रश्न विचारण्यापूर्वीच तो म्हणाला,
“माझी चूक झाली आहे, मला माफ करा,”
आणि थरथरत उभा राहिला. महाराजांची नजर पडताच तो हुंदके देत रडू लागला. महाराजांनी त्याला खाली बसवून बंधुप्रेम समजावून सांगितले.

एक भक्त संध्याकाळी महाराजांचे अंथरूण घालण्यासाठी मठात गेला. महाराज म्हणाले,
“माझे हात-पाय धड आहेत. तोपर्यंत दुसऱ्यांनी माझी सेवा कशाला करावी?”

एकदा एका भक्ताने काटवेलीची भाजी आणली. त्या भाजीत मीठ नव्हते. महाराज म्हणाले,
“मीठ असो वा नसो, आम्हाला सारखेच.”

एक सेठसावकार चार धोतरं व चार दंडक्या घेऊन आला. महाराज म्हणाले,
“मला एवढे कपडे लागत नाहीत. दोन धोतरं आणि दोन दंडक्या पुरेशा आहेत. त्यावरच माझे वर्ष निघते.”

यातून महाराजांची मितव्ययी वृत्ती स्पष्ट दिसते.

एकदा मुंबईहून आलेल्या भक्ताने विचारले,
“महाराज, तुम्ही किती तास झोपता?”
महाराज म्हणाले,
“अनेक वर्षे झाली, दोन तासांपेक्षा जास्त मी कधी झोपलो नाही.”

महाराजांना झोपेचे विशेष आकर्षण नव्हते.

महाराज नेहमी गुरुंच्या मूर्तीच्या सान्निध्यात बसत आणि तिथेच झोपत. गुरुचरणांवरील त्यांचे प्रेम अतूट होते.

तरुणपणी महाराजांचा परिसर घनदाट झाडीने वेढलेला होता. मठाजवळ जंगल होते, जिथे अनेक जंगली प्राणी राहत. तरीही महाराज कोणत्याही वेळी निर्भयपणे त्या जंगलातून जात-येत.

महाराज शिजवलेला किंवा कच्चा झाडपाला खातानाही आधी गुरुंना नैवेद्य दाखवत. गुरुची पूजा करताना असे वाटे की जणू गुरु स्वतः त्यांच्याशी बोलत आहेत.

महाराजांच्या स्वभावात दंभ व अभिमान नव्हता; मात्र क्षमा, नम्रता व अहिंसा हे सद्गुण ठासून भरलेले होते.

महाराजांना पाया पडून घेणे आवडत नसे. लोकांची श्रद्धा लक्षात घेऊन ते लांबून दर्शन देत. काही वेळा ते म्हणत,
“देवाच्या पाया पडा. जो जगाचा पालनकर्ता आहे त्याला शरण जा. माझ्या पाया पडून तुम्हाला काय लाभ?”

तेव्हा भक्त म्हणत,
“आम्हाला आपल्यात देव दिसतो. आपण ज्ञानाचे सागर आहात म्हणून आम्ही नतमस्तक होतो.”

महाराजांना सर्वत्र मोठा मान होता. त्यांचे भक्त खेड्यांपासून शहरांपर्यंत पसरलेले होते. तरीही त्यांना कधीही गर्व झाला नाही.

तात्पर्य:
महाराज सात्त्विक स्वभावाचे, ज्ञानी, धैर्यशील व करुणामय होते. दया, क्षमा आणि शांती यांचे ते सजीव प्रतीक होते.

प्रकरण अठरावे: जनकल्याणार्थ देह झिजविला

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ॥” (तु. म.)

गुरुंच्या पावलावर पाऊल ठेवून आपले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बालदास महाराजांनी आयुष्यभर केले. सौते, शिरगाव, सावे, सावर्डे, मोळवडे, पेरीड, गाडयाचीवाडी, सागाव, कऱ्हाड, सातारा, पंढरपूर इत्यादी अनेक ठिकाणी महाराजांनी भ्रमंती केली आणि आपल्या अध्यात्मिक व सामाजिक कार्याची ठसा उमटवला.

