अनुभव
अनुभवांनी श्री. प. पू. योगीराज बालदास महाराजांनी मार्गदर्शित केलेल्या जीवनातील अनमोल सत्ये.
श्रद्धा, साधना, चमत्कार आणि आत्म-अनुभूतीचा जिव्हाळ्याचा प्रवास.
१. साधनेसाठी एकांत हवा
एके दिवशी एक भक्त महाराजांच्या जवळ आला आणि म्हणाला, “महाराज साधना करण्याची माझी इच्छा आहे. पण ही साधना करण्यासाठी मी कोणत्या ठिकाणी जाऊ?”
यावरती महाराज उत्तरले, “तुला कुठे वाटेल तिकडे जा. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घे. साधना करताना मन खंबीर ठेवून कर. ऋषिकेशला गेलास तर उत्तमच. आपलं मन एकाग्र ठेवून साधना केलीस तर मनाचा वढाळपणा निघून जाईल आणि नंतर तू कुठेही साधनेला बसलास तर ती तुला सहज करता येईल. मठाजवळ मी चाफा लावला तेव्हा त्याचे संगोपण करण्यासाठी मी त्याला काटेरी कुंपन घातले. त्यांची निगा केली. असं एक-दोन वर्षे केल्यानंतर तो चाफा चांगलाच वाढला. त्याचे जवळ जवळ झाडात रुपांतर झाले. तो चाफा हलू लागला, फुलू लागला. त्यानंतर त्याला कुंपनाची गरज ती काय?”
साधना ही एकांतात करणे अत्यंत महत्त्वाचे असते. शेवटी मग तू साधना कोठेही कर, पण एकांत ही बाब महत्त्वाची असते. हे मात्र लक्षात घे.”
२. मूर्तीपूजा भक्ताला पूर्णत्वाकडे नेते
एकदा एक भक्त महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना म्हणाला “मी एक शंका विचारु का महाराज?”
महाराज म्हणाले, “तुला काय विचारायचे ते खुशाल विचार.”
त्यानंतर त्या भक्ताने विचारले, “महाराज मूर्ती पुजेत काही अर्थ नाही असे एकाने मला सांगितले.”
यावर महाराज उत्तरले, “तुला ज्याने मूर्ती पुजा करण्यात काही अर्थ नाही असे सांगितले त्याचे मडके कच्चे वाटते. त्याचा स्वानुभव फारच कमी वाटतो. त्याला आपला धर्म कळलाच नाही असं वाटतं. अनंत काळापासून आपणाकडे मूर्तीची पूजा चालत आली आहे. या मूर्तीच्या उपासनेपासूनच अनेक लोक पूर्णत्वाकडे पोचले आहेत. मी जे सांगतो त्यावर पूर्ण विश्वास ठेव. याबाबत कुणाबरोबरही वादावादी करीत बसू नकोस.”
३. शिक्षण माणसाचा तिसरा डोळा
एकदा गौरी नावाच्या मुलीला तिच्या आईनं ती शाळेला जाईना म्हणून खूप मारलं. ती मुलगी रडत रडत महाराजांच्या जवळ आली. महाराजांनी तिला विचारले, “तु का रडतेस बाळ?”
त्या प्रश्नाला उत्तर देताना गौरी जास्तच रडू लागली. जोरानं हुंदके देऊ लागली. महाराजांनी तिला पोटाशी धरलं आणि म्हणाले “तुला कुणी मारलं ते सांग. मारणाऱ्याला मी खूप मारतो पण तुझं रडं तेवढं बंद कर.”
हे ऐकून गौरी म्हणाली, “मला माझ्या आईनं मारलं.”
महाराज म्हणाले, “का मारलं? तू तिचं काय केलंस?”
गौरी खाली मान घालून पायाच्या नखांनी जमीन टोकरत म्हणाली, “म्या - म्या शाळेला जाईना म्हणून मला लई लई झोडपलं.”
महाराज हसत हसत तिच्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले, “हात तेच्या मारी, येवढयासाठीच न्हवं? बाळ मग तू हे लक्षात घे की या जगात शाळा शिकल्याशिवाय किंमत नाही. तू शाळा शिकली नाहीस तर तुझी एक पिढी बरबाद होईल! “अडाणी आई घर वाया जाई.” हे लक्षात ठेव. तू शाळा जर शिकलीस तर तुला चांगला नवरा मिळेल. शेतावर भांगलाय, टोंगलाय जायला लागायचं नाही. चांगली सायबाची बायको म्हणून घरातनं बाहेर निघायची नाहीस. आईनं तुला मारलं ते चांगल्या साठीच मारलंय. पण तिची चूक एवढीच की इतकं मारायला नको होतं. तरीपण मी तुझ्या आईला सांगतो की पोरीला मारायच्या पद्धतीनं मारत जा. तू जर तिचं ऐकलंस तर ती तुला कधीच मारणार नाही. पण बाळ शाळेला नियमितपणे जायचं बघं. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे.”
गौरीला सारं पटलं. गौरी हसतच घराकडं निघून आली आणि मुकाटयानं दप्तर घेऊन शाळेच्या वाटेला लागली.
४. परमेश्वर भक्ती मनाला शांती देते
एकदा कृष्णाबाई नावाची माय महाराजांच्याजवळ खडी साखरेचा प्रसाद मागण्यास गेली. महाराज म्हणाले, “आज उठल्या उठल्या प्रसादाची तुला कशी काय आठवण झाली?”
त्यावर कृष्णबाई म्हणाली, “महाराज महिनाभर मनाची शांतताच नाहीशी झालीया. कुठंही मन रमेनासं झालंया. राती तुम्ही स्वप्नात येऊन प्रसाद नेण्यास सांगितला म्हणून उठल्याबरोबर आंघोळ करुन आपल्याकडं बिगीबिगी धावत आलिया.”
महाराज म्हणाले, “माणसांन कुठं ना कुठं आपल मन दररोज एकचित्त करणं गरजेचं असतं असं केलं की मनाला शांतता मिळते. मनातील सगळीच धावपळ थांबते. तू मठात यायची विसरलीस, भक्तीकडं पाठ फिरवलीस म्हणून हा त्रास झाला. दररोज मठात येऊन देवाची आठवण करुन मनाला शांतता घेऊन जात जा.”
कृष्णाबाईनं महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे काही दिवस केले. तिच्या चित्ताला शांतता प्राप्त झाली. ती आनंदाने संसारात रमून गेली.
५. खरी भक्ती
एक दिवस टोपलीभर फुले घेऊन कोल्हापुरचा माळी महाराजांच्याकडे आला. त्याने ती टोपलीभर फुलं महाराजांच्या समोर ओतली आणि म्हणाला, “महाराज या फुलांनी आज तुम्ही तुमच्या गुरुंची पूजा बांधावी अशी माझी इच्छा आहे.”
महाराजांना आनंद वाटला पण ते हसत हसत म्हणाले, “ही फुले तू विकत आणलीस की फुकट आणलीस?”
माळी म्हणाला, “ही फुले मी स्वतःच्या बागेतील आणली आहेत. आपल्याविषयी मनात पूज्य आणि शुद्ध भावना ठेऊनच ही फुलांची टोपली मी आणली आहे.”
महाराज म्हणाले, “कितीच्या एस्टीनं आलास?”
माळी या प्रश्नाचे उत्तर देताना थोडासा गडबडला हे बघून महाराज म्हणाले, “का बुचकळयात पडलास?”
लगेच माळी उत्तरला, “मी एस्टीनं आलो नाही महाराज. मी कोल्हापूरातून चालत आलो आहे.”
महाराज आश्चर्यानं म्हणाले. “अरे बाबा! हे सौते ते कोल्हापूर अंतर जवळजवळ ४५ कि.मी. आहे. येवढं तू चालत का आलास? तुझ्याकडं पैसं नव्हतं काय?”
माळी महाराजांच्या चेहऱ्याकडं बघत म्हणाला, “होय माझ्याकडं पैसे नव्हते. मी एक दोघांकडं उसनं मागितलंही पण दोघांनीही नकार दिला. नंतर मी तिसऱ्याकडं मागण्याचं नाकारलं. फुलांची टोपली डोक्यावर घेऊन ताडकन चालायला सुरुवात केली.”
महाराज म्हणाले, “तू किती वाजता निघालास तेथून?”
“पहाटे तीनच्या दरम्यान”
महाराज म्हणाले, “खरी भक्ती यालाच म्हणतात, अशा भक्तीच्या मुळाशी श्रद्धा नांदत असते.”
६. माती असशी मातीत मिळशी
एकदा एक देखणी स्त्री नटून थटून महराजांच्या दर्शनासाठी आली. तिनं डोळयात काजळ भरलं होतं. भुवया व पापण्या काळया काजळांनं लांबपर्यंत कोरल्या होत्या. कानात कर्णफुले होती. ओठाला लाली लावली होती. तोंडावर पावडरीचा लेप दिला होता. टेरीकॉटची डिझाईन असाणारी साडी परिधान केली होती आणि पायात छुमछुम वाजणारे पैंजन घातले होते. अशा अलंकाराने अलंकृत झालेल्या स्त्रीला महाराज म्हणाले,
“माय, तुम्ही तुमचा देह किती नटवलासा तरी शेवटी त्याची मातीच होणार आहे मग तुम्ही तुमच्या सौदर्याचं बाहय औडंबर का करता? “माती असशी मातीत मिळशी?” हे तुमच्या ध्यानात अजून कधी आलंच नाही काय?”
हे महाराजांचे परखड शब्द ऐकून ती स्त्री म्हणाली, “मला माफ करा महाराज. येथून पुढे मी देहाला असा नटवणार नाही. आपलं बोल लक्षात आले.”
७. नवरा हा स्त्रीचा देव
एकदा एक म्हातारी आपल्या सुनेची कागाळी महाराजांना सांगू लागली ती म्हणाली, “माझी सुन उठली सुठली नवऱ्यासंगं गुलूगुलू बोलत बसतीया. कामाच्या नावानं शंख.”
महाराज त्या सासूला म्हणाले,
“तुझी सून तुझ्या मुलग्याबरोबर बोलत बसते न्हवं? मग तिनं नवऱ्याबरोबर बोलत बसायचं नाही तर मग कुणाबरोबर? नवराच तिचा चालता बोलता देव आहे.”
यावर ती सासूबाई शरमिंदी झाली आणि हसत हसत निघून गेली.
८. प्रेम आणि भक्ती देणगीपेक्षा मोठी असते
एकदा शंकर कैकाडी महाराजांना भेटण्यासाठी आला. त्याचा बुटटया, टोपली, सूपे, दुरडया, तट्टे वळण्याचा धंदा होता. तो सौते गावात बुट्टया विकण्यास आला होता.
त्यानं महाराजांच्या मठात येऊन दर्शन घेतलं आणि म्हणाला, “माहाराज माझ्याकडं आपणाला देण्यासारखं काही नाही. आपल्या चरणाजवळ मी काहीही ठेऊ शकत नाही.”
त्यावर महाराज म्हणाले, “तुझ्याकडुन मला कशाचीही अपेक्षा नाही. तू मला प्रेमानं आणि भक्तीने भेटलास हेच मोलाचं.”
कैकाडी म्हणाला, “मी आपणाला एक वळलेली विव्याच्या कामटयाची बुट्टी देऊ काय? आपणाला राग येणार नाही न्हवं? मला तर जबर इच्छा आपणाला बुट्टी अर्पण करण्याची आहे.”
यावर हसत हसत महाराज म्हणाले, “अरे बाबा! तुझ्या इच्छेनुसार तू कर”
हे संभाषण ऐकून मध्येच एक भक्त म्हणाला, “महाराज बुट्टीचा तुम्हाला काय उपयोग?”
महाराज त्या भक्ताला म्हणाले त्या बुट्टीचा काय उपयोग ते तू आठ - दहा दिवसांनं बघ.
आठ - दहा दिवसानं त्या भक्ताने न चुकता महाराजांना विचारले, “काय त्या बुट्टीचा आपण उपयोग केलात महाराज?”
महाराजांनी त्या बुट्टीत माती घालून त्यात मेथीचे बी टाकले होते. त्या बुट्टीत मेथीची भाजी डुलायला लागली होती. हे दृश्य बघताच तो भक्त गप्पच झाला. महाराज त्याला म्हणाले,
“माणसाला देवानं डोकं दिलंया ते उपयोग करण्यासाठी. ती बुट्टी मठात तुला टाकाऊ वाटली होती न्हव? त्या बुट्टीतील मेथीची भाजी तुझ्याकडं बघून हसायला लागलीय बघ!”
९. जीवनात श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे
एकदा एक शिक्षक महाराजांच्याकडे आले आणि म्हणाले “महाराज, माझा मुलगा चांगला शिकावा म्हणून मी त्याला कोल्हापूरात ठेवले आहे, पण तो अभ्यासच करीत नाही. तो दोनदा मॅट्रीकला नापास झाला आहे. तरी मी काय करु सांगा?”
यावर महाराज उत्तरले, “तू त्याला तुझ्याजवळच का ठेवले नाहीस? तुझ्या गावात हायस्कूल असताना तू त्याला दुसरीकडं का पाठवलंस? तूच हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत न्हवं?”
“होय मी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करीत असतानाही मी माझा मुलगा दुसरीकडे शिकण्यास पाठविला. कारण मुलगा चांगला तयार व्हावा हीच माझी अपेक्षा होती.”
यावर महाराज म्हणाले, “याचा अर्थ असा की, तू ज्या हायस्कुलमध्ये काम करतोयस त्या हायस्कुलवर तुझी श्रद्धा नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या शिकविण्यावर तुझा विश्वास नाही असंच न्हवं? मुलगा तुझ्या हाताखाली चांगला तयार होईल तसा दुसरीकडे होणार नाही.”
त्या शिक्षकाला आपली चूक ध्यानात आली तो तेथून गुमान निघून गेला.
११. जपाने जन्माचे सार्थक होते
एकदा एका भक्ताने महाराजांना असा प्रश्न विचारला की, “काही भक्त देवाचा जप करताना हाताची बोटे घालून जप का करतात?”
यावर महाराज म्हणाले, “देवानं दिलेल्या बोटांचा ते चांगलाच उपयोग करतात यात बिघडलं कुठं? माणसानं हाताचा चांगलं करण्यासाठी उपयोग करावा. आपल्या हातून काय वाईट घडू नये याची काळजी घ्यावी. जप केल्यामुळे जन्माचे सार्थक होते.”
१२. मोक्ष कसा मिळेल?
एकदा एका भक्ताने महाराजांना विचारले, “या जन्म आणि मरणाच्या भानगडीतुन सुटण्यासाठी उपाय कोणता ते कृपा करुन महाराज सांगाल का?”
महाराज म्हणाले, “या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हा मनुष्य देह असतानाच सर्व वासनांचा त्याग करण्यास शिकले पाहिजे. जेव्हा या जन्मी मनुष्य सर्व वासनांचा त्याग करतो तेव्हाच तो जन्ममरणाच्या चक्रातून - रहाटगाडग्यातून सुटतो आणि त्याला मोक्ष मिळतो.”
१३. खऱ्या भक्तीचा भगवंत भुकेला असतो
एकदा एका सुज्ञ भक्ताने महाराजांना विचारले “बरेच लोक परमेश्वराचे दर्शनासाठी धडपडत असतात परंतू खरं दर्शन किती जणांना मिळतं?”