“संसार करावा नेटका,” असे सांगत संसारात राहूनही परमार्थ कसा साधता येतो, याचे मार्गदर्शन त्यांनी जन्मभर लोकांना केले. प्रत्येक गावात प्रमुख भक्ताच्या घरी किंवा चावडीवर जनसमुदाय जमवून प्रश्न–उत्तरांच्या माध्यमातून ते ज्ञानदान करत. अनेकदा विविध धर्मांचे व जातींचे लोक त्यांच्या समोर असत. अशा वेळी महाराज अत्यंत कौशल्याने सांगत की सर्वांचा देव एकच आहे. हिंदू, मुसलमान, शीख अशा कोणत्याही धर्मात परमेश्वर वेगळा नाही, ही भावना सर्वांच्या मनात दृढ करत. ते म्हणत, सर्व धर्मांचा एकच उपदेश आहे —
“अवघ्यावर प्रीत करावी.”
अशा प्रेमपूर्ण चर्चेनंतर महाराज सर्वांना आपुलकीने निरोप देत.

थोडक्यात सांगायचे तर महाराजांनी अनेक संस्कारकेंद्रे निर्माण केली होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

कधी कधी महाराज लहान मुलांचा मेळावा जमवून त्यांना स्वच्छतेचे धडे देत. अंगण कसे झाडावे हे खराटा हातात घेऊन दाखवत, घर कसे स्वच्छ करावे हे केरसुणीने समजावून देत. घराभोवती गटारे उघडी नसावीत, राहत्या घरात जनावरे ठेवू नयेत, हे ते प्रभावीपणे पटवून देत.
“घरातील मोठ्यांना सांगा — जनावरे घराबाहेर छप्पर घालून बांधा,” असेही ते मुलांना सांगत.

महाराज मुलांना देवधर्माचे व सदाचाराचे संस्कार करणाऱ्या गोष्टी सांगत. जेवताना कसे बसावे, कसे खावे याचेही मार्गदर्शन करत.
“जगात एक मोठा देव आहे. त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. आपण त्याची भक्ती केली पाहिजे. खरे बोलले पाहिजे. खोटे बोलल्यास देव शिक्षा करतो,” असा उपदेश त्यांच्या बालमनावर खोलवर कोरला जाई.

“महार, मांग, चांभार असे जातींचे उल्लेख का करायचे?” असा प्रश्न महाराज अनेकदा उपस्थित करत.
“आपण सगळे एकाच परमेश्वराची लेकरं आहोत, मग जातीभेद का?” असे ते ठामपणे सांगत. महाराज कधीही हरिजनांना वेगळ्या कपात चहा देत नसत. भेदाभेद त्यांना अमंगळ वाटे. ते सर्वांशी समानतेने वागत.

सर्व समाजाला समान सुख मिळावे, कोणतीही व्यक्ती दुःखी राहू नये, अशी महाराजांची भूमिका होती. म्हणूनच ते म्हणत —
“कष्टाचे खा, फुकटाचे खाऊ नका. घाम गाळून काम करा, देव अन्न देईल. आपण चांगले वागा आणि दुसऱ्यांनाही तसे वागायला शिकवा. आपला देश गरीब आहे; काम केल्याशिवाय खाण्याचा अधिकार नाही. आश्रमात अपंग व्यक्तीही स्वावलंबनाने जगतात, मग सुदृढ असून आयते का खायचे?”

महाराजांचा उपदेश सर्वांसाठी असे.
“सारे विश्वचि माझे घर” ही भावना त्यांच्या प्रत्येक विचारात दिसून येत असे.

गावोगावी भिक्षा मागताना महाराज घरामागील परसाकडे पाहत.
“इथे केळी, नारळ, भाजीपाला, लिंबू, मिरची, आंबा लावा. परसातून चांगले उत्पन्न मिळू शकते. जपानमध्ये इंचन्‌इंच जमीन लागवडीसाठी वापरतात, आणि आपण जमीन मोकळी ठेवतो,” असा उपदेश करत. याचा परिणाम म्हणून अनेक घरांचे परस हिरवळीने नटले.

घर नसलेल्या गरीबांसाठी महाराज श्रीमंतांना एकत्र बोलावून म्हणत,
“अरे श्रीमंतांनो, गरीबांची काळजी कोण घेणार? चला, या गरिबांना साधी कौलारू घरे बांधा. तुम्ही वाड्यात राहता, तुपरोटी खाता; गावातील गरिबांचा विचार तुम्ही नाही केला तर कोण करणार?”
या शब्दांनी लाजून श्रीमंत लोक मदतीला पुढे येत आणि गरिबांना निवारा मिळे.

कधी महाराज शाळा व हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षकांना म्हणत,
“तुम्ही मुलांना शिकवता, पण गावातील मोठी माणसे अडाणी आहेत. त्यांनाही मोकळ्या वेळेत शिकवले पाहिजे.”
या प्रेरणेने शिक्षक कार्याला लागत.

अशा रीतीने महाराजांना संपूर्ण समाजाची चिंता होती. सगळे सुखी व्हावेत, शिकलेले व्हावेत, सर्वांना चांगले दिवस यावेत, हीच त्यांची ध्यासवृत्ती होती. संपूर्ण देह त्यांनी जनकल्याणासाठी झिजविला.

“मना चंदनाचे परी त्वा झिजावे,
परी अंतरी सज्जना निववावे॥”

या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे बालदास महाराज आयुष्यभर झिजले. केवळ स्वतःच्या मोक्षासाठी नव्हे, तर लोकांच्या आत्म्यातील परमात्म्यासाठी. त्यांनी माणसाच्या आत्म्यात वसणाऱ्या परमेश्वरावर प्रेम केले आणि सामान्य जनाला सांगितले —
परमेश्वर म्हणजेच तुमचा–आमचा आत्मा.
“अहं ब्रह्मास्मि” ही भावना प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

प. पू. स्वरूपानंद महाराज (पावस) म्हणतात —

आणिकांचे सुख देखोनि जो सुखी ।
होय धन्य लोकी तोची संत ॥
आणिकांचे दुःख देखानिया डोळा ।
येई कळवळा तेचि संत ॥
आणिकांचे दोष आणिना मनी ।
गुणाते वाखाणी तोचि संत ॥
लोककल्याणार्थ वेंचि जो जीवित ।
संत तो महंत स्वामी म्हणे ॥

बालदास महाराजांना खऱ्या अर्थाने समाजसेवक संत अपेक्षित होते. आयते खाणारे संत ते
“खादीला कार आणि धरणीला भार” म्हणत. देवप्राप्तीबरोबरच समाजसेवा ही संतांची जबाबदारी आहे, असे त्यांचे ठाम मत होते.

नोव्हेंबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा महाराज गप्प बसले नाहीत. गावोगावी फिरून मदतीचे आवाहन केले, सेठ-सावकारांना देशासाठी आर्थिक मदत करण्यास प्रवृत्त केले. पाकिस्तान आक्रमणाच्या वेळीही त्यांनी हीच भूमिका निभावली.

भूकंप, पूर, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये सापडलेल्या लोकांसाठी महाराज स्वतः मदत गोळा करत, कधी स्वतःची साधनेही देत.
“ज्यांच्याकडे काहीच उरलेले नाही, त्यांना आपण मदत नाही केली तर कोण करणार?” असे ते भावुकपणे सांगत.

लोकसंख्या वाढीबाबतही महाराज जागरूक होते.
“लोकसंख्या मर्यादित ठेवणे हे देशहिताचे आहे,” असे ते स्पष्टपणे सांगत.

दारू, जुगार, मटका यांत गुंतलेले लोकही कधी त्यांच्या दर्शनाला येत. महाराज त्यांना कठोर पण प्रेमळ शब्दांत समज देत आणि म्हणत,
“बायका-पोरांसाठी तरी काही साठवून जा.”

राष्ट्रासाठी झिजणारा हा खरा राष्ट्रीय संत होता. वैयक्तिक सुख-दुःखापलीकडे जाऊन संपूर्ण राष्ट्राच्या वेदना आपल्याशा करणारा, प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कर्तव्याशी निष्ठावान असलेला हा एक महान संत होता.

प्रकरण एकोणीसमावे: उपदेशसार

“अनुभवे आले अंगा | ते या जगा ठेतमे ॥” (तु. म.)

बालदास महाराजांचा उपदेश भाविकांना अमृतासारखा गोड वाटायचा. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, अभंगगाथा यांचा महाराजांनी विशेष अभ्यास केला होता. याशिवाय एकनाथी रामायण, भक्तिविजय, हरिविजय, पांडवप्रताप इ. धार्मिक ग्रंथांचेही ते मनोमन वाचन करत.