यावर महाराज म्हणाले, “परमेश्वराचे दर्शन होण्यासाठी जो धडपड करतो त्याच्याकडे पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे परमेश्वरावर त्याची श्रद्धा असली पाहिजे आणि परमेश्वर हा माझाच आहे अशी त्याची ठाम भावना पाहिजे. अशानाच परमेश्वर भेटू शकतो. संत नामदेव महाराजांचा नैवेद्य श्री विठ्ठलाने त्यांच्या समोर खाल्ला. हा भक्तीचा खरा महिमा आहे.”
१४. संसारात राहून भक्ती करता येते
“एका संसारात गढून गेलेल्या स्त्री भक्ताने महाराजांना सांगितले की मला आठ मुले व दावणीला चार जनावरे आहे. त्यातून मला दर्शनासाठी येण्यास आठ-आठ दिवस सवड मिळत नाही.”
यावर महाराज म्हणाले, “तू संसारातुनही थोडासा वेळ परमार्थासाठी काढ. या सर्व व्यापासाठी तू बराच वेळ दररोज खर्च करतेस मग परमेश्वरासाठी थोडासा - खीनभर वेळ नाही का तुझ्याकडं मिळायचा?”
तु फक्त सकाळी आणि संध्याकाळी देवाचं नामस्मरण घरीच करीत जा. एवढे जरी केलेस तरी तुझ्या मानाने ते बरंच केल्यासारखे आहे. त्यासाठी खास मठात येण्याची गरज नाही.
१५. शुभ काम लगेच कर
एकदा एक भक्त आला आणि महाराजांना म्हणाला “मी तीर्थयात्रेला जाणार आहे तरी दिवस चांगला सांगा. तीर्थयात्रेला निघताना शुभवेळ बघावी असे म्हणतात.”
यावर महाराज म्हणाले, “अरे बाबा! तुला पाहिजे तेव्हा जा. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. जन्मायला नि मरायला वेळ कोण बघतं काय? मग तीर्थ यात्रेसारखं पवित्र काम करण्यास निघाला असताना तुला वेळ काय करायची? तुझ्या मनात आले आहे न्हवं मग लगेच त्या मार्गाला लाग बघू. शुभ कामाला प्रत्येक क्षण हा शुभच असतो. वेळ बघायची गरज नाही.”
१६. भक्तीचा महिमा
सौते गावात महाराजांची भक्ती करणारी एक भक्तीण होती. ती महिनाभर आजारी पडली आणि एके दिवशी अचानक सायंकाळी मरण पावली. तिचं प्रेत महाराजांच्या मठासमोरुन घेऊन लोक गेले. महाराजांना जवळ बसलेल्या भक्तांनी ही बातमी सांगितली. महाराजांनी त्या प्रेतयात्रेतील एका मुलास बोलावून घेतले. महाराजांनी त्या मुलाच्या हातात काहीतरी वस्तू दिली आणि स्मशानभूमीत जाताच त्याने ती मुठ उघडली. परिणाम असा की ते प्रेत जागे झाले. ती भक्त स्त्री परत एक दिवस अधिक जगली नंतर मात्र ती मरण पावली.
१७. बेटातला चिवा उपडुन दाखविला
महाराज सावर्डे येथे गणपती पाटील यांच्या सपरात राहत असताना तेथे कोल्हापूरहून काही पैलवान आले होते. त्यांच्या बरोबर मोळवडयाचे किसन खोपडे हे पैलवान होते. महाराज या सर्वांना म्हणाले, “या सपराजवळाच्या बेटातला चीवा कोण उपडून दावणार बोला?” महाराजांचे आव्हान लक्षात घेऊन काही पैलवानांनी तसा चीवा उपडण्याचा प्रयत्न केला. पण जमले नाही. महाराज आजारी अवस्थेत होते तरीही त्यांनी त्या पैलवानांनी दाखविलेला चीवा एका हिसक्यात उपडून दाखविला. सारे आश्चर्यचकित झाले.
१८. भक्ताला न्याय मिळाला
सावर्डे गावचे एक भक्त श्री. दादु दौलु पाटील राजेश मिल मध्ये नोकरीस होते. काही लोकांनी कट करुन त्यांच्यावर चोरीचा आरोप घातला त्यांना नोकरीतून तात्पुरते कमी करुन चौकशी लावण्यात आली. घरी येऊन दादु पाटील चिंताक्रांत चेहऱ्याने बसले असता दारात एक साधू येऊन उभा राहिला. चिंतातूर चेहरा पाहून साधूने काय घडले म्हणून विचारले असता पाया पडून दादुने सर्व वृत्तांत कथन केला. त्या साधूने दादूस एक फुल दिले व तीन दिवसांत तुझा न्याय होईल असे सांगितले. त्यानंतर चौकशी होऊन दादु निर्दोष ठरला व नोकरीवर रुजू झाला आणि ज्याने कारस्थान केले होते त्याला विविध कारणाने शिक्षा झाली.
दादु पाटील हा महाराजांचा एकनिष्ठ भक्त आहे. महाराजांचे नाव सतत त्यांच्या स्मरणात असते. वरील प्रमाणेचा मिळालेला न्याय ही महाराजांचीच कृपा आहे असे दादुचे ठाम म्हणणे आहे.
१९. महाराजांनी परातभर पाला खाल्ला
महाराज काटेकुळशींद्याचा पाला शिजवून खात असत. एकदा एका भकतांन परातभर तो पाला शिजवून नेला आणि महाराजांच्या समोर ठेवला. महाराज एवढा पाला खाणार नाहीत असे त्या भक्ताला वाटले. पण महाराजांनी तो सर्व पाला बकाबका खाऊन टाकला आणि म्हणाले “अरे भक्ता! पाला संपला काय?” भक्त म्हणाला,
“मला वाटलं इतका पाला कशाला शिजवून आणलास म्हणून रागवाल तर घडले मात्र उलटेच.” यावर महाराज खदाखदा हसले.
२०. पाटील आणि पवार वाद मिटविला
सावर्डे येथील पाटील गल्ली आणि पवार गल्ली यांचा दहा वर्षे पाणवठयाबाबत वाद चालला होता. कोर्ट कचेऱ्या झाल्या होत्या. पण महाराजांनी त्या दोन्ही पाटर्यांना बोलावून घेऊन समजावून सांगितले आणि दोन्ही गटांच्या लोकांनी ते ऐकले. महाराजांना आनंद वाटला. सारेजण महाराजांचे दर्शन घेऊन आपल्याआपल्या घरी गेले.
२१. जशी भावना तसे फळ
एकदा एक भक्त महाराजांच्या सेवेत गुंतल्यामुळे त्याच्या पेरणीस वेळ झाला. गावातील इतर लोकांनी भाताची पेरणी मे मध्येच धुळवाफेनं केली पण महाराजांच्या सेवेत संपूर्ण मे महिना गेल्यामुळे शेताची मशागत करण्यासाठी त्या भक्ताला वेळ अजिबात मिळाला नाही. जूनमध्ये शेतीची मशागत पहिल्याच आठवडयात त्या भक्ताने केली आणि दुसऱ्या आठवडयात पेरण्यास गेला. कुरीने भात पेरत असताना इतर शिवार मात्र भात उगवून डौलत होता. त्यामुळेच शेजारचा एक पाटील म्हणाला,
“अरेये, महाराजांच्या भक्ता! तुला काय भात पेरायची बरी येळवर आठवण झाली रं. आता तरी कशाला पेरतोस. महाराजांच्या मागनं वीणा घेऊन, टाळ घेऊन फिर की सेवा करीत.
त्यावर तो भक्त नम्रतेनं म्हणाला,
“महाराजांची सेवा म्हणजे शेवटी माणसाचीच सेवा न्हवं. आणि शिवाय पाटील साहेब, हे लक्षात घ्या ज्यांच्यापासून चार धडे चांगले संत मार्गातले शिकायला मिळतात. ती व्यक्ती आपण गुरु स्थानीच मानली पाहिजे. महाराज हे आम्हांला महाराज वाटत नसून तो एक परमेश्वर - बोधामृताचा सागरच वाटतो यात बिघडलं कुठं?”
परत पाटील कुर्स्यात म्हणाले, “आरं पण महाराजांच्या नादानं काय जमिनी ओसाड पाडायच्या काय?"
हे बोचणारं वाक्य ऐकून भकत म्हणाला, “महाराजांची कृपा असेल तर माझं भाताचं पीक चांगलच येईल. हेही पाटील साहेब लक्षात ठेवा.”
पेरणी झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या भक्तानं घडलेली चर्चा महाराजांना संतापानं सांगितली. महाराज म्हणाले,
“भक्तां! तुझ्यावर निसर्गाची कृपा राहील. अधीक कशाला बोलू.”
नंतर खरोखरच इतरांचा उगवून आलेला शिवार पावसानं दडी मारल्यामुळे तीन आठवडयात वाळून गेला आणि तीन आठडयानंतर पडलेल्या पावसामुळं भक्ताचा शिवार (भक्ताचं शेत) आस्मानाकडे बघून हसू लागलं. नंतर वेळेवर मेघराजा पडत गेला त्या भागात त्या भक्तानंच धान्याची रास खळयात तयार करुन घरला नेली.
२२. रस्त्यात पडलेले प्रचंड झाड बाजूला मारले
सौत गावात हुंबराचे झाड रस्त्यात आडवे पडले होते. झाडाचा बुंदा तीन - चार गडयांच्या कवळयात मावणार नाही येवढा मोठा होता. गावातील बर्याच लोकांनी झाड बाजूला ढकलून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही. सारा प्रकार महाराजाच्या कानावर गेला. महाराज मठातून ताडकन उठले आणि त्या हुंबराच्या बुंध्याजवळ गेले. त्यांनी आपली प्रचंड ताकद पणाला लाऊन ते झाड रस्त्यातून बाजूला ढकलून लावले. रस्ता रिकामा झाला. त्या वाटंनं शिवारात जाणा-येणाऱ्यांची सोय झाली. सर्व गावकऱ्यांना आनंद झाला.
२३. महाराज आंतर ज्ञानी होते
महाराजांच्या एका अर्धवट असलेल्या कीर्तनकार भक्तांन एका भाताच्या खळयावरील मालकाबरोबर महाराजांची टिंगलवजा चर्चा केली. ती चर्चा तो किर्तनकार करुन झाल्यानंतर महाराजांच्या मठात आला. त्यावेळी महाराज त्याला लगेच म्हणाले,
“दुसऱ्याची टिंगल करुन तुम्हा लोकांना काय मिळतं?”
तो किर्तनकार म्हणाला मी केलेली चूक आपणास कोण बोललं “महाराज म्हणाले मला इथं बसून जगातलं सगळं कळतं.” किर्तनकार माफी मागून स्वत:च्या तोंडात मारुन घेत निघून गेला.
२४. पात्यालातील चहा नेवाने वाढविला
एकदा पंचवीस - तीस भक्तांचा समुदाय शिरगाव गावातून महाराजांच्याकडे गेला. महाराज तेव्हा सौते गावच्या मठात होते. महाराजांनी छोटयाशा पात्याल्यात चहा ठेवला. सात - आठ कपांचे ते पात्याले असले. तेवढया पात्यालातील चहा महाराजांनी वीस - पंचवीस भक्तांना पुरविला. सर्वजण कप आणि बशी भरुन चहा प्यालेत. चहा पिऊन झाल्यानंतर सगळे महाराजांच्याकडे बघू लागले. सर्वांना चहा देऊन झाल्यानंतर महाराज म्हणाले,
“अरे बाबांनो यात आश्चर्य कसलं? तुमच्यासाठी चहा वाढवला असणार! देव भक्तांचा भुकेला असतो.”
२५. माथ्यावर कवार शिजली पण तूप वितळले नाही
एकदा महाराज आपल्या दोन भक्तांच्या बरोबर कोल्हापूरातून निघून सौत्याकडे येण्यास निघाले. पण भैरेवाडी येथे त्यांना खूपच रात्र झाली. त्यामुळे ते सर्वजण तेथील भैरोबाच्या देवळात थांबले.
महाराजांचा माथा खूपच तप्त झाला होता. महाराज एका भक्ताला म्हणाले, “अरे दगडु पाटील त्या देवाच्या दिव्यातील तूप घेऊन माझ्या डोक्यावर घाल.” तसे दगडु पाटलांनी केले. पण तूपमात्र त्यांच्या डोक्यावर वितळले नाही. ते बघून दगडु पाटील म्हणाले,
“महाराज तुमच्या डोक्यावर कवार रट् रट् शिजते आणि तूप का पाघळत नाही?”
त्यावर महाराज म्हणाले, “अरे बाबा, ते तू देवाला विचार मला कशाला विचारतोस?”
२६. खडीसाखरेने ताप गेला
एकदा एका भक्त स्त्रीच्या मुलास चौदा दिवस ताप होता. त्या काळात डॉक्टरांची सोय खेडोपाडी नव्हती. चौदा दिवसानंतर ती स्त्री भक्त महाराजांच्याकडे गेली आणि, “काय करायचे ते करा पण माझं पोरगं जगलं पाहिजे. चौदा दिवस झालं तापानं भाजून निघालया बघा.”
महाराजांनी एका पुडीतनं खडीसाखर दिली. ती चार दिवस खाण्यास सांगितले. चार दिवसानंतर ताप पळून गेला.
२७. गुरुकृपेने नागाचे विष उतरले
एकदा महाराजांच्या सौते गावातील स्त्री भक्तास नाग चावला. नाग चावताच त्या स्त्रीला त्यावेळच्या रितीरीवाजाप्रमाणे देवाच्या देवळात ठेवण्यात आले. महाराजांना ही बातमी कळताच महाराज तिकडे आपणाहून धावले आणि त्यांनी आपल्या गुरुच्या चरणाजवळचा अंगारा त्या स्त्रीच्या अंगावर नेऊन टाकला. बेशुद्ध पडलेली ती स्त्री पहाटेची शुद्धीवर आली. महाराजांना आनंद वाटला. महाराजांनी तिला आपल्या मठात चहा करुन देवळात जाऊन पाजला. ती स्त्री घरी निघून गेली पण जाताना महाराजांचे पाय पुजूनच गेली.
२८. प्रेताबरोबर बोलले
सौते गावातीलच महाराजांचा सावत्र भाऊ मरण पावला. ही बातमी सौते मठात कळताच महाराज घरी गेले. तर घरी बायकापोरांचा आरडाओरडा चालला होता. महाराजांनी क्षणभर सर्वांनाच स्तब्धता पाळण्यास लावले आणि तेवढया वेळेत क्षणभर प्रेताबरोबर बोलले सारेजण आश्चर्यचकित झाले. ही घटना सिनेमासारखीच वाटली. नंतर ते प्रेत हे प्रेतच राहिले आणि महाराज तेथून ताडकन् निघून आपल्या मठात आले.
२९. महाराज ही एक महान शक्ती
वर्षाची एकादशी होती. साऱ्या सौते गावातील विठ्ठलाचे भक्त पंढरपूरला निघाले. त्यांच्या मेळयात दर वर्षाला महाराज सामिल असायचे. पण चालू वर्षी आपली प्रकृती बरी नाही, त्यामुळे आपण पंढरीला या वारीला येणार नाही. असे महाराजांनी अगोदरच जाहीर करुन टाकले होते.
सौते, शिरगाव, मोळवडे... इत्यादी गावाचा भक्तगण महाराजांना सोडून पंढरपूरला गेला. पण गम्मत अशी की महाराज एकादशी दिवशी सौते मठातही होते आणि पंढरपुरातही होते. पंढरपूरला न गेलेले व सौतेगावात असणारे लोक नंतर पंढरपुरातून आलेल्या आपल्यागावाच्या भक्तांना सांगू लागले की महाराज पंढरपूरला न येता येथेच होते. आम्ही त्यांच्या समवेत येथे मठात भजन केले.