महाराजांचा उपदेश लांबलचक किंवा अवघड शब्दांत नसून सोपा, सहज समजणारा होता. भोवती बसलेल्या लोकांना सहजतेने ज्ञानाचा प्रवाह देत. भक्तांनी प्रश्न विचारले तर समाधान होईपर्यंत महाराज उत्तरांची सरबत्ती चालू ठेवत.

भोवती जमा झालेल्या समाजाला ते म्हणत,
“अरे बाबांनो! परमेश्वर आपलासा करावा. त्याच्यावर श्रद्धा ठेवा. मनभावना नसल्यास देव मिळणार नाही. देवाचं महत्त्व भाजीपाल्यासारखं समजू नका. परमेश्वर प्राप्त करण्यासाठी मन शुद्ध असणे आवश्यक आहे. ज्या साधना केल्या जातात त्यांचा उद्देश मन शुद्ध करणे हा असतो. तुमचे मन पाक करा, तर परमेश्वर तुमच्यासोबत असेल.”

ते पुढे म्हणाले,
“माणसानं आपली कार्यसिद्धी होण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न महत्त्वाचे आहेत. फक्त कामाची जबाबदारी देवावर सोपवून चालत नाही. म्हणून म्हणतात — ‘प्रयत्नांती परमेश्वर।’”

एकदा महाराज एका खेड्यात गेले. तेथे गुरुंच्या प्रतिमेची स्थापना होती. कार्यक्रमात उपस्थित लोकांनी विचारले,
“महाराज, अंतरात्मा म्हणजे काय?”
महाराज म्हणाले,

“सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंतरात्मा एकच आहे. सकळ चालिका एक, अंतरात्मा वर्तवी अनेक; मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत ते चालते.” (१०,१०,३५)

दासबोधात अंतरात्म्याचे वर्णन असं आहे:
“तो कळतो पण दिसत नाही; प्रचिती येते पण भासत नाही. प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात असूनही एके ठिकाणीच नाही, तर सर्वत्र सामावलेला आहे. वायूहूनही तो चपळ आहे, दृष्टीनी तो पाहतो, कानानी ऐकतो; जीभ, नाक, त्वचा या इंद्रियांच्या क्रियाही तोच अंतरात्मा अनुभवतो.”

दासबोधातील काही श्लोक:

“पृथ्वीमध्ये जितुके शरीरे | तितुकी भगवंताची घरे” (२०,४४)

“देऊळ म्हणजे नाना शरीरे | येथे राहिजे जीवेश्वरे” (१७,१,१३)

“चालती बोलती देऊळे | त्यात राहिजे राऊळे” (१७,१,१४)

“नारायण असे विश्वी | त्याची पूजा करीत जावी” (१५,९,२५)

महाराजांनी स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीचे शरीर म्हणजे एक देऊळ आहे. त्या देऊळातील भगवंत म्हणजे अंतरात्मा. त्याच्या सुखासाठी शरीराने, मनाने झिजणे हीच अंतरात्म्याची उपासना होय. व्यवहारात यालाच “समाजसेवा” म्हणतात. ही समाजांतर्गत उपासना जगभरात सर्वत्र देवच देव दिसायला लावते. उपासना कधीही, कोठेही, कोणत्याही परिस्थितीत करता येते.

महाराज पुढे म्हणाले,

“उपासना केल्याशिवाय जय होत नाही. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेवीण निराश्रयो; उदंड केले तरी जयो, प्राप्ती नाही.” (१६,१०,२९)

अंतरात्म्याची उपासना आणि भजन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. नरदेहाचे महत्त्व देखील त्यांनी स्पष्ट केले. माणसाने आपला देह परोपकारार्थ झिजवावा; नरदेह परमेश्वराचे वासस्थान आहे.

“आपण स्वंये तरले | जगांसहि उपेगा आले”

असा दुहेरी उपयोग आहे. आयुष्य हे अमूल्य रत्नांनी भरलेली पेटी आहे. भक्‍ती, सेवा, त्याग, उपासना या बहुमोल रत्नांची भर करावी व त्यापासून लाभलेला आनंद जन्मभर अनुभवावा. विषयांच्या सेवनात हा नरदेह व्यर्थ न गमावता, प्रत्येक क्षण देवासाठी खर्चावा.