तर या उलट पंढरपुरातून आलेले भक्त असे सांगू लागले की महाराज आमच्या बरोबर पंढरपूरात होते.
यावरुन साऱ्यानांच कळुन आले की महाराज ही एक महान शक्ती आहे.
३०. हिमालयाकडे निघाले पण बेत अचानक रद्द
एकदा महाराज हिमालयाकडे निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी सर्व भक्तांना कल्पना दिली. काही भक्त महाराजांच्या बरोबर जाण्यास उत्सुक होते. त्यांना महाराजांनी निघण्यापूर्वी आठदिवस कल्पना दिली. जाण्याचा वार गुरुवार ठरला. बुधवारी सर्व येणाऱ्या भक्तांना एकत्र जमा होण्यासाठी सांगितले. सर्वजन जमा झाले. महाराज सर्व भक्तांना म्हणाले, “उद्याला आपण हिमालयाकडे जाणार होतो तो बेत रद्द केला याचं कारण नंतर सांगेन. आता या क्षणाला मला कोणीही काहीही त्याबाबत विचारु नये.” हिमालयाचा बेत रद्द झाला. पुढे चार दिवसांनी पेपरला बातमी आली की हिमालयात बर्फवृष्टी झाली आणि सर्व यात्रेकरु वाटेतच मरण पावले. महाराजांनी ही बातमी सर्व भक्तांना बोलावून वाचून दाखविली. सर्वजण थक्क झालेत.
३१. पश्चात्ताप झाला की पाप दूर पळते
एके दिवशी एक भक्त उजडायला महाराजांच्या मठात आला. त्याला महाराज म्हणाले, “अरे बाबा, एवढया लवकर का आलास? अगोदर तू मुंबईसनं कधी आलास ते सांग” भक्त म्हणाला, “आत्ताच मुंबईहून आलो. एस.टी. तून उतरलो आणि पायपीट करीत तुमच्याकडं आलोय. महाराज म्हणाले घागरीतील पाणी घेऊन तोंड धू. तुला चहा देतो. चहा घे आणि मग माझ्या बरोबर बोल.”
महाराज मी वैतागून गेलोय. मनःशांतीसाठी तुमच्या दर्शनासाठी आलोय. महाराज “तुला वैतागायला काय झालंय?”
भक्त “मी दारु, मटका, जुगार, या जंजाळात बुडून गेलोय, या साऱ्या वागण्याचा माझा मलाच वीट आला आहे. हे सारं आता गंगेत बुडवून टाकतो.”
महाराज शांतपणे म्हणाले, “अरे बाबा केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होणं म्हणजेच तुझं मनं चांगल्या वाटेने, चालले आहे असा याचा अर्थ होय.”
महाराज- “तू आजपासून माणूस म्हणून वाग. माणूस म्हणून जग. राक्षसासारखं वागू नकोस. तुझ्या फायद्यासाठी दुसऱ्यांचे वाटोळे करु नकोस. तू चांगला वाग आणि इतरांना चांगले वागण्यास शिकवं."
त्या भक्ताने महाराजांच्या पासावर डोके ठेवले आणि म्हणाला, “महाराज ,मी आजपासून चांगला वागेन, चांगला माणूस म्हणून समाजात जगेन. वाईट धंदे करणार नाही.”
महाराजांना त्याने केलेल्या प्रतिज्ञेचा आनंद वाटला. महाराजांनी त्याला थांबवून घेतले. चहा दिला. एवढेच नव्हे तर महाराजांनी त्याला मठात थांबवून घेतले. स्वत: वरण भात करुन जेऊ घातले. तो भक्त तेथून मुंबईला परत गेला. एक चांगला उद्योगपती म्हणून जीवन जगू लागला.
३२. चांगल्या बोलण्याचे चांगले फळ मिळते
महाराज एकदा सांबवे पासून मलकापुराकडे चालत निघाले होते. तेव्हा वाटेत मक्याचे पिक त्याना डोलताना दिसले. त्या पिकात एक शेतकरी पाणी पाजत असलेला दिसला. महाराजांनी त्या शेतकऱ्याला हाक मारली आणि विचारले, “अरे बाबा हे मक्याचे पिक कितीतरी चांगले आणले आहेस. मक्याचे कणीस केवढे केवढे मोठे आहे. एका एका कणसाला मापटेभर दाणे होतील. तू खरचं चांगले कष्ट केले आहेत. तुझ्या कष्टाचे चांगले फळ देवाने दिले आहे.” त्यावर तो शेतकरी म्हणाला, “यात काय सांगताय महाराज. माझ्या कष्टामुळे माझे खळे भरुन मके होणार आहेत. तुमच्या बोलण्यामुळं नव्हं.
महाराजांना त्या शेतकऱ्यांचे उर्मट बोलने आवडले नाही. महाराज म्हणाले, “तुझे खळयातील मके भरुन नेण्यास चांगल्या चार बैलगाडया सांग.” असे म्हणून महाराज रागाने तेथून निघून गेले. त्या शेतकऱयांचा मका एका रात्रीत जनावरांनी खाल्ला. पाच मकेही त्याला झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या लक्षात आले की महाराजांच्या क्रोधामुळे आपले पिक गेले. त्या शेतकऱ्याने महाराजांकडे जाऊन आपल्या उर्मट बोलण्याची माफी मागितली. महाराज त्याला म्हणाले, “नेहमी चांगले बोलावे कारण चांगल्या बोलण्याचे नेहमीच चांगले फळ मिळते. वाईट बोलण्याचे वाईट फळ मिळते.”
३३. जो दुसर्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला
एक भक्त महाराजांकडे आला आणि म्हणाला, “महाराज मी कलेक्टर कचेरीतील माझे काम करण्यासाठी वरेच हेलपाटे घालतोय तरी ते काम होत नाही. म्हणून पुढाऱ्याला सांगावे म्हणतोय. महाराज पटकन त्याला म्हणाले, अरे बाबा, कलेक्टर साहेबांकडे तुझं काम आणि पुढाऱ्याला काय सांगणार? तुझं काम तू एकाला चार हेलपाटे घालून करुन घे. तुझ्या कामाचे पूढाऱ्याला काय सुःख दुःख असणार? पुढारी सांगतो म्हणणार आणि सोडून देणार. अरे बाबा, कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. आपल्या कामाची किंमत आपणला माहित असते. दुसऱ्याला त्याचे काय? माणसाने नेहमी कामाची पाठ धरावी. कामाच्या पाठीवर राहणाऱ्याचेच काम वेळेवर होते. जो दुसर्यावर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतो. कार्य भाग बुडाल्यावर पश्चात्ताप करुन काय उपयोग आहे का? म्हणून जे काम तुझे आहे ते जातीनीशी तूच करुन घे.”
३४. मीपणा मोडलास तर तुला चांगुलपणा मिळेल
एक भक्त महाराजांना म्हणाला, “महाराज मला सगळे लोक नावे ठेवतात. कारण माझ्या बोलण्यात कायम मी हा शब्द असतो.” महाराज म्हणाले, “म्हणजे तुला नेमके काय म्हणायचे आहे?” भक्त म्हणाला, “महाराज मी प्रत्येक गोष्टीची माहिती देताना मी हा शब्द वापरतो. उदा. मी हे घर बांधले. मी ही गाडी घेतली. मी सगळा पैसा उभा केला. मी हे केले, मी ते केले - असे सगळे मी मी हे माझ्या बोलण्यात येते त्यामुळे सगळे म्हणतात जगातल्याही सगळया गोष्टी हयानेच केल्या आहेत. याने दुसऱ्याला काय करायचे ठेवले नाही.”
महाराज शांतपणे म्हणाले, “ऐक बाबा, तू घर एकटयाने बांधलेस का घरातील सगळयांच्या मदतीने बांधलेस? घराला पैसा सगळयांचा घातलास का तुझ्या एकटयाचा घातलास? घर जर सगळयांनी बांधले असेल, त्या साठी पैसा जर सगळयांनी घातला असेल तर तू “मी” शब्द का वापरतोस? ती तुझी मोठी चूक आहे. नेहमी हे आम्ही केले, आम्ही सर्वांनी केले किंवा हे देवाने केले - देवाच्या कृपेने झाले असे म्हणालास तर ते श्रेय सर्वांना मिळेल. “मी” या शब्दाची तुझी चेष्टा होणार नाही. हा तुझ्या बोलण्यात बदल कर तू मीपणा सोडलास तर सर्वांचा तुला चांगुलपणा मिळेल. मी या शब्दात मीपणा म्हणजे उर्मटपणा आहे तर आम्ही या शब्दात चांगुलपणा भरला आहे.
३५. “बैलाबरोबर नांगर ओढला, शेतकर्याला आशीर्वाद दिला”
बालदास महाराज एकदा सौत्यातून साखरप्याला चालत निघाले. बरोबर त्यांचा जवळचा भक्त बाळू पाटील होता. जूनचा पहिला आठवडा होता. अंदाजे जूनची दोन तारीख असावी. वातावरण थंड होतं. मृगाचा पाऊस चालू होण्याच्या मार्गावर होता. पण अजून पावसाला तसा चारसहा दिवस अवकाश होता.
साखरप्याजवळ महाराज व बाळू पाटील चालत आसताना तेथेच शिवारात एक शेतकरी नांगर हाकत होता. तो बिचारा घामाघूम झाला होता. टपटप घामाचे थेंब चेहऱ्यावरुन खाली ओघळत होते. पण तो उसंत न खाता आपले काम एकाग्रतेने करीत होता. महाराजांनी हे दृश्य रस्त्याच्या कडेला खीनभर उभं राहून पाहिलं. त्यांच्या मनात काय आले माहीत नाही लगेच महाराज त्या नांगरणाऱ्या शेतकर््याजवळ पोचले. त्या शेतकऱयाचा उजवीकडचा एक बैल लंगडत होता. महाराज त्या शेतकऱ्याला म्हणाले, “अरे बाबा, तूझ्या उजव्या बाजूचा एक बैल लंगडतोय. त्याला नीट चालता येईना. तू त्याला भरभर नांगर ओढावा म्हणून चाबकाने मारतोस हे चांगले नाही. तो बैल चुकारपणा करतोय का?”
“मग तू त्याला चाबकाने का मारतोस? ज्याच्याने जे जमतेय ते तो करतोय नं? त्याचा काय दोष?”
“महाराज, मी शेतकरी आहे. तुम्हाला जे कळतंय त्यापेक्षा मला जास्त कळतयं हे लक्षात घ्या पण मी तरी काय करु? आता मृगाचा पाऊस चार-सहा दिवसांत चालू होईल. येळंवर मशागत होऊन भात पेरणी झाली पाहिजे. न्हाईतर वराती मागून घोडं न्हेऊन काय उपयोगाचं. मग मी पोटाला काय खाणार. चार पोरंबी पदरात हाईत “
हे तुझं खरं आहे, पण बैलाचं दुःख तू समजून घे की, फडाफडा मारुन तेची ताकद कमी करु नकोस.”
“महाराज, मग मी नांगर ओढू काय? आता किती र््हायलंय? चार गुंठ रान. होईल तासाभरात. मग निवांत विसावा घेऊ दे”
“मी त्याचे हाल बघून गहिवरलोय मला फार वाईट वाटतंय.”
“मग महाराज तुम्हीतरी त्याच्या बदलाला नांगर ओढा नाहीतर मला तरी ओढला पाहिजे.”
“मी नांगर त्याच्या बदलाला ओढतो. तुझ्यानं जमणार नाही. मला देवानं दिलेल्या ताकतीचा मीच उपयोग करतो.”
महाराजांनी उजव्या बाजूचा लंगडतेला बैल शेतकऱ्याला सोडायला लावला. तेथे आपण खांदा दिला. लंगडतेल्या बैलाचे जू महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतले. त्याची सारी उजव्या हातात धरली. जू खांद्यावर मजबूत असं घेतलं आणि शेतकऱ्याला नांगर टाकायला सांगितल.
महाराज आपल्या जोडीदार बैलाबरोबर ताकदीने एक एक पाऊल पुढे टाकू लागले. नांगर वळून परत आला तेव्हा बैलाची ताकद कमी वाटत होती व महाराजांची ताकद जास्त जाणवत होती.
न थांबता चार गुंठे रान महाराजांनी जोडीदार बैलाच्या मदतीने त्या शेतकऱयाला नांगरुन दिले. नांगरुन झाल्यावर शेतकरी म्हणाला, “महाराज, आपण दयावान दिसता. आपल्या दिव्यशक्तीने मी भारावून गेलोय. आपले उपकार मी जन्मात विसरणार नाही.”
“माझे उपकार नव्हेत हे देवाचे उपकार मान.” असे बोलून महाराजांनी आपल्या डोक्यावर बांधलेल्या जटा जमिनीवर खाली सोडल्या. त्या लांबलचक काळयाभोर जटांचे तेज बघून तो शेतकरी अश्चर्यचकित झाला. त्याने क्षणात महाराजांचे पाय धरले.
महाराज त्याला म्हणाले, “या शेतात तुला जे भात होते त्याच्या पाचपट भात यंदा जास्त होईल. सुखानं खा. पण देवाला विसरु नकोस.”
३६. गुराखी गेले म्हऊ जाळायला, पण म्हऊ पळून गेले दुसर्या गावाला
बाद्याच्या जंगलात आग्या म्हवाचं पोळं उंच अशा झाडावर होतं. त्या पोळयाचा त्रास जाणायेणाऱ्या माणसांना होऊ लागला. जनावरांनाही त्या आग्या म्हवाच्या मधमाशा चाऊ लागल्या. ही बातमी एका गुराख्याने महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले आपण त्यांचा बंदोबस्त करुया. परत बरेच दिवस झाले तरी महाराजांनी काहीच सांगितले नाही. महाराज काय सांगत नाहीत म्हटल्यावर गुराखी मुलांनी ते आग्या म्हऊ जाळण्याचा निर्णय घेतला. ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. महाराजांनी सर्व गुराखी मुलांना मठात बोलवून घेतले. त्यावेळी एक म्होरक्या गुराखी महाराजांना म्हणाला,
“महाराज तुम्ही काहीच केलं नाही. म्हवाचा त्रास आम्हाला आणि आमच्या गुरांना होतोय. ज्यांच्या पोटात दु:खतं तोच दवा मागतो.”
त्या म्होरक््याचे उर्मट उत्तर ऐकून महाराज म्हणाले, “अरे बाळ, तू शांत हो, काय करायचं ते आपण दोन दिवसांत ठरवूया.”
“ठरवायचं काय आम्ही ते आग्या म्हऊ जाळून टाकतो.
"नको"
“मी सांगतोय म्हणून,”
“तुम्ही सांगताय पण आमचं काय? आमच्या जनावरांचं काय?”
“अरे पोरांनो लक्षात घ्या माझा गोतावळाही त्याच रस्त्याने जातोना?”
“होय, पण तुमच्या जनावरांना आग्या म्हवाच्या माशा चावलेल्या दिसत नाहीत, नाहीतर तुम्ही लगेच तयार झाला असता महाराज,”
“बाळांनो आपण त्या आग्या म्हवाला जाळणे योग्य नाही. त्या मधमाशांच्या जीवाचाही विचार करायला नको का? आपणाला जगण्याचा अधिकार आहे तसाच त्याही मधमाशांना त्याचा अधिकार आहे. त्या म्हवाच्या मध माशांना आपण जाळले तर देव आपणाला माफ करणार नाही. मुलांनो मला तुमची मते समजलीत. तुम्ही सर्वजणांनी त्या आग्या म्हवाला जाळण्याचा निश्चयच केलेला दिसतोय. ठीक आहे. उद्या संध्याकाळी तुम्ही सर्वजन मठात या.” असे म्हणून महाराज विश्रांती खोलीत गेले. गुराखी निघुन गेले. जाताना त्यांनी रॉकेल व दिवटे घेऊन उद्याला मठात यायचे असे ठरवले.
दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळी सर्व गुराखी महाराजांच्या सुचनेप्रमाणे मठात आले. येताना प्रत्येकाच्या हातात रॉकेलचा दिवटा होता. दिवटे हातात तयार होते पण ते पेटवायचे फक्त राहिले होते. महाराजांनी हातातील दिवटे बघून खदखदा हसायला सुरवात केली. महाराज म्हणाले,
“अरे शहाण्या मुलांनो, हे हिंसाचाराचे अवडंबर कशाला करायला लागलाय,”
त्या आलेल्या गुराख्या मुलांच्यापैकी एकजण म्हणाला,
“महाराज, म्हऊ जाळण्याशिवाय उपाय काय नाही. आम्ही ते आग्या म्हवं जाळणारचं. तुमच कायबी ऐकणार नाही.” असे म्हणून सर्व गुराखी महाराजांचे दर्शन घेऊन त्या जंगलातील आग्या म्हवाकडे निघाले. मठातून बाहेर पडताना महाराज सर्वांना उद्देशून म्हणाले,
“पोरानो म्हव जाळा आणि त्यातील एक मेलेली म्हवाची माशी मला दाखवायला आणा.”
त्या सर्वांचा म्होरक्या म्हणाला, “एक का शंभर मेलेल्या माशा दाखवयाला आणतो तुम्हाला.”
“बाळांनो एकच माशी आणा शंभर कशाला.”
म्हऊ ज्या झाडावर बसले होते तेथे सर्व गुराखी आले. सर्वानी आपापले दिवटे पेटवले. त्यातील एक धाडसी गुराखी त्या झाडावर चढू लागला. खालून त्याचे सर्व साथीदार ओरडून म्हणाले,
“बाळू सावकाश चढ, घाई करु नकोस, धट्ट धरत धरत चढ. दिवटा भवतीनं फिरव. माशा न चावतील याची काळजी घे.”
बाळू आग्या म्हऊ जाळण्याच्या त्वेषाने वर वर झाडावर चढू लागला. इच्छित ठिकाणी तो पोचला. तर तेथे त्याला म्हऊ कुठे दिसेना. तो वरुन ओरडला, “अरे लेकानो म्हऊ कुठे आहे ते मला मोठया प्रकाशाच्या बॅटरीने खालून दाखवा. मला तर येथे म्हऊ दिसत नाही. का लेकांनो झाड चुकलं काय बघा.?”
असा प्रश्न ऐकून सर्व गुराखी चकित झालेत. एवढयात बाळू वरुन ओरडला,
“अरे लेकांनो, महाराजांनी म्हऊ घालविले असणार. इथ म्हऊ नाही.
बाळू झाडावरुन शरमिंदा होऊन उतरु लागला. उतरताना तो म्हणत होता, “आता महाराजांना आग्या म्हवाची जाळलेली एकतरी मधमाशी कुठली दाखवू.”
सर्वजण सौते मठाच्या दिशेने चालू लागले. मठात आले. मठात येताच महाराज ताडकन विश्रांती खोलीतुन बाहेर आले. सर्व गुराखी आपल्या माना खाली घालून उभे राहिले. महाराज म्हणाले,
“पोरांनो म्हऊ जाळले का? मला जाळलेली एक मधमाशी दाखवयाला आणलीय का?”
“तेथे झाडावर म्हऊ नव्हते. ते निघून गेले होते.”
महाराज उभे राहून खदाखदा हासत होते आणि खाली चरणावर गुराखी लोळत होते.
३७. पत्रावळयांच्या गठ्ठर्यांचे कोडे सुटता सुटेना
काही वेळा जनावरे चारताना महाराज पळसांच्या पानांच्या पत्रावळया तयार करीत. बरोबर असलेल्या इतर गुरख्यांनाही ते पत्रावळया तयार करायला शिकवत. तयार झालेल्या पत्रावळयांचे ते बांधण्याने गठ्ठे बांधत. संध्याकाळी घरी येताना प्रत्येकजण एक एक गठ्ठा डोक्यावर घेऊन येत.
घरात आणलेला गट्ठा प्रत्येकजण गठ्ठयावर गठ्ठा असे रचून ठेवत. एके दिवशी महाराजांनी सगळया गुराख्यांना विचारले, “पत्रावळयाने किती गठ्ठे झालेत?”
“पन्नास गठ्ठे झालेत.”
“आज घरी गेल्यावर सरळ मोजा आणि मला उदयाला सांगा. घरी गेल्यावर गठ्ठे दोन-तीन वेळा मोजा मोजताना चुकू नका बर का?”
“आहो महाराज गठ्ठे मोजलेत परत काय मोजायचेत. आमचे सर्वांचे सारखेच म्हणजेच पन्नास गठ्ठे झालेत.”
“अरे बाबांनो! परत आज मोजा. मोजायला काय पैसे पडतात काय? मी सांगतोय म्हणून आज आणखीन मोजा. उद्यालाही मला पन्नास गठ्ठे आहेत तसेच द्या म्हणजे झालं. जास्त काय तुम्हाला सांगू”
सगळे गुराखी घरी आले. आपल्या आपल्या घरातील पत्रावळयांचे गठ्ठे मोजायला लागले. प्रत्येकाच्या घरी पन्नास ऐवजी सत्तर गठ्ठे पत्रावळयांचे होते. प्रत्येक गुराख्याने दोनतीन वेळा मोजले. तर उत्तर एकच होते की पत्रावळयांच्या गठयांची संख्या होती सत्तर.
दुसर्या दिवशी सकाळी सर्व गुराखी महाराजांच्याकडे मठात गेले. महाराज सर्व गुराख्यानां बघताच म्हणाले,
“अरे बाबांनो! तुमचे पत्रावळयांचे गठ्ठे पन्नासच आहेत न? पन्नास गठ्ठे आहेत हेच मला तुमचे सगळयांचे उत्तर पाहिजे आहे.”
“नाही महाराज गठ्यांची संख्या सत्तर आहे.”
“होय, महाराज गठ्ठे सत्तर आहेत हा काय चमत्कार? हे कोडे काय ते आम्हाला सुटेना.”
“खुळयांनो, हे पत्रावळयांचे गठ्ठे सत्तर कसे झालेत ते तुम्हीच देवाला विचारा. देव त्याचे उत्तर देईल मी काय सांगणार?”
महाराजांनी सगळयांच्या हातावर खडीसाखरेचा प्रसाद ठेवला मिटक्या मारत खडीसाखरेचा प्रसाद खात खात सगळेजण घरी गेले.
३८. महाराज आमुचा पाठीराखा
महाराजांचा कऱ्हाडचा एक भक्त मुंबईत राहात होता. मुंबईत त्याची स्वतःची एक खोली होती. वीस बाय वीसाच्या खोलीत त्याचा संसार मांडलेला होता. त्यातच बायको, मुले असा त्याचा गोतावळा झोपत होता. मुले किती? ११ मुले त्याला होती. पाच मुली व सहा मुलगे होते दोघांची लग्ने झाली होती. त्यांची आणखीन तीन मुले होती.
संध्याकाळी ११ वाजता त्यांच्या खोलीचे दार बंद करण्याची पद्धत होती. अकरा वाजण्याच्या आत मुलांनी घरात झोपायला यायचं असा त्यांचा दंडक होता. एकदा काय झालं तर एक सोनू नावाचा मुलगा अकरा वाजता घरात झोपण्यासाठी आला नाही. हे त्यांच्या लक्षात कधी आले? तर झोपताना त्यांनी ऐकून मुले मोजली तेव्हा झोपताना मुले चौदा आहेत ही ती संख्या बघत. सगळ्यांच्या अंगावर एकच एक लांबं पांघरुन घालत असत. मुले मोजली तर ती तेराच होती.
चौदावा सोनू कोठे गेला असा त्यांना प्रश्न पडला. त्यांच्या आईने दार उघडून पाहिले तर सोनू नाही. तिने हाका मारल्या तरी नाही. शेवटी रागाने तिने दार धाडकन लावले आणि पुटपुटली,
“कारटी वेळेवर येत नाहीत. दिवसभर काम करुन जीव माझा जातूया. याचं त्यांना काय नाही. मरुदे तिकडं कुठे गेलं असेल तिकडं जाऊ दे किती यांची काळजी करायची? एकदा देवानं मला मरण दिलं की मी सुटलो. जीव हाय तवर करायचं. पुढचं कुणी बघीतलया, आपण मेलं आणि जग बुडालं.”
परत आईचा जीव र्हाईना. तिनं परत बारा वाजता दार उघडलं आणि सोनुला हाक मारली. सोनू पटकन दाराजवळ आला. त्यानं आईकडे बघितलं आणि रडायला सुरुवात केली आईनं त्याला रागान दंडाला धरलं आणि दरादरा ओढीत आत आणलं. आत ओढीत असताना तिनं त्याच्या गळयात एक गोल असा बिल्ला बघितला. त्यावर बालदास महाराजांचा फोटो होता. हे बघितल्यावर तिचा राग थोडा शांत झाला. तिन त्याला विचारलं,
“हा तुझ्या गळयात बिल्ला कुणी घातला?”
“एक टक्कल पडलेल्या माणसानं”
“त्याच नाव काय?”
“माहीत नाही. त्याच्या अंगात लांब शर्ट होता पायविजार होती. पायात चप्पल नव्हते. तो खुळयासारखा वाटत होता. तो म्हणाला तुला मी बिल्ला देतो. तो गळयात घालं आणि घरात जा तुझी आई तुला मारणार नही. तुला घरात घेईल. प्रेमानं कवटाळील. परत मात्र घरी यायला असा वेळ करु नकोस. असं म्हणून त्यानं माझ्या गळयात हा बिल्ला घातला.”
सोनुच्या आईला महाराजांची आठवण आली. महाराज आपली किती काळजी घेतात याची तिला मनोमन जाणीव झाली. तिनं सोनुला कवटाळून छातीशी घेतलं आणि अंथरुणात नेऊन झोपवलं. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
“बालदास महाराज आमुचा पाठीराखा.”
३९. मिठाची साखर झाली चहाची तलप गेली
एकदा काय झालं एक अनोळखी मीठवाला मीठ विकण्यासाठी सौते गावात आला. मीठ विकताना तो पायलीभर मीठाच्या बदल्यात पायलीभर भात घ्यायचा.
तो मठाजवळ येताच त्यानं हाक दिली. “मीठ घ्या 5 मीठ घ्या हो 55.”
महाराज मठातून बाहेर आले आणि म्हणाले “एक पायली मीठ घालतोस का?”
“हो घालतो पण त्या बदल्यात एक पायली भात पाहिजे मला.”
“नाही बाबा माझ्याकडे भात नाही. मी तुला पैसे देतो. किती द्यायचे बोल?”
“पाच रुपये द्या आणि बघा सकाळची वेळ हाय. मला कपभर चहा दिलासा तर फार उपकार होतील बघा.”
“तुला एकाला चार कप चहा दिला असता. पण माझ्याकडं आज साखर संपलीया.”
“मी दुकानातून आणून देतो.”
महाराज क्षणभर थांबले आणि त्याला म्हणाले “तुला खरंच चहाची लई तलप झालीया?”
“होय, महाराज.”
“मग तुझ्या मीठाच्या पोत्यातील दोन मुठी मीठ आन.”
त्याने मीठ घेतले आणि महाराजांकडे गेला.
महाराजांनी चहाच्या पात्यालात दो कप पाणी घेतले. त्यात दोन चमचे पूड टाकली आणि मीठवाल्याला म्हणाले या पात्यालात मीठ टाक. त्याने ते दोन मुठी मीठ चहाच्या पात्याल्यात टाकले आणि म्हणाला,
“महाराज, हे मीठ हाय साखर न्हाय.”
“अरे बाबा हे काय हाय आणि कायन्हाय ते तू मला सांगू नकोस मला सर्व माहीत हाय. तुला चहा मिळाल्याचं कारणं बाकी चौकशी करु नकोस.”
महाराजांनी चुलीवर चहाला उकळी आणली आणि कपात चहा वतला. आणि मीठवाल्याला म्हणाले,
“घे बाबा चहा घे. चहा फार गोड झाला असेल कारण तू दोन मुठी साखर टाकली आहेसन?”
“होय महाराज, साखर नव्हे मीठ दोन मुठी टाकलय.”
“खुळया मीठ नव्हे तू टाकलेली ती साखरचं होती. चहा पिऊन त्याचे उत्तर सांग."
“होय महाराज चहा फारच गोड झालाय.”
“तुला चहां पिण्याची फार इच्छा झाली होती म्हणून देवाने तुझी सोय केली.”
“महाराज मीठाची साखर कशी झाली हे कोडं समजत नाही.”
“तुला हे कसं घडलं हे समजत नसेल तर त्याचे उत्तर देवालाच विचार.”
विचार करत करत मीठवाला महाराजांना पाहिजे असलेले पायलीभर मीठ आणायला गेला. तर सारे पोते साखरेचे झाले होते. ते साखरेचे पोते घेऊन तो मठात गेला. महाराजांना ते पोते त्याने दिले.
महाराज म्हणाले, “हे तू साऱ्यांना सांगू नकोस. नाही तर सगळीजन मीठाचं पोतं घेऊन येतील आणि मला साखरेचे पोते द्या म्हणतील. मी प्रत्येकाला कुठली साखर देऊ?”
४०. महाराजांचा कृपाप्रसाद मिळाला तो जगी धन्य झाला
महाराजांचा कृपाप्रसाद ज्या भक्तांना मिळाला ते जीवनात धन्य झाले. जे रंजले गांजले होते त्यांना सुखाचे दिवस आले. ज्यांना महाभयानक आजरपिडा होती ती त्याची दूर झाली. कोर्टाच्या कामाचा ज्यांच्या गळयाला फास होता तो सुटला. ज्यांना बैल गाडी नव्हती त्यांना ती मिळालीत. ज्यांना अन्न नव्हते ते सुखाने अन्न खाऊ लागले. ज्यांच्या अंगावर पुरेसे वस्त्र नव्हते त्यांना अंगभर वस्त्र मिळाले. ज्यांना झोपडी राहायला नव्हती त्यांना चांगले घर राहायला मिळाले. ज्यांना घरात नातवंडे खेळावीत अशी ज्यांची तीव्र इच्छा होती ती महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली.
ज्यांना पंढरपूर बघण्याची इच्छा होती त्यांना दिंडीत नाचत नाचत पंढरपूर दाखविले. ज्यांना अध्यात्माची भूक होती ती त्यांनी मनसोक्त भागविली जे जे आपल्या भक्ताला अपेक्षीत होते ते ते त्यांनी दिले. भक्तांच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. मी भक्ताचा आणि भक्त माझा ही भावना त्यांनी अखेरपर्यंत जपली.