“देह म्हणजेच मी” अशी देहबुद्धी माणसात नसावी. पण देहाचा यथायोग्य वापर करून स्वतःसह समाज आणि देशाचा उत्थान साधावा.

महाराजांचा उपदेश:

  • भक्तीने देव साधता येतो; पूजा साहित्य आवश्यक नाही.
  • कामातून किंवा मोकळ्या वेळेत देवाच्या नामस्मरणात वेळ घालवावा.
  • आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य; व्यर्थ वाया जाऊ नये.
  • वाईट संगती, आळस, दुर्व्यसन यांत वेळ गमावू नये.

प्रकरण वीसावे: देव मंदियत बसला

“भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग / ज्ञान ब्रम्ही भोग ब्रम्ह तनू ||” (तु.म.)

महाराजांनी १९६४ साली सौते गावाच्या सप्ताहात सांगितले की, येथून पुढे मला त्रास होणार आहे. ही गोड-तंत्राची जाणीव त्या रात्री भक्तांच्या अंत:करणात बोंबलीसारखी पसरली. खरोखरच सन १९६५ पासून महाराज आजाराच्या अधीन झाले.

मस्तकाचा दाह सुरू झाला. प्रथम काही दिवस खोबरेल तेल लावले, पण उपयोग काही झाला नाही. दिवसेंदिवस दाह वाढतच गेला. भक्तांनी कवारफोडीचा उपयोग माथ्यावर करण्यास सुरुवात केली; कवारफोडे उघडून त्यातील गाभा महाराजांच्या मस्तकावर चोळला. खोबरेल प्रमाणेच कवार डोक्यावर उसळत असायची, तर चोळणाऱ्याचे हात चटाचट भाजू लागायचे.

आजार वाढल्याने महाराजांचा देह महापुर्याच्या पाण्यासारखा त्रस्त झाला होता. अन्नाचा त्याग, झाडपाल्यावारी उपजीविका, आणि त्या आजाराने भक्तांनाही विचार करायला लावले की, “या अवस्थेत महाराजांचा देह कसा असेल?” पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तळमळतो, तसे महाराज तळमळत असत. भिंतीला टेकून बसणे त्यांना आवडायचे, ते म्हणायचे:
“भिंताडाला टेकून बसल की जरा बरं वाटतंय.”

उन्हाळ्यात महाराजांची फार तलकली व्हायची; अंगातून घामाचे लोट चालायचे. खोखल्याची उसळी आली की डोळे पांढरे होईपर्यंत महाराज तळमळत असत. भक्तगण त्यांचा विसरून पळायचे, परंतु महाराज मूळ अवस्थेत परत येताच सर्व श्वास सोडायचे. महाराज म्हणायचे,
“आरं बाबांनो! एवढं भिती कशाला? केव्हातरी हा नरदेह मातीच्या अधीन करायचाच आहे. माझं व्हायचं ते होऊ दे, पण तुम्ही घाबरू नका.”

उन्हाळ्यातील पहाट महाराजांना प्रिय वाटायची. झांजड पडतानाच ते म्हणायचे:
“आजाराचा ताप आणि उकाड्याचा ताप, दोन्ही मिळून पहाटे गारगार वार अंगाला बरं वाटतो, मन थंडावते.”

पावसाळ्यात शरीराचा दाह थोडा कमी वाटायचा; मात्र कवारीचं पाणी डोक्यावर टाकणे आणि माथ्यावर चोळणे चालू असायचे. पावसाळ्यात महाराजांना झाडपाल्याची कमी लागायची; मुठभर पाला ते शिजवून खात. पाणी पितानाही थोडसं गरम पाणीच पित. भेटायला येणाऱ्या भक्तांची गर्दी कमी असायची कारण रस्ते खड्डयाळ होते.

हिवाळा आल्हाददायक वाटायचा. फळाफुलांचा ढीग महाराजांकडे असायचा; ते प्रसन्न नजरेने पाहत असत. त्यांच्या नजरेतून जणू सुखाचा वर्षाव होत होता; क्षणभर आजारी नसल्यासारखे भासायचे. ज्ञानेश्वरीतील श्लोक आठवतो:

“ते वाट कृपेची करितु, ते दिशेचि स्नेहें भरितु, जीवातळि आंथरितु, आपुला जीऊ…”

महाराज म्हणायचे,
“आता मला कोणताही हिवाळा वा पावसाळा फरक पडत नाही. कोणत्याही कृतीत समाधान मिळणार नाही; आता शेवटच्या विश्रांतीची वाट पाहायची आहे.”