४१. गरिबाची गरिबी गेली महाराजांची वाचा सोन्याची ठरली
रत्नागिरीतील पार्वती नावाची भक्तीन ठाण्याला राहात होती. वर्षातून एकदातरी ती सौत्याच्या मठात येऊन जायची. महाराज तिला पार्वती माता म्हणून बोलवायचे.
पार्वतीनं त्या काळात म्हणजे सन १९५८ च्या दरम्यान ठाण्यात चार पाच गुंठे जमिन घेतली. जमिन मुरमाड होती. तिला ती जमीन फक्त दोन हजारात मिळाली होती. आजूबाजूला तुरळक वस्ती होती. पाणी व लाईट यांची सोय नव्हती. पण जवळच एक आड होता. त्याचं पाणी शेजारचे लोक बादलीनं काढत पिण्यासाठी नेत. पार्वती भाजीपाला विकून आपलं व नवऱ्याच पोट भरायची.
ती अशीच एके दिवशी मठात आली. महाराजांनी तिला विचारले, “पार्वती माता, काय म्हणतोय तुमचा भाजीपाला?”
“हाय ते बरचं म्हणायचं महाराज. दोन्ही येळला खातोय हेच नशीब म्हणायचं झालं.”
“आसं कसं म्हणतीस पार्वतीमाता? पोटभरुन चार पैसे साठलं पाहिजेत नुसतं पोट भरुन चालणार नाही.”
“मग काय करु? दिवसभर भाजीपाल्याची पाटी डोक्यावर घेऊन फिरतोय तवा कुठं हाताला नि पोटाला गाठ पडतीया. आणिक पैसा कुठला साठवू?”
“कसली भाजी विकतेस?”
“साऱ्या प्रकारची.”
“पार्वती माता सारे प्रकार म्हणजे त्या भाज्याची नावे सांग मला.”
“मेथी, पोकळा, वांगी, टॉमाटो, भेंडी, गवार, दोडका, कोबी, फ्लॉवर... हया भाज्या विकते."
“यापैकी तू ठाण्याला घेतलेल्या जमिनीत काय पिकवतेस?”
“मेथी, पोकळा, भेंडी, पडवळ येवढंच पिकवते. का तर आडाचं पाणी बादलीनं काढून ते भाजीपाल्यांना घालावं लागतं. ते पाणी पण मुबलक मिळत नाही. लई काटकसरीन पाण्याचा वापर करावा लागतो.”
महाराज थोडा वेळ थांबले आणि परत पार्वती मातेला म्हणाले, “पार्वती माते, मी तुझा भाजीपाला ऐकला तू खूप राबतेस माझ्या लक्षात आले. तर आता तू हा सारा धंदा बंद कर.”
“मग काय करु?”
“मी सांगतो ते कर.”
“बरं तर काय करु म्हणता महाराज?”
“माझ्याकडे चार आळवाचे गडे आहेत. ते तू घेऊन जा देशी आळू आहेत. फार चवीला असतात. त्याच्या पानाचं व देठाचं उत्तम गरगटे होते. त्याच्या पानाच्या छान वडया होतात. हे आळुचे गडे तू ठाण्याच्या जमिनीत नेऊन लाव. हे आळू साऱ्या ठाण्याच्या लोकांना रुचीचे वेड लावतील.”
“बरं तर महाराज तुमच्या मताप्रमाणे चालूया.”
“पार्वती माता मी सांगतो तसंच कर. आता अधिक काय बोलायला नको.”
पार्वती मातेने ते आळुचे गडे ओल्या फडक्यात गुडांळून घेतले. दुसर्या दिवशी ते देशी आळूचे गडे तिने ठाण्याच्या जमिनीत लावले. आळूने आळू वाढत गेले आणि चार गुंठे रान हिरवे गार झाले. पार्वतीची आळुच्या पानाने भरलेली पाटी ठाण्यात फिरु लागली. आळुच्या चवीची प्रसिद्धी सगळीकडे झाली. ठाण्याचे लोक तिच्या चार गुंठे जमिनीकडे येऊन पाने विकत नेऊ लागले. सुरुवातीला ती दोन रुपायला सहा - सात पाने विकत होती. तीच पार्वती तीच आळवाची पाने दोन रुपायाला एक पान असे विकू लागली.
हा महाराजांच्या सांगण्याप्रमाणे तिने निष्ठेने व्यवसाय केला. काही वर्षातच तिची चार गुंठयातील झोपडी जाऊन तिथे बंगला उभा राहिला. तिनं शेजारचा शिवार थोडा थोडा खरेदी करण्यास प्रारंभ केला. कष्टाळू व धनवान बाई म्हणून तिची सर्व ठाण्यात ख्याती झाली. महाराजांची वाचा सोन्याची ठरली.
४२. मदनचा पाय मोडला महाराजांनी वैद्य आणला
महाराज चाळीस जनावरांचा कळप घेऊन जंगलात चारायला जात. दिवसभर जनावरांच्या पाठीमागे उभे राहात. संध्याकाळी गावाकडे परतत. डोंगरातून तिन्ही सांजेला जनावरे उतरताना फार काळजीपूर्वक उतरावी लागत. डोंगरातील पाऊल वाटेने एक एक करत जनावर उतरावं लागतं, गडबड करुन चालत नाही. नाहीतर मग कुणीतरी कोलांट्या उडया खात गडगड खाली येतं. मग हात पाय मोडल्या शिवाय राहात नाही. एकदा काय झालं तर सागर बैल मदन बैलाला डोंगराच्या पाऊल वाटेनं घराकडे परत येताना शिंगाने ढकलू लागला. हे बघून महाराज म्हणाले.
“अरे सागर, असं काय करतोस? मदनला नीट वाटेने चालू दे की, त्याला तू काय म्हणून अडचण करतोस त्याला डोंगराच्या पाऊल वाटेनं नीट सावकाश उतरु दे.”
तू त्याला शिंगाने ढोसनलेस तर तो पडंल हे तुला समजत न्हाय का?”
एवढयात सागराने शिंग मदनच्या मानेला आडवे लावले व मदन धाडकन पडला. महाराज ओरडले, “अरे सागर, तू काय हा घोटाळा केलास? मदनला पाडून तुला काय मिळालं? वाटेनं नीट जावं आपणही नीट चालावं आणि दुसऱ्यालाही नीट चालण्याची संधी द्यावी हे तुला समजत नसेल तर तुझ्यात काय अर्थ नाही.”
खाली ढासळलेल्या मदन जवळ महाराज पळतच गेले आणि त्यांनी मदनची मान वरती उचलली. महाराज त्याला उठवू लागले पण त्याला उठता येत नव्हते. कारण त्याचा पुढचा उजवा पाय मोडला होता. पाऊल वाटेने येणारा जनावरांचा कळप तसाच थांबला.
महाराजांनी ताकतीनं मदनला वाटेतून बाजूला ओढून घेतलं. बाकीची जनावरं पाऊल वाटेने चालू लागली. सर्व जनावरे निघून आल्यानंतर महाराजांनी मदनला कसाबसा पायावर उभा केला. त्याच्या पायावर कुठल्यातरी झाडाचा पाला चेचून बांधला आणि मदनला लंगडत लंगडत घेऊन गावाकडे आले.
महाराजांनी दुसऱ्या दिवशी कोकणातून एक वैद्य आणला. त्यानं बैलाचा पाय कामटांच्या साहयाने बांधला. पोटात घेण्यासाठी बाटलीतून औषध दिले ते औषध महाराज वीस एकवीस दिवस पाजत होते. साधारण दोन महिन्यात मदन चालू लागला. त्याचे हाड पूर्णपणे जुळले महाराजांना आनंद वाटला.
ज्या दिवशी मदन चालला त्या दिवशी महाराजांनी मठात सर्व भक्तांना पुरणपोळीचे जेवण दिले. सर्वानाच आनंद झाला.
४३. महाराजांना ठेच लागली नागाने धाव घेतली
बालदास महाराज बाद्याच्या जंगलातून गाई बैलांचा कळप घेऊन सौते गावाकडे येत होते. येताना वाटेत महाराजांना ठेच लागली अंगठा फुटला. महाराज लगेच कुडकुडीचा पाला इकडे तिकडे बघायला लागले. त्यांना कुडकुडीचा पाला मिळाला. तो हातावर चोळून त्यातून त्यांनी रस काढला आणि तो रस व चुरडलेला पाला त्यांनी अंगठयावर घातला. थोडे झोंबले पण रक्त लगेच बंद झाले. येवढयात महाराजांना अस्सल नाग समोरच दिसला. तो नाग महाराजांच्यापासून पाच सहा फूट अंतरावर होता.
महाराज त्या नागाला पाहून म्हणाले, “का आलास बाबा धावत धावत?
काय पाहिजे तुला?”
नागाने महाराजांच्यासमोर तीन वेळा फडी आपटली. महाराज हे दृश्य बघून म्हणाले, “अरे बाबा, मला नमस्कार करुन देवपण देतोस काय? पण मी देव नाही मी एक माणूस आहे. तू येथून निघून जा. पाठीमागे जनावरांचा कळप येतोय. तुला ती तूडवतील. तू तुझ्या जीवाला सांभाळ माझी कशाला काळजी करतोस.”
नाग निघून गेला. महाराज बसलेले उठले आणि सौते मठाकडे चालत येऊ लागले.
४४. घार फिरे आकाशी चित्त तिचे बाळापाशी
महाराज एकदा मुंबईस गेले होते. ते तेथे एक महिनाभर राहिले. एका भक्तानं त्यांना आपली स्वतंत्र खोली राहण्यासाठी दिली होती. महाराज त्या खोलीत ज्ञानेश्वरी अभंगगाथा या सारख्या ग्रंथांचे वाचन करीत बसत असत.
संध्याकाळी ८ वाजता मुंबईतील सर्व भक्त त्यांना भेटण्यासाठी येत. महाराजांच्या बरोबर अध्यात्मिक व समाजकल्याणाच्या चर्चा करीत बसत. महाराज मध्येच बोलता बोलता विचारत,
अरे दगडू पाटील काय बरेच दिवस आला नाही. कापशीचा तानाजी कधी येणार? शिवंचा दरा ऊकरायचा चालला होता त्याचं काय झालं? यंदा मात्र बाळू पाटलाला पंढरीच्या वारीला घेऊन जायचं बरं का? गेल्या वर्षी पंढरीच्या वारीला बाळू पाटील आला नाही, त्याला म्हणावं विठ्ठलाला विसरुन चालल कसं बाबा? तब्बेत बरी नाही म्हणून चालणार नाही. मानसांत मिसळून चालायला लागलं की विठ्ठलही बरोबर चालत असतो. मग दुखनं कुंठ राहील तुझं म्हणावं? राम खोपडे मुंबईला आला आणि लगेच गेला. उगीच राजकारणी माणसांच्या नादाला लागूतया. आरं बाबा, दिसतं तसं नसतं म्हणून तर सारं जग फसतयं."”
महाराज महिनाभर मुंबईत राहिले, पण सारं लक्ष त्यांचं भक्ताच्याकडे असायचं.
“घार फिरे आकाशी, चित्त तिचे बाळापाशी”
अशीच महाराजांची अवस्था असायची.”
४५. झोळीत भात शिजविला
एकदा शिरगावचे बापू महाराज व बालदास महाराज हे दोघेजन कापशीहून सौत्याच्या मठाकडे येत होते. येताना वाटेतच बापू महाराज महाराजांना म्हणाले, “महाराज, मला भूक लागली आहे. मला चालवेनासे झाले आहे.”
बालदास महाराज म्हणाले, “बाटलीतील पाणी पी, म्हणजे तुला तरतरीपणा येईल. का उगीचच नाटक करायला लागलास. खुळया तू कापशीतुन निघतानाच थोडा दहिभात खायचा नाहीस का? तुला आता वाटेत मी काय खायला देऊ?”
बापु महाराज कळवळून बोलले, “मला कायपण खायला द्या. माझा जीव अगदी भेंडाळुन गेलाय. चेष्टेवारी नेऊ नका खरचं कायतरी करा.”
बालदास महाराजांनी बापू महाराजांकडे नजर टाकली आणि फाडकन म्हणाले, “तुझ्यासाठी मुठभर तांदुळ माझ्या झोळीत टाक.”
बापू महाराज म्हणाले,“महाराज तुमच्या झोळीत तांदूळ टाकून काय करु? तांदूळ शिजायला पाणी, विस्तव, भांड काय पाहिजे का नको?”
बालदास महाराज म्हणाले, “तू फार लांबचा विचार केलास. तू माझ्या झोळीत तुझ्याकडचे मूठभर तांदूळ टाक म्हटल्यावर टाक. बाकीचा वाडंचार लावू नकोस.”
बापू महाराजांने मूठभर तांदूळ बालदास महाराजांच्या झोळीत टाकले.
तांदूळ झोळीत टाकल्याबरोबर लगेच बालदास महाराज म्हणाले, “बापू महाराज, आता झोळीत हात घाला आणि लागल तसा भात खा.”
हे ऐकून बापू महाराज आश्चर्यचकित झाले. त्यांनी झोळीत हात घातला तर गरम गरम भात त्यांच्या हाताला लागला. रस्त्याच्या वळणावर असलेल्या आंब्याखाली थांबून बापू महाराजांनी भातावर यथेच्छ ताव मारला.
४६. ताराची म्हैस आडली, तारा घळाघळा रडली
गाडयाच्या वाडीची ताराबाई नावाची एक महाराजांची भक्तीन होती. ती वर्षातून सवडीनुसार तीन चार वेळा सौत्याच्या मठाकडे भक्तीभावाने यायची. येताना महाराजाच्या मठात तुपाची वात काही दिवस लागावी म्हणून ती घरात साठलेलं तूप घेऊन यायची उदबत्तीचा मोठयात मोठा चांगला सुवासिक वासाचा पुडा घेऊन यायला विसरायची नाही. खडीसाखर, नारळ आणि कापूर हे तर ती येताना घ्यायला कधीच विसरली नाही. मठात यायचं म्हटलं की ती सर्व तयारी आदल्या दिवशीच करुन ठेवायची. तिला महाराजांचा सहवास म्हणजे साक्षात देवाचा सहवास वाटायचा. ती काही वेळेला मठात येताच म्हणायची,
“माझ्या देवासाठी मी चालत आलोय. माझ्या देवाला कधी बघीलसं झालंतं.” असं म्हणून महाराजांचे पाय धरायची.
एक दिवस ताराबाईवर बिकट प्रसंग आला. तिची म्हैस आडली. म्हैस आडली आणि असहय वेदनानं गोठयात लोळू लागली. म्हैस बेरडू लागली. ताराला काय करावं हे सुचेना. शेजापाजारी पंधरावीस मैलावर कोणी जनावरांचा डॉक्टर नव्हता. शिवशेजारी कुणी त्यातला जाणकार माणूसही नव्हता. तिचं डोकं चक्रम व्हायची पाळी आली.
तरीपण तिला देवानं बुद्धी दिली आणि तिला महाराजांच्या मठाची आठवण झाली. मोठा पोरगा तानाजीला तिनं गोठयात थांबायला लावलं आणि ती पायातल्या चपल्या हातात घेऊन गावाच्या बाहेर पळत आली. गावाच्या बाहेर आल्यानंतर तिनं पायात चपल्या घातल्या नि वाऱ्यासारखी धूम ठोकीत ती मठाकडे आली.
महाराजांनी ताराला बघितले आणि म्हणाले, “ताराबाई तू का आलीस. आणि तुझ्या डोळयात पाणी का? काय येवढ़ संकट कोसळलं तुझ्यावर? सांग तरी काय झालं ते?”
“काय सांगू महाराज, अंगावरचं दागिने घानवट ठेऊन दुसरी म्हस घेतलीया. चांगली तानपी हाय. दिवस भरलेत आणि काल व्यायला लागली तर व्येता व्येता ती आडली आणि खाली गोटयात धाडकन पडली. सारखी लोळत पडलीया माझ्या तान्याला गोटयात बसवून मी इकडे पळत आलुया. तरी कायपन करा महाराज पण माझी म्हस यातुन सुटली पाहिजे, न्हायतर माझं समधं घर बुडलं महाराज. कायपन करा महाराज पण माझ्या म्हसीला तेवढी मोकळी करा हो.”
महाराजांनी डोळे मिटून “शंभो” असा आवाज दिला. लगेच डोळे उघडून महाराज ताराला म्हणाले,
“तारा तू घरी जा. तुझी म्हैस मोकळी झालीया, तिला गुलजार कुरळया केसाची रेडी झालीया. आता तुला देवानं रेडी म्हणजी म्हैस दिलीया. तुझ्या घरात आता दहयादुधाचा पूर येईल ऊठ जा. पहिली धार काढून खरवीज कर जा अन् शेजापाजाऱ्यांना वाट जा.”
तारा उठली. महाराजांचे दर्शन घेऊन घराकडे पळाली. घरात आली. म्हैस उठून उभी राहिली होती. घास घास गवत खात होती. ताराला बघुन ती ओरडली. ताराचा जीव भांडयात पडला. तारानं रेडीला मायेनं कुरवाळलं. जवळ घेतलं. अंगावर पटकुर झाकलं. तिनं धार काढली. चुलीवर मोठया भांडयात रटारटा खरविज शिजायला लागला. ताराचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिन शेजापाजाऱ्यांना खरविज वाटला.
४७. शुद्ध भक्तीपोटी असती, फळे रसाळ गोमटी
एकदा माझे वडिल आणि महाराज हे दोघे सौते मठातून चालत बांबवडेपर्यंत आले. बांबडयातून ते एका मालवाहतुक ट्रकातून कोल्हापूरात पंचगंगा नदीवर उतरले. पंचगंगा नदीच्या घाटावर महाराजांनी थोडावेळ जप व कुठल्यातरी ग्रंथाचे वाचन केले.
नंतर दोघेजण चालत चालत कुंभार गल्लीच्या दत्तमंदिराकडे आले. येताना माझ्या वडिलांना महाराज म्हणाले, “दत्तोबा, आपण हार घेतला नाही आणि पेढेही घेतले नाहीत. निदान दत्ताला तेथल्या औदुंबराला वाहाण्यासाठी चारफुले तरी घ्यायला हवी होती.” माझें वडिल म्हणाले,
“मी जाऊन आंबाबाईच्या देवालयाजवळून आणू काय? लगेच जाऊन येतो.”
“नको. देवाला बेल, पान, पाणी, पेढे हार, नारळ, उदबत्ती कशाचीही अपेक्षा नसते. त्याला फक्त शुद्ध भक्तीची गरज असते. ती आपणाकडे आहे. मग मनातला विचार काढून टाकूया.”
महाराज कुंभारगल्लीच्या दत्ताच्या मंदिरात औदुंबराच्या झाडाकडे बघत बघत आत पाऊल टाकणार येवढयात एक शर्ट विजार घातलेला, बोडका, टक्कल पडलेला एक चाळीस पंचेचाळीस वयाचा माणूस महाराजांना हाक देऊ लागला-
“आहो, महाराज थांबा, थांबा. मी हे आणलंय ते घ्या आणि पुढं जावा.”
महाराज एक पाय हुंबऱ्याच्या आत आणि एक पाय हुंबऱ्याच्या बाहेर अशा अवस्थेत थांबले, त्या माणसाने महाराजांना एक भरलेली पिशवी आणून दिली. त्यात नारळ, पेढे, फुले हार, उदबत्ती, कापूर खडीसाखर हे सगळे होते. नंतर तो माणूस पटकन तेथून निघून गेला.
महाराजांनी ते सर्व औदुंबराच्या झाडाला वाहिले आणि मस्तक टेकून औदुंबराचा आशीर्वाद घेतला. हुंबऱ्यातून बाहेर आल्यावर वडिलांनी महाराजांना विचारले,
“महाराज ही पिशवी देऊन गेलेला माणूस कोण?”
महाराज म्हणाले, “दत्तोबा, ते त्या माणसालाच विचार.”
माझ्या वडिलांनी मनात काय ओळखायचे ते ओळखले आणि गप्पराहिले.
४८. महाराजांच्या तोंडून आले, करवंदाने भविष्य केले, ते ते सर्व घडत गेले
महाराज बांदयांच्या जंगलात जनावरं घेऊन चारायला जात. जनावरं चरत असताना महाराज ग्रंथ वाचनाचे आणि पाठांतराचे काम करीत असत. काहीवेळा विरंगुळा म्हणून ते करवंदाच्या जाळीजवळ जाऊन करवंदे तोडत व पळसाच्या पानांचा द्रोण करुन त्यात साठवत. द्रोण भरला की तो द्रोण ते पळसाच्या पानांनी तयार केलेल्या इस्तारीवर ओतत व परत दुसऱ्यांदा - तिसऱ्यांदा असा द्रोण भरुन आणण्यास जात. इस्तारीवर असाच एकदा मोठा ढिग साचला. संध्याकाळी घरी परतताना त्यांनी तो ढीग सर्व गुराखी मित्रांना वाटला. त्यांना महाराज म्हणाले,
“ही करवंदे घरी घेऊन जावा मीठ लावून खावा. पण खाता खाता एक काम करा.”
एक गुराखी म्हणाला, “कोणतं काम करु?”
“खाताना प्रत्येक करवंद पारखून खायचं, आणि पारखताना ते इतरांच्यापेक्षा वेगळं वाटलं तर मग ते करवंद मला दाखवायला आणायचं.”
“एकही करवंद वेगळं वाटलं नाही तर सगळीच करवंद खायची काय?”
“होय. खाल्लीतर चालतील.”
“तुम्हाला नको झाली तर घरातील इतरांना वाटलीसा तरी चालेल.”
“बंर तर, तुम्ही दिलेली करवंदे महाराज आम्ही पारखून पारखून खातो.”
“बंर तर चला आता. अंधारायला लागलंय, कडूस पडलं तर दिसत नाही. जनांवरंही चालताना जास्त ठेसकळतात,”
सर्व गुराखी जनावरे घेऊन घरी आले हातपाय धुऊन जेवायला बसले जेवताना मीठाबरोबर कच्ची करवंदे खायला घेतली. जेवताना पारखून पारखून करवंदे खाण्यास सुरवात केली. एका गुराख्याला एका करवंदावर “ओम” अक्षर आढळले, तर दुसऱ्या एकाला एका करवंदावर नागाची फडी दिसली. इतर गुराख्यांना काहीही दिसले नाही. त्यांना सर्व करवंदे सारखीच दिसली. त्यांनी ती सर्वच्या सर्व खाऊन टाकली. ज्याला “ओम” अक्षर दिसले व ज्याला नागाची फडी दिसली ते दोघे गुराखी महाराजांच्या कडे उठल्या उठल्या पळाले दोघांनीही आपापले दिसलेले वेगळे करवंद महाराजांना दाखविले. ज्याला करवंदावर नागाची फडी दिसली त्याला महाराज म्हणाले,
“तू शिव भक्त होशील. आणि ज्याला “ओम” अक्षर दिसले त्यालाही म्हणालेत तूही तसाच शिवभक्त होशील. त्या प्रमाणे त्यांच्या आयुष्यात घडले.
४९. दु:खी हौसा सुखी झाली, जीव घेऊन घरी आली
सौते गावच्या शेजारील गावची एक हौसा नावाची बाई कडवी नदीत जीव देण्यासाठी निघाली. जाता जाता तिला महाराजांचे दर्शन घेऊन आपले जीवन संपवावे असे वाटले. ती नदीवरुन थेट सौते गावच्या महाराजांच्या मठात आली तर महाराज गवत कापण्यासाठी बाद्याच्या जंगलात गेलेत असे समजले. ती पायवाटेने तिकडे निघाली वाटेतच महाराज गवताचा भारा डोक्यावर घेऊन येताना आढळले. महाराजांना ती म्हणाली,
“एवढा मोठा गवताचा भारा घेऊन कुणीकडे निघालात” महाराज म्हणाले, “माझ्या कुटुंबाला जगवण्यासाठी हा गवताचा भारा घेऊन निघालूया.”
ती थोडी कोडयात पडली. महाराज काय म्हणत्यात ते तिला कळेनासे झाले. कावरीबावरी होऊन तिनं महाराजांना विचारलं, “महाराज तुम्ही काय म्हणताय ते मला काय बी कळत नाही. कुटुंबासाठी गवताचा भारा घेऊन निघालाय याचा अर्थ काय?”
महाराजांनी सवते गावच्या उतरंणीला असलेल्या दारुडयाच्या आंब्याखाली असलेल्या प्रचंड दगडावर भारा उतरला आणि महाराज तेथेच भाऱ्या शेजारी बसले. महाराज त्या हौसाला हसत हसत म्हणाले, “हौसा, माझं कुटुंब म्हणजेच माझा जनावरांचा गोतावळा. माझा गोतावळा सांभळण्यासाठी मला हे काम करावं लागतं. बरं तर तू निघालीस कुणीकडं?”
हौसाला रडु कोसळलं. ती हुंदकं देत म्हणाली, “महाराज मी आयुष्याचा शेवट करायला निघालीया. नवरा कवडीची कमाई करत नाही. दारु पितो. मारमार मारतो. तीन पोरं पदरात हाईत. एकाला कपडा हाय तर दुसरं उघडं नागडं फिरतंया. मी लोकांचा रोजगार करुन पोरं जगवतुया. ते पण करुन दीना झालाय. सारखा घरात हैदोस घालतुया. सगळया पाहुण्यापयांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यो कोणालाच भिक घालत नाही. मी दमले, शिणले, वैतागुन गेलेय आणि म्हणूनच आयुष्याचा शेवट करायला निघालेय. जाताना तुमचे दर्शन घेऊन जावे असा विचार मनात आला. केवळ अखेरच्या दर्शनासाठी मी तुम्हाला शोधत आलोय.”
महाराजांनी हौसाचे बोलणे ऐकल आणि खदाखदा हसू लागले.
महाराज हौसाला म्हणाले, “आगं खुळे, यालाच संसार म्हणतात. संसारात अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. संकटांना सामोरे जावे लागते. जीवाचं रान करुन संसार उभा करावा लागतो. मोडणारा संसार वाचवावा लागतो. संसारात सुख राळया येवढे आहे पण संकटं पर्वतायेवढी आहेत. या संकटांत हसत हसत जगायचं असतं. संसाराला पाठ फिरवून पळायचं नसतं. नाहीतर मग तू हा संसार मांडलासच का? आता तुला तुझा संसार अर्ध्यावर सोडून जाता येणार नाही.”
“हौसाला हे विचार पटल्यासारख झाले. ती मनात विचार करता करता फाडकन म्हणाली,
“माझ्यानं हे सोसणार नाही. जीव देऊन या जगातून जाणं हेच मला सोपं हाय.”
म्हराज म्हणाले,“ हौसा, जीव कुणी द्यावा. जी बाई माणसात वागायला लायक नाही जी आपल्या वागण्यात समाजमान्य बदल करु शकत नाही तिनं जीव द्यायचा असतो. तुझ्या सारख्या पतित्रतेनं हे करायचं नसतं. तुझ्या दुःखाचा मी सोबती आहे. मी तुझ्या नवऱ्याचा बंदोबस्त करतो. तो उद्यापासून दारु पिणार नाही. तो कामाला जाईल.
तू उद्यापासून पाच मिनिटं वेळ काढून देवाचा जप करत जा. तुझं मन शांत होईल. तुझ्या घरी हळू हळू सुख नांदायला येईल. पण लक्षात ठेव देवाची ओळख विसरु नको.”
महाराजांचे साधे, सोपे पण मार्मिक विचार हौसाला पटले. हौसा महाराजांचे दर्शन घेऊन घराकडे परतली. हौसा सुखाने नांदू लागली.
सुखात नांदताना ती देवाचे नामस्मरण कधीच विसरली नाही.
५०. डोंगरातल्या वाटा ज्ञानानं फुलल्या
कोपर्डेचा एक मुंबईवाला भक्त महाराजांना भेटण्यासाठी आला. तो मठाला सकाळी ८ वाजता आला. तर महाराज होते बहिरीच्या पठारावर बहिरीच्या देवळाजवळ बसले होते. हातात दासबोध होता. खाद्यावर पांढऱ्या शुभ्र धोतराचा शेव टाकला होता. नजर ग्रंथावर खिळली होती. अशा अवस्थेत महाराज असताना तो मुंबईवाला तेथे पोचला. जवळ उभा राहिला. दहा मिनिटे अंदाजे उभाच होता. तरीपण महाराजांनी त्याला बघितले नाही. त्याला ठसका आला म्हणून तो ठसकला. तो ठसकलेला बघून महाराजांनी तिकडे नजर टाकली. तो न बोलताच उभा होता.
महाराज क्षणभर दृष्टि वळवून म्हणाले, “इथं बस.”
तो बसून राहिला. महाराजाचा अध्याय संपल्यानंतर महाराज म्हणाले, “तू का आलास?”
“आपणाला भेटून व आपले दर्शन घेऊन पाचसहा महिने झाले. केवल मी दर्शनासाठी आलोय महाराज.”
“आरं. तुम्ही मुंबईवाली माणसं तुम्हाला गावाकडं यायला वेळ कुठला मिळतोय. तरीपण येळ काढून आलास ही चांगलीस गोष्ट आहे. गावाकडं यावं पांढरीच्या देवांना निवद नारळ दयावा. गावकऱ्यांना तोंड दाखवावं. आपल्या आठवणींना उजाळा दयावा हे सारं आपल्या हातून झालं की माणसाला एक समाधान वाटतं.”
“होय महाराज पण पोटाच्या मागे लागलेल्या हया डोंगरातल्या लेकराला रजा नको का मिळायला? हेच आपल्या हातात नाही. नाहीतर नोकरीला मुकावं लागेल. मग मी तरी काय करु?”
“हे तू गडया माझ्या अंतरीचे बोल बोललास बघ, मी सकाळी रामाच्या पाऱ्यात उठून इथं बहिरीदेवाच्या पठारावर का आलोय?”
“एकांतात ग्रंथ वाचायसाठी तुम्ही आलाय."
होय, पण दुसरीही गोष्ट लक्षात घे. इथं वाचन झालं की डोंगराकडे नजर टाकतो. डोंगरातल्या पायवाटा बघतो. नागीनीसारख्या आडव्या तिडव्या गेलेल्या पायावाटा बघत बघत मी विचार करतो.”
“काय? काय विचार करता महाराज?”
“आरं, हया वाटा रिकाम्या का? हयावर गवत नाहीतर अन्य वनस्पती कशा काय उगवलेल्या नाहीत.”
“महाराज, त्या वाटा झणझणीत मळलेल्या आहेत. त्या मळून मळून टणटणीत झाल्यात. त्यामुळे त्यावर कुठलेही बीज रुजत नाही, त्यामुळे त्या रिकाम्या आहेत.”