भक्तगण गप्प राहायचे; सेवा करणारे गुप्तपणे सेवा करत, चेहरा न्याहाळत बसायचे.

सन १९६५ पासून महाराज आजारी झाले. काही काळ सौते मठात, नंतर सावर्डे गावच्या गणपती पाटलांच्या छपरात ३-४ वर्षे, नंतर शिरगाव येथील रामचंद्र पाटील यांच्या घरच्या ओसरीत काही दिवस राहिले.

रामचंद्र पाटील महाराजांची भक्तीभावाने सेवा करत, भिंतीला लागून शेड बांधून खोली तयार केली, धुनी, गुरूंचा फोटो ठेवण्याची व्यवस्था केली. महाराजांसाठी कवारीचा ट्रक आणला, कवाराची लागण परसात केली. या ६-७ वर्षांच्या काळात शिरगावचा निवास देवळासारखा पवित्र झाला.

शिरगावला येणारे गरीब-श्रीमंत सर्व भक्त अंत:करण पवित्र करून जात. रामदास महाराजांचा अभंग आठवतो:

“धन्य तो पै देश, धन्य तो पै ग्राम | जेथे निज वास, वैष्णवाचा”

महाराजांचा सहवास गावाला भाग्य वाटला; परमेश्वर तिथे वास्तव्यासारखे राहात होता. हरिविजय अध्याय १८ मधील श्लोक आठवतो: आक्रूराला गोकुळाकडे पाठवले, कृष्णाचा दर्शन मिळवले, तसे शिरगावमध्ये भक्तांना परमेश्वराचे दर्शन झाले.

महाराजांनी सन १९७४ मध्ये भक्तांना सांगितले:
“मी आता फक्त वर्षभर तुमच्याबरोबर आहे. माझी संगत तुम्हाला उपयोगी पडेल. मी जे काही दिलं ते सर्व परमेश्वराच्या भक्तीच्या दृष्टीनं दिलं. जो मार्ग तुम्हाला देवापर्यंत पोहचवतो तोच खरा धन.”

हे बोल महाराजांनी एकादशी दिवशी सांगितले. भक्तगण हलले; अहोरात्र सेवा सुरू झाली. ज्ञानेश्वरीचं अखंड पारायण चालू झाले; महाराज काही प्रमाणात डोळे उघडत बघत, आवाज अस्पष्ट करून बोलत.

शेवटच्या दोन दिवसांत महाराज अगदी वेगळे वाटू लागले; शरीरातील हाडे प्रकट होऊ लागली. ते ध्यानस्थ बसले. महाराजांनी शनिवारी सांगितले:
“बाबांनो! मी उदयाला देह ठेवणार.”

हे ऐकल्यावर भक्तांची गर्दी उसळली. महाराज नाना पाटील यांना बोलवून म्हणाले:
“मला तुझ्याकडील शिवंच्या माळातील घोंगडंभर जमीन देशील का?”
भक्त म्हणाले,
“देतो की महाराज देतो. आपण ती काय करणार?”
महाराज म्हणाले:
“माझी समाधी तिथं जमली तर सारेजन बांधा; माझ्या स्मृतीसाठी करा.”

तारीख ३०-११-१९७५, रविवार, कार्तिक वद्य द्वादशी, महाराजांनी आपला देह ठेवला. ज्ञानेश्वरीच्या श्लोकांचा अर्थ जतन करून:

“हे विश्वची माझे घर | ऐसी मती जयाची स्थिर | किंबहुना चराचर आपण जाहला |”

शिरगावच्या पडवीत पंढरीचं पावित्र्य लाभले; भक्तांना समाधीच्या ठिकाणी परमेश्वराचे दर्शन होत राहिले. भक्तांचे अंत:करण पवित्र झाले; आणि पुढील अभंग म्हणतो:

“पंढरीचे देऊळ आज ओस होई, माझा तो विठ्ठल आज तिथं नाही. हरी माझा आहे अंतरी, भक्तांचे रक्षण करू.”