“आरं! त्या पायवाटा डोंगरातल्या पायवाटा आहेत. काटयाकुटयातून मार्ग काढीत पुढं जाणाऱ्या त्या पायवाटा आहेत. या पायवाटा बरंच काय सांगतात. आपण काटयाकुटयांतून मार्ग काढत पुढं जावं आणि दुसऱ्यांना मार्ग दाखवावां असं हया पायवाटा सांगतात. त्या स्वत:च्या अंगावर जनावरांची माणसांची पावले आनंदाने झेलतात. स्वत: परोपकाराचा आनंद लुटतात. आपलं आयुष्य जणकल्याणार्थ आहे असं टाहो फोडून सांगतात.
या पायवाटांनी किती कष्ट सहन करायचं त्यांना सुख माहीती नाही. जन्मभर दुसऱ्यासाठी कष्टच कष्ट!
“मग महाराज या पायवाटांनी काय करावंस तुम्हाला वाटतं?”
“मला त्यांनी काहीही करु नये असं वाटतं, जगासाठी किती राबायचं त्यांनी स्वतःसाठी काहीच करायचं नाही का? नाही, नाही यातून कायतरी मार्ग निघाला पाहिजे,”
“कसला मार्ग महाराज?”
“पायवाटांच्या सुखाचा मार्ग,
या पायवाटा पायवाटा न राहता त्या ज्ञानानं फुललेल्या ज्ञानवाटा झाल्या पाहिजेत, त्यासाठी मला प्रयत्न केला पाहिजे. मी जास्त शिकलो नाही किंवा जास्त शिकून बॅरीस्टरही झालो नाही. पण अंतरीची तळमळ राहात नाही. या डोंगराळ भागातून कुठूनतरी डोंगरातून ज्ञानगंगेचा उगम झाला पाहिजे. त्यासाठी मला कायतरी केलं पाहिजे.”
“महाराज, तुम्ही डोंगरातला माणूस माणूस जगला पाहिजे यासाठी धडपडताय. तुमचं अंत:करण तीळ तीळ तुटतंया हे ऐकून मी अचंबित झालो आहे. महाराज, आपली इच्छा आहे तर मार्ग सापडणारच एक दिवस असा उजाडेल की डोंगरतल्या तुमच्या अंतःकरणात रुजलेल्या पायवाटा हया पायवाटा न राहता त्या ज्ञानाने फुललेल्या ज्ञानवाटा बनतील.”
मुंबईवाला होकारात्मक बोलला महाराजांना आनंद झाला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसत होता की जणू काय त्यांच्या समोरुन डोंगरातून ज्ञानगंगाच वाहत आहे. आणि त्यांच्या समोरील डोंगरातील पायवाटा हया ज्ञानाने फुलल्या आहेत.
५१. साक्षात महाराज अवतरले, पंढरीचे वारकरी वेळेत उठले
श्री क्षेत्र शिरगाव येथे, प. पू. बालदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळयासाठी दरवर्षीप्रमाणे ह.भ.प. दादा महाराज मनमाडकर व त्यांचे भजनी मंडळातील साथीदार आले होते. सर्व पंढरीचे वारकरी समाधी जवळच असलेल्या एका जनावरांच्या गोठयात झोपले होते. भजनी मंडळातील वैकुंठवाशी प. पू. नागनाथ महाराज माहूरगडकर आणि श्री. ह. भ. प. सूरदास रावसाहेब गव्हाणे हे दोघेही बैलांच्या गोठयात झोपले होते. झोपताना चर्चा झाली होती की काकडं आरतीला वेळेत उठून सूसज्ज व्हायचे. पण माळावर झुळझुळ वाहणारा वारा असल्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. काकड आरतीला वेळेवर उठायचे असल्यामुळे त्यांना गाढ झोप नको होती. परंतू झुळझुळणाऱ्या वाऱ्यांनं त्यांना चांगलीच झोप लावली. हे सर्व वारकरी गाढ झोपेत आणि वेळेवर उठणार नाहीत याची जाणीव प. पू. बालदास महाराजांना झाल्यामुळे त्यांनी साक्षात या भजनी मंडळीला हाक मारली आणि म्हणाले, “अरे, पहाट झाली, पंढरीचे वारकरी उठा. काकड आरतीची वेळ झाली, आपल्या सेवेला प्रारंभ करा.”
सगळे वारकरी खाटकन उठले. तर महाराज पायात खडवा घालून खाडखाड आवाज करीत चालत होते. खडावांचा आवाज त्यांच्या कानात घुमत होता आणि त्यांनी मारलेली हाक ही त्यांच्या कानात घुमत होती.
५२. चिमण्या त स्वाऊन गेल्या
लहर येईल तेव्हा महाराज नृसिंहवाडीला जात. एकदा महाराज पहाटे तीन वाजता उठले आणि प्रात:विधी आटोपून बांबवडयाला चालत आले. साडेचारच्या सुमारास त्यांनी एका भक्तांच्या दारात उभे राहून त्याला हाक दिली. तो पळतच बाहेर आला. त्याला म्हणाले, “भिवा, चल आटप.”
“वाडीला जायचं."
“आज अचानक काय हे?”
“होय बाबा. आरं देवाला भेटायला काळ येळ काय नसते. देव कवाबी भक्ताला भेटतो."
“बरं, जाऊया. पण जायचं कसं?”
“कसं म्हणजे पायानं चालत.”
“येवढं अंतर पायानं?”
“चला तर. आपण किती वाजता पोचायचंय?
“संध्याकाळापर्यंत”
“परत यायचं नाही काय?”
“नाही.”
“का नाही म्हणून विचारलं नाहीस?”
“होय आपण परत का यायचं नाही.”
“अरे, बाबा. आज कोजागिरी पौर्णिमा आहे.
या पौर्णिमेच्या चांदण्यात श्री गुरुदेव दत्त कसा न्हाऊन घेतो ते बघायचं. घाटावर पांढऱ्याशुभ्र चांदण्यात गुरुमहाराजांचं शिखर कसं तळपतंय ते शांतपणानं अनुभवायचंय. शांत चांदण्यात तेथे नांदायला येणारी शांती शांतपणाने अनुभवायची. त्या ठिकाणचं सुख सांगत बसायला नको. चल पटकन.”
भिवाने कपडे घातली, अंथरुन पांघरुन घेतलं आणि निघाला. सायंकाळी सहाच्या सुमारास नृसिंहवाडीच्या घाटावर आलीत. घाटावर इतरही लोक चांदण्यात बसले होते. इतरांच्यापासून थोडे बाजूला महाराज बसले. शांत चांदण्यात शांतपणे एकाग्र झाले. शीतल चांदणे पांढऱ्याशुभ्र दुधाची पांढऱ्याशुभ्र तांदळाच्या पिठाची, पांढऱ्या चांदीच्या रुपयाची क्षणभर आठवण करुन देते होते. भिवा अंथरुन टाकुन बसला. बघता बघता न खतापिताच गाढ झोपला. महाराज पहाटे चारपर्यंत पद्मासन घालून बसले होते महाराजांनी चार वाजता इकडे तिकडे बघितले. तर भिवा झोपला होता. भिवाला म्हणाले,
“भिवा कोजागिरी पौर्णिमेचे चांदणे तू बघितलेस. पण त्याचे सुख बघितले नाहीस. तु झोपलास आणि सर्व सुखला मुकलास, खुळया तुला खूप अनुभवता आलं असतं पण तू गमवून बसलास. या घाटावर स्वर्गीय सुख तू लाथाडून बसलास.
“होय महाराज मला माफ करा. मी आधाशा सारखा झोपलो.”
“अरे तुला मी येथे घाटावर झोपायला आणले नव्हते. तर सुखाचा महासागर अनुभवायला आणले होते. आता पश्चाताप करुन काय उपयोग? “जब चूग गयी चिडिया खेत.”
५३. उपाशी भक्तांची जाणीव झाली महाराजांनी वांगी घेतली
महाराजांच्या समवेत शिरगावचे रामचंद्र पाटील व शाळेची चारपाच मुले शिरगावहून सौत्याकडे निघाली होती. सौत्याचा मठ कुलुप घालून बंद होता. त्या मठात झाटलोट करण्यासाठी महाराज यायला लागले होते वाटेत महाराज मुलांना म्हणाले, “अरे बाळांनो, शेतकऱ्याच्या शेतातली सात - आठ वांगी घ्या.”
हे ऐकून रामचंद्र पाटील म्हणाले,“महाराज मी जेऊन आलोय. मुलेही जेवून आलीत. वांगी कशाला घ्यायची?”
“अरे बाबा, मठात लोक येऊन उपाशी बसलेत. त्यांची सोय कोण करणार? राम तुला येवढं समजत नाही का?
“कोण तुम्हाला म्हणालं?”
“अरे बाबा कुणी सांगायला कशाला हवं. मला समद कळतय की.”
सर्वजण मठाकडे आले. तर मठाच्या पडवीला चार- पाच लांब गावचे लोक येऊन थांबले होते. महाराजांनी मठाचे कुलुप काढले. महाराज आत जाताच त्यांनी पटापटा दर्शन घेतले. महाराजांनी चहा केला. त्यांना दिला.,
“जेवणाचे कसे?"
“आम्ही उपाशी आहोत.”
रामचंद्र पाटलांना महाराज म्हणाले. “राम वांगी कशाला घेता म्हणत होतास न! हे बघ त्याचं कारण.”
रामचंद्र पाटलांच्या लक्षात आलं की महाराज सर्वकाही जाणत होते.
५४. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
रामचंद्र पाटील एकदा महाराजांचे समवेत मठात बोलत बसले होते. अशा वेळी मठात एक संन्याशी आला. त्याच्या अंगावर भगवी वस्त्रे होती पण ती जीर्ण झाली होती. पार फाटली होती. महाराजांनी ही त्या संन्याशाची अवस्था बघताच त्यांनी त्याचे मनोगत जाणले आणि आपल्या अंगातील नवीन धोतर फाडून त्यातील निम्मे त्याच्या अंगावर घातले. संन्याशाला आनंद झाला. तो तेथून निघून गेला.
५५. मुक्या जनावराचा आत्मा जाणला
रामचंद्र पाटील व काही मुले शिरगावहून सौत्याला चालत येत होती. वाटेला गाढवांचा कळप आढळला. त्यांच्या पाठीवर बेलदारांनी दगडे ठेवली होती. ते दगड वाहून नेण्याचे काम ती गाढवे करीत होती. त्या काळपात एक पाय मोडके लंगडे गाढव होते. ते लंगडे असुन त्याच्या पाठीवर बेलदाराने मारुन मारुन जखमा केल्या होत्या. ते सर्व कळपात चालताना पाठीमागे राहात होते. आणि त्यामुळे बदाबदा मार खात होते. त्याच्या पाठीवर माशा घोंगावर होत्या. महाराजांनी हे दृश्य निरखून पाहिले आणि बेलदाराला म्हणाले,
“अरे बिचाऱ्या त्या बिचाऱ्या गाढवाला किती मारतोस? त्याला मारु नकोस मला ते गाढव विकत दे.”
“महाराज लंगडे गाढव विकत घेऊन काय उपयोग? त्यापेक्षा यातलं चांगलं गाढव घ्या.”
“अरे, नको मला तुझे चांगले गाढव. मला तुझे लंगडे, जखमा झालेले मरतुंगडे गाढवच हवे आहे.”
“बरं महाराज तुमची मर्जी. लंगडे गाढव घ्या. बोला किती देता?”
“तू बोल किती देऊ?”
“पन्नास रुपये द्या.”
महाराजांनी पटकन झोळीतून पन्नास रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले. बरोबर असलेल्या मुलांना महाराज म्हणाले, “चला रे, बाळांनो! गाढवाच्या पाठीवरील दगड काढा. त्याला हाकत हाकत मठाकडे न्या.”
मुलांनी गाढव मठाजवळ आणून बांधले. मुलांनी त्याला पाणी पाजले. हिरवी वैरण घातली. पाठीवरील जखमावर हळद घातली. गाढवाचा आनंदी चेहरा बघुन महाराजांना वाटले. येथुन पुढे महाराज दररोज गाढवाला डाळगूळ देवू लागले. हिरवी वैरणही घालू लागले. महिन्याभरात गाढव धष्टपुष्ट झाल्यामुळे ते जोरात खेकाळू लागले. त्याच्या ओरडण्याचा (खेकाळण्याचा) त्रास वाटू लागला. म्हणून नंतर महाराजांनी त्या गाढवाला मोकळे सोडून दिले.
५६. पांढर्या खडयानं पाणी दिलं, पाण्यानं पोट भरुन गेलं
रामचंद्र पाटील (शिरगाव) हे मलकापूरला हायस्कूलमध्ये शिकत होते. एप्रिल महिना होता. सकाळी शाळा भरे व बारा वाजता सुटे. शाळेतून बाहेर पडायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला रस्त्यानं मलकापूरकडून शिरगावाकडे यायला निघाले. ऊन मी म्हणत होते. वाटेला तहान खूप लागली. रामचंद्र पाटलांच्या तोंडाला कोरड पडली, त्यांना पाणी पाणी करण्याची वेळ आली. पण रस्त्यात कोठेही पाण्याची सोय नव्हती. वाटेत विहीरीच्या पाण्याचा पाट नव्हता की नदीच्या पाण्याचा पाट नव्हता. त्यांचा जीव कासावीस झाला होता. काय करावे हे त्यांना सूचेना. येवढयात रामचंद्र पाटलांना कुणी तरी हाक मारली, “रामा थांब."
पाठीमागे रामचंद्र पाटील फिरुन बघतात तर बऱ्याच अंतरावर नजरेच्या टप्प्याच्या बाहेर महाराज दिसले. रामचंद्र पाटील रस्त्यातच हाकेसरशी थांबलेत. महाराज भरभर रामचंद्र पाटलांच्याजवळ आले. महाराज जवळ येताच रामचंद्र पाटील म्हणाले,
“महाराज मला खूप तहान लागलीया माझा जीव कासावीस झालाय. मला पाणी पाहिजे आहे. महाराज म्हणाले,
“रामा चल तुला पाणी देतो. महाराजांनी रस्त्यावरच्या एका झाडाखाली त्यांना आणले. तेथे त्यांच्या हातावर पांढरा खडीसाखरेचा खडा ठेवला. तो त्यांनी तोंडात घातला तर तो गोड नव्हता. मात्र खडा चोकील तसे त्यातून पाणी मिळत होते. रामचंद्र पाटलांना तांब्याभर पाणी प्याल्यासारखा आनंद वाटला. चेहरा ताजातवाना झाला.
महाराज म्हणाले, “आरं रामा तहान भागली का? का आणि पाणी पाहिजे?”
“नको नको भरपूर पाणी प्यालो. पोट पाण्यानं भरुन गेलंय. आत्मा थंडगार झाला.”
हा अनुभव बालवयात रामचंद्र पाटलांनी अनुभवल्यापासून रामचंद्र पाटील महाराजांच्या सौते मठाकडे जायला लागले.
५७. सापाने आज्ञापालन केले
शिरगाव येथे रामचंद्र कृष्णा पाटलांच्या घराच्या पाडवीला महाराजांच्यासाठी खोली बांधली आहे. या खोलीत महाराज अग्नी पेटवून त्याला शेकत असत. एकदा धुनीला शेकुन महाराज पाठीमागे परसात बसायला गेले. परसात उंचवटयावर बसले. त्यावेळी एक प्रचंड नाग परसात महाराजांना दिसला. बघता बघता तो नाग महाराजांच्याकडे येऊ लागला. महाराजांच्या पायाजवळ आला. महाराजांनी त्यावर जमिनीची चिमटभर माती उचलून टाकली. नाग माती टाकताच फणा काढुन फुस्5 फुस्55 आवाज करीत निघून गेला.
महाराज म्हणाले, “बाबा दुसऱ्याला अशी भीती घालू नये. जा तुझे तू काम बघ जा.”
५८. आभाळायेवढा आशीर्वाद
महाराज हे रामचंद्र पाटील यांच्या वडिलांच्या मावशीचे सुपुत्र. रामचंद्र पाटलांची आजी ममताई ही महाराजांची मावशी. महाराज लहानपणी रामचंद्र पाटलांच्या घरी येत. पण घरात कधी येत नसत. बाहेरच ते ओटीवर बसत. रामचंद्र पाटलांची आजी महाराजांना बाळू म्हणत असे.
बाळू घराकडे आला की ममताई (रामचंद्र पाटलांची आजी) बाळू येण्याचे कारण ओळखत असे. कारण बाळु घडी घडी घराकडे येत नसे. कारणाकारणीच येत असे बाळू आला की ममताई म्हणायची, “बाळु आलाय त्याअर्थी तो तीर्थयात्रेला निघाला असणार आहे. उगीच तो येणार नाही. त्याला पैसे इच्छेने दिले पाहिजेत. तसेच प्रवासात खाण्यासाठी गुळशेंगाही दिल्या पाहिजेत.”
ममताई दील ते पैसे आणि गूळशेंगा घेऊन बाळू जात असे. ममताईची बहिण जिजाबाई तिचा एकुलता एक मुलगा म्हणजे बाळू होय. बाळू कमीत कमी बोलत असे नम्रपणाने वागत असे. ममताई बाळूला एकदा म्हणाली बाळू तू तार्थक्षेत्राला निघालास चांगली गोष्ट आहे. पण तू परत येताना मला तीर्थक्षेत्राहून काय आणशील?
बाळू उत्तरला, “आजी तुला तीर्थक्षेत्राहून येताना मी देवाचा आभाळाएवढा आशीर्वाद आणीन.”
५९. चांगले संस्कार आयुष्याचं सोनं करतात
महाराज सौते गावच्या मठात असताना त्यांच्याकडे सहासात मांजरे होती. सगळया मांजरांची त्यांनी नावे ठेवली होती. ज्या मांजराचे महाराज नाव घेत ते मांजर त्यांच्याजवळ लाडकत येत असे. मनी आणि सुंदरी ही दोन मांजरे महाराजांना जास्त प्रिय होती. एक कुत्रे ही महाराजांनी मठात पाळले होते. त्यांचे नाव मोती ठेवले होते.
एकदा मठात मुंबईचा भक्त आला म्हणुन महाराजांनी चुलीवर चहा ठेवला. चहा ठेवुन महाराज छोटेसे लाकूड तोडत होते. येवढयात इकडे चहा ऊतू चालला. ते बघून महाराज ओरडलेत, “मोती चहा बघ ओतु गेला.”
महाराजांचे शब्द ऐकुन मोती पळत चुलीकडे गेला व त्याने चुलीवरचे चहाचे पातेले जबडयात धरुन पटकन उतरुन जमिनीला ठेवले. हे दृश्य बघून मुंबईच्या भक्ताला आश्चर्य वाटले. येवढयात दुसरी घटना घडली मठात एक उंदीर सुसाट पळत आला. चुलीकडे बसलेल्या मनीने तो बघितला व पाठीमागे लागली. महाराज ओरडले, “मनी, मनी मारु नकोस. हुसकवून घालव.” मनीने पाठलाग करुन तोंडात धरलेला उंदीर पटकन सोडला. उंदीर मठातून बाहेर पळून गेला.
लाकूड फोडून महाराज चुलीजवळ आले आणि मुंबईच्या भक्ताला चहा देऊ लागले. तो भक््त म्हणाला. “महाराज मुक्या प्राण्याला किती तुम्ही चांगलं वळण लावलंय."
महाराज म्हणाले,“वळण लावण्यावर आणि लागल्यावर प्रत्येकाचं आयुष्य उज्ज्वल होतं. चांगले संस्कार चांगल्या ध्येयाकडे नेतात, आयुष्याचं सोनं करतात.”
६०. दैवी शक्तीचा प्रत्यय
एकदा महाराज सौते गावचे बुरसे यांचे कडे गाईंना वैरण मागण्यासाठी गेले असता बुरसे यांनी “तुला उचललं तेवढ घेऊन जा” असे महाराजांना सांगितले. महाराजांनी स्वत:च पिंजराची संपूर्ण गंजी बांधली व उचलून घेऊन गेले. बुरसे बघतच राहिले. तसाच प्रकार नामदेव चोपडे सावर्डेकर यांचे बाबतीत घडला. गाईना कडबा मागण्यासाठी महाराज गेले. जमल तेवढ उचलून ने म्हणून सांगितले असता महाराजांनी कडब्याचे संपूर्ण बुचाड दोरीवर बांधून उचलून घेऊन गेले.
योगीराज प.पू. बालदास महाराज दरवर्षी आपले गुरु प.पू. कृष्णदास महाराज यांची पुण्यतिथी सौते मठात साजरी करीत असत. पुण्यतिथी उत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह ज्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, प्रवचन, कीर्तन हे दैनंदिन - कार्यक्रम होत असत त्यासाठी भव्य दुमजली भव्य मंडप उभारण्यात येत असे. एके वर्षी मंडपासाठी बांबु आणण्यासाठी एक बैलगाडी व चार भक्तांना कोतोली या गावी पाठविले होते. रात्र झाली तरी गाडी मठात आली नव्हती, रात्री महाराज उजेडासाठी कंदील घेऊन कापशी व सौतेच्या मधल्या डोंगरावर गेले असता बांबुनी भरलेली गाडी उलटी झालेली त्यांना दिसली. कोणालाही ती सरळ करता येत नव्हती. परंतू प.पू. महाराजांनी दोन्ही हातांनी एकटयाने ती ओल्या बांबूनी भरलेली बैलगाडी सरळ केली. केवढी ही अचाट शक्ती. महाराजांच्याकडे सर्व सामान्य माणसांपेक्षा कितीतरी पटीने अधीक शक्ती होती हे अनेक प्रसंगातून सिद्ध झाले आहे. यास दैवी शक्ती असेच म्हणावे लागेल.
६१. महाराजांचे कृपेने असाध्य रोग बरा झाला
महाराजांचे एक सद््भक्त श्री दादू दौलू पाटील त्यावेळी मुंबईत राजेश मिलमध्ये नोकरीस होते. महाराज ज्या वेळी मुंबईत येत किंवा ज्या वेळी महाराजांच्या गावी हरीनाम सप्ताह असे त्यावेळी दादू पाटील नेहमी राजेश मिलचे सुपरवायझर यांचे कडे रजेसाठी अर्ज घेऊन जात असत. एकदा असेच महाराज मुंबईस आले असता ते रजेसाठी साहेबाकडे गेले त्यावेळी साहेबांनी त्यांना विचारले की, महाराज माझ्या घरी येतील का? दादू पाटलांनी महाराजांच्या कानावर हि गोष्ट घातली महाराज त्यांच्या घरी जाण्यास तयार झाले व एक दिवस दादू बरोबर साहेबांच्या घरी गेले. साहेबांच्या घरातील सर्वजण दर्शन घेऊन गेले व नंतर साहेब एका कृश मुलीस घेऊन महाराजांचे दर्शनासाठी आले व म्हणाले महाराज ही माझी मुलगी गेली बरीच वर्षे आजारी आहे कोणत्याही औषधाचा गुण येत नाही ती मुलगी महाराजांच्या पाया पडली. महाराजांनी तिला विभूती लावली व डोक्यावर हात ठेवला.
त्या दिवसानंतर हळू हळू मुलीची प्रकृती सुधारत गेली व मुलगी एकदम बरी झाली. सुपरवायझर साहेबांना अत्यानंद झाला. त्यांनी दादूस ही गोष्ट स्वत: कथन केली व त्यानंतर दादू म्हणेल तेवढी रजा महाराजांच्यासाठी देऊ लागले.
कोणत्याही प्रकारची प्रसिद्धि न करता सहजपणे महाराजाच्या हातून असे अनेक चमत्कार घडून गेले आहेत.
६२. महाराजांचे ऐकले असते तर बरे झाले असते
त्या काळी महाराज सावर्डेकर गणपती पाटील यांच्या छपरात रहात होते. इतर सर्व भक्ता प्रमाणेच श्री दगडू पाटील हे सुद्धा जास्तीत जास्त वेळ महाराजांचे सेवेत असत. दिवस शेतीच्या मशागतीचे होते. दुपारच्या वेळी दगडू पाटील महाराजांना म्हणाले, घरचे इतर लोक शेतात गेले आहेत मलाही गेले पाहिजे. महाराजांनी त्यांना अनेक प्रकारे थांबवून घेण्याचा प्रयत्न केला पण दगडू पाटील म्हणू लागले महाराज मशागतीचे अखेरचे दिवस आहेत. घरातील लोक माझ्यावर रागवतील मला गेले पाहिजे व असे म्हणुन ते चालू लागले. महाराज म्हणाले अरे चहा तरी पिऊन जा व चहा देण्यास महाराजांनी बराच वेळ लावला दगडू पाटलांची चुळबुळ वाढू लागली त्यांनी कसाबसा चहा तेवढा घेतला व म्हणाले महाराज चलतो आता. महाराज म्हणाले आज शेताकडे नाही गेले तर चालणार नाही का? दगडू पाटील म्हणाले “महाराज मला गेलेच पाहिजे” त्यानंतर महाराज म्हणाले जायालाच पाहिजे म्हणतोस तर मग जा बाबा. मी तरी काय करु व नंतर स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले, ”जातीला सगळं उलगडून सांगावे लागते तरच कळते.”
दगडू पाटील शेतात गेले तर त्यांच्या विरोधकाने त्यांच्या शेताचा बांध फोडला होता व त्यामुळे त्यांच्यात व विरोधकात तुंबळ मारामारी झाली.
सर्व झाल्यानंतर दगडू पाटलांचे लक्षात आले की महाराज जाऊ नको का म्हणत होते.
महाराजांना भविष्यातील घडणाऱ्या घटना कळत होत्या पण ते अप्रत्यक्षपणे त्यांची जाणीव भक्तास करुन देत असत.
६३. आडाला पाणी लागले
शाहूवाडी तालुक्यातील शिरगांव गाव हे मोजकीच लोकसंख्या असलेले १२ बलुतेदारांच्या १२ गल्ल्यांनी वसलेले गाव. लांबलचक सरळ रस्ते, एका रांगेत लहान-मोठी घरे आणि १२ गल्ल्यांच्या मधोमध श्री निनाई देवीचे मंदिर. गावाच्या सभोवताली काळी कसदार सुपिक जमिन. पावसाळयात आणि हिवाळयात या जमिनीचा थाट काही औरच असतो. अनेक पिकांनी, फुलांनी, हिरव्या गार पानांनी आच्छादून गेलेली शेती. जणू हिरेजडीत रंगीबेरंगी माणिकमोती लावलेली हिरवीगार पैठणीच परीधान केल्यासारखी वाटते. मर्यादित लोकसंख्या असलेले गाव तसे खुपच चांगले आहे. पण या गावाची कहानी इतर गावांपेक्षा खूपच निराळी आहे. उन्हाळयाची चाहूल लागताच ओढयाचे पाणी आटून जाते. नदी हळूहळू कोरडी पडते. गावातील प्रत्येक स्त्री-पुरुषांना, मुला-बाळांना, गुरा-ढोरांना तारेवरची कसरत करुन दाही दिशा वन वन भटकावे लागत असे.
अवघे झाले जीर्णशिर्ण अन्, सुन्न झाल्या दिशा |
खुप सोसले आता, झाली तहान माझी आशा ||
कोंबडा आरवण्याच्या अगोदर धुंदरुक (पहाट) व्हायच्या आत गावातील स्त्री-पुरुष साखर झोपेतून उठून पाण्यासाठी ओढयावर किंवा नदीवर जात असत. ओढयात झरे काढून नारळाच्या करवंटीने पाणी भरुन एक जरी घागर भरली तरी समाधानाने घरी परतत असत. घरातील शेतातील हातची कामे सोडून दिसरात पाण्यासाठी बायकांची त्रेधातिरपीट उडायची. रणरणत्या उन्हाळयात कोरडया ठणठणीत पडलेल्या नदीकडे पाहून तहानेने व्याकूळ झालेल्या गावकऱ्यांच्या मनाला तडे पडत. सर्व गावकरी एकत्र येऊन नदी मध्ये खोलवर खोदून आडी काढत असत. पण त्यामध्ये सुद्धा पुरेशे पाणी मिळत नसे. याप्रसंगावरुन गावकऱ्यांमधील एकजूटीची भावना प्रकर्षाने जाणवायची. कुरणाच्या माळावर, जोगदऱ्यात, रांजणावर, निडात, कुंभार झऱ्यात झरे काढून गावकरी गुरांच्या पाण्याची सोय करायचे. तरी सुद्धा पुरेसे पाणी मिळत नसे. गावातील बायका कपडे धुण्यासाठी व पुरुष आंघोळ करण्यासाठी दुसऱ्या गावातील हद्दीपर्यंत जायचे.
गावाची अशी हालाखीची परिस्थीती पाहून दुसऱ्या गावातील गावकरी शिरगावात मुलींची लग्न करण्यासाठी चौफेर विचार करुन मुली द्यायला तयार होत नसत. पाणी टंचाईचा कहर झाल्यामुळे शिरगांव ग्रामस्थ मंडळ (मुंबई) यांनी ओढयात आड (विहीर) बांधली. पण त्याला सुद्धा पुरेसे पाणी लागले नाही.
या कोरडया दुष्काळाच्या झळांचे चटके पाहून प.पू. बालदास महाराज यांनी शिरगावच्या गावकऱ्यांना एकत्र करुन परत विहीरीचे खोदकाम सुरु केले. महाराजांनी स्वत: जातीने लक्ष घालून दिवस रात्र एक करुन कामावर देखरेख ठेवली. काम सुरु असताना स्वत: स्वखर्चाने गावकऱ्यांच्या मनाला थोडासा थंडावा मिळावा म्हणून लिंबू सरबताचे वाटप करत असत. प.पू. महाराजांच्या लाख मोलाच्या आशिर्वादाने विहीरीला भरपूर पाणी लागले.
महाराजांची नजर दूरदृष्टीची व विचरसरणी भविष्यवेधी होती. त्यामुळे १९५८ च्या कालखंडात विहीरीला पाणी लागल्यानंतर त्यांच्या ध्यानी, मनी, स्वप्नी एका सुखदायक कल्पनेचा उगम झाला. ती कल्पना म्हणजे श्री. निनाई मंदिराजवळ एक मोठी पाण्याची टाकी बांधायची. त्या टाकीत विहीरीचे पाणी नळाने सोडायचे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात पाईपलाईन टाकून ठाराविक ठिकाणी सामूदायिक नळ योजना राबवायची अशी त्यांची विचारसरणी होती. काही अपरिहार्य कारणांमुळे ही योजना आमलात आली नाही.
हिरा जरी कोळश्यामध्ये असला तरी तो आपला चमकणे हा धर्मगुण सोडत नाही. योगीराज बालदास महाराजांचेही असेच आहे. त्यांचे महात्म्य आणि चमत्कार आजतागायत आपल्या सर्वांच्या अंत:करणात दृढ आहेत.